विरंगुळा - ५

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्याचा दौरा केंद्रीय अन्नमंत्री रफि अहमद किडवाई यांच्या समवेत करताना यशवंतराव मुद्दाम निंबर्गी येथे गेले. त्यासंबंधी पुढील नोंद वाचल्यावर दुष्काळाच्या तात्कालिक आपत्तीस तोंड देताना यशवंतराव महाराष्ट्रातील प्रश्नाचा कसा मूलभूत विचार करीत होते हे समजून येते. त्यांनी लिहिले आहे ''शेतकी खात्यातील श्री. शिरोळे हे, त्यांनी निंबर्गी येथे बरीच वर्षे केलेल्या नाला बंडिंगच्या कामाचे परिणाम दाखविण्यासाठी हजर होते. छोटा ओढा अडवून केलेल्या नाला बंडिंगच्या परिणामाचे प्रात्यक्षिकच पहावयास मिळाले. जमिनीच्या पोटातील पाण्याचा प्रवाह कमी खोलीवरच लागू लागला हा मोठा फायदा दिसला. सहा ते आठ फूट खोलीत इंजिन चाललेले दिसले. चार मोठे पाण्याचे झरे दिसले. एका विहिरीवर वीस एकराच्या पुढे ऊसाचे पीक भिजत असल्याचे पाहिले. छोटे बंधारे आणि नालाबंडिंग हे दुष्काळी कामावरचे कायमचे उपाय आहेत असा माझा विश्वास होता तो खऱ्या अर्थान द्विगुणित झाला. बंडिंगची आणि अन्य दुष्काळी कामे पाहून किडवाईंच्या मनावर खूपच चांगला परिणाम झालेला दिसला. सोलापूरच्या बैठकीत, मुंबई सरकारचे काम योजनाबद्ध चालू आहे असे त्यांनी स्पष्ट मत दिले.'' पुढे यशवंतरावांनी लिहिले आहे - ''दौरा संपल्यावर मुंबईमध्ये किडवाईंची त्यांच्या मुक्कामी भेट घेऊन दौऱ्यात झालेल्या चर्चांचे व प्रश्नांचे निराकरण घेऊन कांही निर्णय निश्चित केले.''

२ मे १९५३ ला मुंबईला काणसजी जहांगिर हॉलमध्ये रेशनिंगचा दहावा वाढदिवस यशवंतरावांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. त्यासंबंधी पुढील नोंद केली आहे. ''समारोपाचे भाषण करतानाही, रेशनिंगने एका कठीण काळात बजावलेली कामगिरी गौरविली. ज्यांनी ज्यांनी ही कठीण कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम केले आणि बुद्धिचातुर्य दाखविले त्यांनाही धन्यवाद दिले. शेवटी - But I cannot wish Rationing a long or Prosperous Life असे म्हटले तेव्हा त्यातील विनोद आणि सत्य दोन्ही जमलेल्या सर्वांनी खिलाडू वृत्तीने हशा व टाळयांच्या गजरात स्वीकारले. नोंद वाचल्यावर यशवंतरावांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा वास्तववादी दृष्टीकोन समजून येतो.

भाषावार प्रांतरचनेसंबंधी ७ जानेवारी १९५३ला यशवंतरावांनी जी नोंद केलेली आहे ती त्यांच्या या प्रश्नासंबंधीच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारी आहे. म्हणून या महत्त्वाच्या नोंदीतील बराच भाग मी उदधृत करीत आहे.

''मोरारजी भाईंनी हैद्राबाद येथील वर्किंग कमिटीच्या बैठकीत काय विशेष घडले ते सारांशरूपाने सांगितले. हैद्राबादचा प्रश्न निघाला असताना 'हैद्राबादची विभागणी मी होऊ देणार नाही, प्रसंग पडल्यास सैन्य नेऊन उभे करीन' असे उद्गार पं. नेहरूंनी काढल्याचे मोरारजी भाईंनी सांगितले.

भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व एकदा आंध्राला मान्यता देऊन स्वीकारल्यानंतर हैद्राबादच्या विरोध करण्यामागे काय विचार आहे हे मला समजत नाही. पंडितजींसारखा लोकमताच्या नाडीवर हात असणारा मनुष्य या प्रश्नाच्या बाबतीत बेफिकीर का हेच कळत नाही.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com