विरंगुळा - ११९

यशवंतरावांचं माझं नातं जिव्हाळयाचे मित्र असं होतं. वस्तुत: ते राजकीय नेते. मी एक पत्रकार. मैत्री ही व्यवहाराशी आणि स्वार्थाशी निगडीत असते. अशा मैत्रीत प्रसन्नता उरत नसते. त्यांच्या संपर्कात आलो तेव्हापासून का कुणास ठाऊक, पण मी कसली ऐहिक लाभाची, भौतिक लाभाची, व्यवहाराची अपेक्षा ठेवू शकलो नाही. माझ्याकडून त्यांनी काही साध्य करावं असं माझ्याकडं काही नव्हतंच. पण मनं जुळत गेली. गुंतत गेली. गुंफण पक्की होत राहिली. या मैत्रीत प्रसन्नता होती. मैत्रीत स्वत:चे रूप नष्ट व्हावं लागतं. मनाचा 'मी'चा दुर्गुण जायला हवा. मैत्रीतही प्रसन्नता त्यांनी अखेरपर्यंत राखली. सहजगत्या असं काही घडत नसतं. सत्तेत असलेल्या त्यांच्यासारख्या नेत्याच्या मनात कोणाला विश्वासानं जवळ घ्यावं, मैत्री करावी याबाबत कसोटया असणारच. त्या कसोटयातून मलाही जावं लागलं असेल. पण याचा थांगपत्ता मला कधी लागला नाही.

दिल्लीत त्यांच्या बंगल्यात लोळत बसलो होतो. रात्री दहानंतरची वेळ. सहज कौटुंबिक गोष्टी सुरू होत्या. त्यांनी माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभं केलं. म्हणाले, ''आपण मध्यमवर्गीय माणसं. वय वाढतं तसं जबाबदाऱ्या वाढतात. मुलांची शिक्षणं, मुलींचे विवाह, वृद्धत्व, आजारपण, अकस्मात निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्या याचा विचार करावाच लागतो. तुम्ही तो करीत असणारच. नोकरीत असल्यामुळे काही वेतन मिळत असेल पण ते कितीसं पुरणार? मोकळेपणानं बोलाल तर मला आवडेल.''

स्वस्थपणानं मी ऐकलं. मला हे सर्व नवीन होतं. आला दिवस गेला असं माझं आयुष्य सुरू होतं. कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार ऐकून बुचकळयात पडलो. त्यांनी याचा विचार करावा हे सारं नवीनच होतं.

''तुम्ही म्हणता ते खरं आहे. विचार करून सांगेन केव्हातरी'' असं म्हणून सुटका करून घेतली. विषय तिथेच संपवला.

काही महिने उलटले. पुन्हा जेव्हा बोलत बसलो तेव्हा काय विचार केलात असं त्यांनी पुन्हा विचारलं. तेव्हा बोलावच लागलं.

''दिल्लीत आणि महाराष्ट्रात अनेकजण तुम्हाला भेटतात. अपेक्षा व्यक्त करतात. मागणी सांगतात. गाऱ्हाणी सांगतात. या ना त्या रूपानं तुम्ही ते निस्तरता. समाधान करता. मागणी मान्य असल्याची अनुभूती देता. मी पण एक मागणी करणार आहे.'' एवढं बोललो आणि थांबलो. सांगणं पूर्ण झालं नव्हतं तरी थांबलो. सांगावं न सांगावं असा गोंधळ मनात सुरू होता.

''बोला, बोला. मोकळेपणानं सांगा. तुमच्या मागणीची पूर्तता करण्याचं समाधान मला मिळू द्या. बोला.'' _ यशवंतराव

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com