इतिहासाचे एक पान. १६०

दि. १ नोव्हेंबरला यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधि झाल्या नंतर नव्या मुंबई राज्याच्या उद्घाटनानिमित्त जनतेला त्यांनी एक प्रदीर्घ संदेश दिला. मनाचीं सर्व कवाडं उघडीं ठेवून दिलेला हा संदेश होता. नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या सणाचा महिना. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याचा तो मोसम. सुंदर हवा, विपुल पाणी, सारी सृष्टि फुलून गेलेली, सुगी जवळ आलेली, असा तो समृद्धीचा मंगल समय असतांनाच नव्या मुंबई राज्याचा शुभारंभ होत होता. भारतांत अनेक पुनर्घटित राज्यं सुरू होत होतीं, परंतु विशाल मुंबई राज्याला असामान्य महत्त्व प्राप्त झालेलं होतं. भारतांतील हें अग्रेसर राज्य द्वैभाषिक राज्य या नात्यानं भारतापुढे कोणता आदर्श ठेवील याकडे सर्वांचंच आस्थापूर्वक लक्ष लागून राहिलं होतं. अन्य भाषकांप्रमाणेच सर्व मराठी व गुजराती बांधव एकत्र येऊन त्यांचं भाषिक राज्य बनावं असं जनतेला वाटत होतं; पण भाषिक राज्याची ओढ असलेल्या या जनतेला मुंबई शहराचीहि ओढ होती.

उभय प्रदेशांतील जनतेच्या या भावनांची दखल घेऊनच त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं विशाल मुंबई राज्य सुरू होत आहे असं यशवंतरावांनी त्याचं प्रथमपक्षीं समर्थन केलं.

स्वत:भोवतीं प्रतिज्ञांचे तट उभारूनच यशवंतरावांनी नव्या राज्याच्या कारभाराला प्रारंभ केला. पुरवठा आणि अन्नखात्याचं मंत्रिपद सांभाळतांना प्रशासकीय कारभारांतली दिरंगाई, अडचणी, उणिवा याचा अनुभव त्यांनी घेतलेला होताच, तरी पण कारभाराचे प्रमुख या नात्यानं आता कांही बदल घडवायचा तर प्रशासकीय तज्ज्ञांचां सल्ला संपादन करण्याची आणि स्वत: अभ्यास करण्याची गरज त्यांना भासली.

समस्या, मग ती कसलीहि असो, त्या समस्येच्या मुळापर्यंत पोंचून तिच्या सर्वबाजूंचा अभ्यास करायचा, निर्णयाच्या परिणामाला सर्वांगांनी कसोट्या लावायच्या आणि निर्णय करायचा तो समस्या निपटून काढण्यासाठी करायचा, असंच वळण आपल्या मनाला आणि स्वभावाला  यशवंतरावांनी लावलेलं होतं. त्यामुळे परिणामकारक आणि सुलभ राज्याकरभार करतां यावा यासाठी सर्व समस्यांचं त्यांनी पुन्हा एकदा बारकाईनं निरिक्षण केलं.

नव्या राज्याच्या मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. सामान्यत: मागर्दर्शक असतो तो बोट धरून वाट दाखवणारा असतो. हा मार्गदर्शक तसा नव्हता. वाटसरूचा बोजा स्वत:च डोईवर घेऊन चालणारा हा एक विरळा मार्गदर्शक आता महाराष्ट्राला मिळाला होता. ज्याचा बोजा त्याच्या माथ्यावर, असा प्रकार इथे नव्हता. पराहिताच्या बुद्धीनं स्वत: त्रास सोसून एखाद्या कार्याला प्रवृत्त होणारी माणसं असतात. परहितासारखं दुसरं स्वहित नाही अशीच त्यांची धारणा असते. प्रसंग आल्यास डगमगायचं नाही व प्रसंग नसेल तर तो आणायला कचरायचं नाही, असंच कांहीसं यशवंतरावांच्या स्वभावाचं दर्शन, विशाल द्वैभाषिक राबवितांना किंवा नंतरच्या काळांतहि घडतं. महाराष्ट्रांत त्या काळांत लोक ज्या एका विषयासाठी अतिशय जागृत होते, त्याविषयी यशवंतराव उदासीन होते आणि ज्या विषयासंबंधी लोकांची गाढ झोप होती त्याविषयी यशवंतराव जागृत होते. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांच्या बाबातींत विपत्तीला कारण ठराव्यात त्या त्यांच्या ठायीं संपत्तिरूप बनल्या – त्याची फलप्राप्ति त्यांना झाली.

लोकांच, लोकांसाठी, लोकांनी चालविलेलं राज्य याचा पडताळा आणण्याच्या दृष्टीनं अधिकाराचं आणि कामाचं ब-याच मोठ्या प्रमाणांत विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय यशवंतरावांनी सुलभ कारभाराच्या दृष्टीनं सुरुवातीलाच केला. लोकांच्या दृष्टीनंहि तें आवश्यकच होतं. क्षुल्लक आणि दैनंदिन कामासाठी लोकांना या टोकापासून त्या टोकापर्यंत, राजधानीच्या ठिकाणीं जावं लागू नये अशी या विकेंद्रीकरणामागची दृष्टि होती. लोकांचे हेलपाटे टाळण्यासाठी आणि शक्य तर त्यांचं काम त्या त्या विभागांत होण्याच्या दृष्टीनं त्यांनी राज्याची विभागणी सहा डिव्हिजनमध्ये केली. मुख्य विभागीय ठाणीं राजकोट, अहमदाबाद, मुंबई, पुणें, औरंगाबाद आणि नागपूर अशीं झालीं होतीं. प्रादेशिक सलगता आणि एकसंधपणा, समान समस्या आणि राजकोट, औरंगाबाद व नागपूर यांसारख्या स्थळांचं महत्त्व टिकवण्याची आवश्यकता लक्षांत घेऊनच हेम घडलं. यांतल्या तीन विभागांमध्ये प्रत्येकी आठ जिल्हे आणि दोनमध्ये प्रत्येकी सहा जिल्हे असा समावेश करण्यांत आला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com