विरंगुळा - ४८

जॅको हिल येथून सिमल्याचे खरे दर्शन घडते. चार-पाच टेकड्यांवर विस्कटून पसरलेल्या या शहराचे स्वरूप असे एक सौंदर्य आहे असे मला वाटते. आकाशात उंच उंच गेलेल्या देवदारच्या झाडांच्या गर्दीत हे शहर जणू काय लपून बसले आहे असे भासते. नदीच्या घाटावर बांधलेला घाट जसा असतो ना तसे टेकड्यांच्या उतरणीवर हे शहर ठेवले आहे. इमारतीच्या तळमजल्यासमोरून एक रस्ता जाईल तर त्याच्यावरचा रस्ता इमारतीच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मजल्यासमोरून जाताना दिसतो.

मी राहतो ते सेसिल हॉटेलचे प्रवेशद्वार ज्या रस्त्यावर आहे तो महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर सर्व प्रमुख कचेऱ्या आहेत. या रस्त्याच्या काही भागाला 'लजपतराय रोड' असेही म्हणतात. कारण या रस्त्यावरील एका चौकात किंवा प्रशस्त भागात लालाजींचा एक भव्य पुतळा उभा केला आहे. पंजाबच्या या थोर जुन्या नेत्याची ही मूर्ती लाहोरहून फाळणीच्या वेळी आणली आहे. सिमला ही पंजाबची तात्पुरती राजधानी होती आणि अजूनही काही कचेऱ्या येथे काम करीत आहेत. आवती भवती सर्व हिमाचल प्रदेशच्या मुलुखामध्ये सिमला हे पंजाबातील शहर अशी मोठी चमत्कारिक परिस्थिती आहे. परंतु १९४७ ते ५०च्या बिकट काळातील परिस्थितीचा हा एक अपरिहार्य अवशेष आहे.

हिमाचल प्रदेश हे काय प्रकरण आहे आणि भूगोलात (नकाशात) नेमके कोठे आहे हे आजपर्यंत मला स्पष्टपणे समजले नव्हते. अज्ञान काही ठिकाणी तरी लपवून उपयोगी नाही. परंतु कालका ते सिमला प्रवासात हे अगदी स्वच्छ होते. इतस्तत: पसरलेल्या छोट्या छोट्या वस्त्या हे या भागाचे न दिसण्यासारखे वैशिष्ट्य वाटले. दऱ्याखोऱ्यात जिकडे पहाल तिकडे व रेल्वेच्या काठाकाठाने मला 'नागरवस्ती' दिसली. डोंगराच्या उतरणीवर श्रमपूर्वक तयार केलेली ही शेतीही दिसते. असाच या पहाडात, दऱ्याखोऱ्यात पसरलेला दहा लाख वस्तीचा हा हिमाचल प्रदेश आहे.

काल गव्हर्नरकडे झालेल्या चहापानाच्या वेळी हिमाचल लोकनृत्याचा कार्यक्रम झाला. मला फारसा आवडला नाही. परंतु हिमाचलचे एक मंत्री सहजगत्या त्या नृत्यात सामील होऊन एकजीव झाल्याचे दृश्य मात्र समाधानकारक होते यात शंका नाही.

संध्याकाळी येथून निघण्याचे नक्की केले आहे. पंजाबचे पी. डब्ल्यू. डी मंत्री हेच स्थानिक स्वराज्य मंत्री आहेत. त्यांच्याशी गप्पा करीत असताना 'भाक्रा नानगल' आणि 'चंदीगड' पाहण्याची कल्पना निघाली. बहुधा माझी प्रकृती बरी असेल आणि रिझर्व्हेशन बदलणे शक्य असेल तर ही स्थाने पाहूनच पुढे जाण्याचे ठरवावे लागेल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com