इतिहासाचे एक पान. ६१

७.
------------

चव्हाण-कुटुंबाभोवती पुन्हा संकटांचा वेढा पडला. काबाडकष्ट करून, सुक्याचं ओलं करून विठाईनं आणि ज्ञानोबा, गणपतराव यांनी यशवंतरावांना शिकवलं, ते मोठें झाले, वकील बनले, संसारी बनले हें पाहून विठाईनं मनांत केवढे तरी मनोरे रचले होते. पण ललाटावरील रेषा अजूनहि अंधुकच होती. थोरले पुत्र ज्ञानोबा निर्वतलेले, दुसरा मुलगा गणपतराव तुरुंगांत, यशवंतराव भूमिगत, सून तुरुंगात – ती लहान. लग्न होऊन नवा संसार सुरू करीत असतांनाच तुरुंगाचं संकट कोसळल्यानं तिच्या मनाला धक्का बसलेला! संकटांच्या परमावधीचा तो काळ. मायेची माणसं घरीं यायचीं-जायचीं पण ते सुद्धा मागेपुढे पहात. चव्हाणांच्या घरीं गेलों हें पोलिसांना समजलं तर तोहमत यायची ही प्रत्येकाच्या मनांत भीति असे. विठाईनं तें वर्ष-दीड वर्ष खंबीरपणानं रेटलं. घरांत कर्तेसवरते कुणीच नव्हते. सासूबाई आणि तीन सुना अशा चौघीच आणी चार नातवंडं.

नंतरच्या काळांत यशवंतरावांना पुष्पहार घालण्यासाठी जे धांवत होते त्यांच्यांतील त्या वेळच्या प्रसंगांत कुणी नव्हतं. घरीं कुणी येत नव्हतं. माणुसकीची कसोटी लावून जाणारा असाच एक प्रसंग त्या काळांत घडला. यशवंतरावांच्या एका खेड्यातल्या मित्रानं जोंधळ्याची चार पोतीं त्यांच्या घरीं पाठवायचं ठरवलं. बैलगाडींत त्यानं तीं पोतीं घातली आणि कराडला यशवंतरावांच्या घरी आणली. गाडी घरासमोर आली आणि उभी राहिली; पण गाडींतलीं जोंधळ्याचीं पोती उचलून घरांत ठेवण्यासाठी कुणी माणूस मिळेना! विठाई एकटी होती. कशाला आणली पोती म्हऊन तिनं गाडीवानासच दटावलं आणि ठेव तिथेच रस्त्यावर असं त्याला सांगितलं. गाडीवान हा एक कार्यकर्ता मुलगा होता. मोठ्या कष्टानं मग त्यानं ते जोंधळे घरांत नेले आणि निघून गेला. यशवंतराव सा-या जिल्ह्याचे नेते. कराड गाव सारं त्यांचंच, पण हें सर्व बाहेर; राजकारणांत, भूमिगत अवस्थेंत असतांना घरांतलं चित्र वेगळंच बनलं होतं. ‘सारा गाव व्यापला पण कुणी नाही आपला’ अशीच घरची स्थिति बनली होती.

दिवस पुढे सरकत होते आणि चले जाव चळवळ अधिक उग्र बनत होती. बँका लुटल्या जात होत्या, सरकारी दप्तरांची ठिकठिकाणीं होळी होत होती आणि गावांतल्या टग्यांचा, दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचं कामहि गुप्त-मंडळींनी सुरू केलं होतं. किसन वीर व पांडू मास्तरांना पकडून पोलिसांनी त्यांना तुरुंगांत पाठवलं होतं, पण तुरंग फोडून हे दोघेहि फरारी झाले तेव्हा मात्र त्यांना पुन्हा पकडणं एवढाच पोलिसांचा उद्योग होता. कांही अट्टल गुन्हेगारांना पकडूनहि पोलिसांनी काँग्रेसवाले पकडल्याचा डांगोरा पिटला. सरकारची इभ्रतच पणाला लागली होती. भयंकर दडपशाही आणि मारहाण करून पोलिसांनी त्या वेळी कित्येकांना आयुष्यांतून उठवलं. कांहींच्या घरच्या मुलाबाळांसह सर्वांनाच तुरुंगांत डांबलं, पण भूमिगत चळवळे हातीं लागले नाहीत. पोलिसांनी मग परंपरागत फितुरीचे प्रयोग सुरू केले आणि फितुरांमार्फत चळवळ्यांचा ठावठिकाणा, त्यांचे बेत यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com