इतिहासाचे एक पान. १२१

हिरे आणि बियाणी यांच्यांतील बियाणी यांना बाजूला सारल्याबद्दलचं समर्थन होऊं शकतं. कारण बियाणी हे मूळचेच हितसंबंधी वर्गाचे पुरस्कर्ते आणि प्रतिनिधि. बियाणी यांचा मंत्रिमंडळांत समावेश करायचा म्हणजे पिळवणूक करणं हीच ज्या वर्गाची परंपरा, त्या वर्गाला सरकारच्या यंत्रणेंत एक मोठा आणि हुकमी आधार निर्माण करून देण्यासारखंच घडणार होतं. यशवंतरावांनी ज्या राजकीय दृष्टीकोनाची जोपासना वर्षांनुवर्ष केलेली होती त्याला हें धक्का देण्यासारखं होतं. मंत्रिमंडळांतल्या सहका-यांची निवड करतांना यशवंतरावांना तें काम जागरुकपणानं आणि ध्येयदृष्टि शाबूत ठेवून करावं  लागणार होतं, आणि त्यांनी तें तसं केलं. त्याचबरोबर सहका-यांमध्ये खात्याची वांटणी करतांनाहि राज्याच्या रथाचा लगाम मुख्य मंत्र्यांच्या हातांत राहीलयाची दक्षता घेतली.

मोरारजींच्या राजवटीत गृहथातं हे मुख्य मंत्र्यांच्या अखत्यारीत होतं. व्दैभाषिक अस्तित्वांत येऊन मुख्यमंत्रिपद हें चव्हाण यांच्याकडे येतांच गृहखातंहि त्यांनी स्वतःकडे ठेवलं. पण गुर्जर-बंधूंना मात्र तें खटकलं. त्यांना त्यांच्या जीवित-वित्ताची नव्या राजवटींत काळजी होती आणि महाराष्ट्रीय नेत्यांवर त्यांचा विश्वास नव्हता, त्यामुळे गृहखातं हें गुजराती मंत्र्याकडे असावं, असा त्यांनी प्रयत्न सुरु केला, परंतु या बदलाला मान्यता द्यायची म्हणजे जवतेचा आपल्यावर विश्वास नाही, हें मुख्य मंत्र्यांनी स्वतःच सिद्ध करण्यासारखं होतं.

मंत्रिमंडळाची व खात्यांची रचना करतांना, स्वतः मोरारजी देसाई आणि ढेबरभाई यांनीहि चव्हाण यांच्यावर त्यासाठी दबाव आणण्यास कमी केलं नाही, परंतु यशवंतरावांनी या वृत्तीबद्दल नापसंती दर्शवली, आणि आपलं काम पूर्ण केलं. महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात, विदर्भ आणि सौराष्ट्र या पांचहि विभागांचा करभार एकसूत्रतेनं करण्याचं हें काम मोठं जिकीरीचं होतं. तरीहि कामामध्ये सकतोल राहील अशाच पद्धतीनं त्यांनी खात्यांचं वांटप केलं आणि त्या प्रत्येकाचा संबंध आपल्यापर्यत पोंचेल हें सुत्र मंत्र्याकडील खात्यांची रचना करतांना कायम ठेवलं.

नव्या मंत्रिमंडळाचा संच तयार झाल्यानंतर १ नोव्हेंबर १९५६ ला यशवंतरावांनी व्दैभाषिकाचे मुख्य मंत्री म्हणून अधिकृतपणें सूत्रं स्वीकारलीं. मंत्रिमंडळाचा शपथविधि त्या दिवशींच झाला. १९४६ मध्ये पार्लमंटरी सेक्रेटरी म्हणून मुंबईत दाखल झालेले चव्हाण दहा वर्षांच्या अखेरीस खेर-मोरारजींच्या आसनावर आरुढ झाले होते. यशवंतरावांच्या आणि महाराष्ट्राच्या जीवनाचा नवा अध्याय आता सुरु झाला. महाराष्ट्राचं नेतृत्व पुरोगामी व उमद्या, जिद्दीच्या आणि व्यवहारी नेत्याकडे आल्याचं प्रथम प्रथमच घडलं.

मुख्यमंत्रिपद स्वीकारतांना यशवंतरावांच्या मनांतले विचार अगदी स्पष्ट होते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रांतला ‘माणूस’ हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदु होता. देशांतल्या आणि महाराष्ट्रातल्या माणसांचं भौतिक कल्याण साध्य करतां आलं पाहिजे, माणूस सर्वार्थानं संपन्न व सुखी बनला पाहिजे हा विचार स्वातंत्रपूर्वकालापासूनच त्यांच्या मनःचक्षूसमोर तरळत होता. ते घडवण्याची संधि आयुष्याच्या चौथ्या दशकांत लोकशाहीनं त्यांना उपलब्ध करून दिली होची. यशवंतरावांच्या मनांत त्याचं समाधान होतंच. महाराष्ट्रांतल्या बहुजन समाजाच्या मनांतलं समाधान मात्र त्यापेक्षा मोठं होतं. महाराष्ट्रांतल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांतला प्रत्यक्ष एका शेतक-याचा मुलगा महाराष्ट्रचा मुख्य मंत्री झाला याचं या समाजाला समाधान होतं. स्वातंत्र्योत्तरकाळांत हें प्रथमच घडलं होतं.

कृषीप्रधान भारतांतला शेतकरी हा ख-या अर्थानं देशाचा राजा आहे असं विव्दान विवेचक व्याख्यानांतून आजवर भोलत असत, आता तें प्रत्यक्ष घडल्याचं त्यांना सांगावं लागणीर होतं. तें ऐंकण्यासाठी जनताहि उत्सुक होती. लोकशाही पद्धतीनं जनतेच्या हिताचा कारभार करणारा नेता हा सर्वसामान्य जनतेंतून वाढलेला असला, तर जनतेला तो एक आधार वाटतो आणि त्याच भावनेनं जनता आपल्या नेत्याला साथ देते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com