विरंगुळा - ७३

जोरहाट (आसाम)
१४ नोव्हेंबर १९६३

प्रिय सौ. वेणुबाईस,

आता रात्रीचे १० वाजले आहेत. सबंध दिवसाचे कार्यक्रम संपवून थोड्याच वेळापूर्वी मोकळा झालो. उद्या सकाळी परत ७ वाजता प्रवास सुरू होईल.
 
जोरहाट हा आसामच्या पूर्वेकडील जिल्हा आहे. या जिल्ह्याचे प्रमुख स्थान ५०-६० हजार वस्तीचे गाव आहे. ब्रह्मपुत्राच्या दक्षिण किनाऱ्यावर पसरलेला हा जिल्हा नागाभूमीच्या शेजारी आहे. या ठिकाणी आपले वैमानिकदलाचे एक केंद्र आहे. या केंद्रात मी तीन-चार तास काढले. संध्याकाळी नागरिकांची एक जाहीर सभा झाली. या सभेत शहर नगरपालिकेने मानपत्र देऊन सन्मानही केला. कशासाठी कोण जाणे? मंत्र्यांना अजूनही मानपत्रे देणारे लोक पाहिले की मला तरी हसायला येते. पण गंभीर मुद्रेने ते स्वीकारावे लागते. तसे मी स्वीकारले.

आज सकाळी दीड तासाच्या प्रवासानंतर प्रथम अलाहाबादला उतरलो. या प्रसिद्ध शहराच्या भूमीस मी प्रथमच स्पर्श केला. सर्व वेळ विमानतळावर काढून तेथूनच पुढचा तीन तासांचा प्रवास करून येथे आलो. अलाहाबाद शहराचे दर्शन आकाशातूनच घेतले. पुन्हा केव्हा तरी शहर पहाण्यासाठी आले पाहिजे. अलाहाबादच्या विमानतळावर आज एक छानदार कार्यक्रम झाला. तेथे शहरवासीयांची यात्राच भरली होती म्हणाना. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची तर झुंबडच उठली होती.

अलाहाबाद ते जोरहाट हा प्रवास फारच सुरेख झाला. आम्ही १७ हजार फूट उंचीवरून चाललो होतो. आकाश अगदी स्वच्छ होते. ऐन दुपारची १२॥ ची वेळ. सूर्यप्रकाशाने अस्मान एकदम उजळून गेले होते. त्यावेळी उत्तरेकडे हिमालयाच्या हिमाच्छादित शिखरांची एक रांगच्या रांग उभी होती. जगप्रसिद्ध सर्व उंच शिखरे कवायतीसाठी जणू काही एका ओळीत, शिस्तीत उभी आहेत काय असे माझ्या मनात येऊन गेले (Peaks on parade) विशेषत: धवलगिरी मौंट एव्हरेस्ट (गौरी शंकर) आणि कांचनगंगा यांचे स्पष्ट दर्शन झाले. विशेष म्हणजे या सर्वांचे एक समयावच्छेदे-एका नजरेत एकदम दर्शन! माझे मन तर फुलून गेले. हे सर्व चित्र जवळजवळ अर्धा तास एकसारखे डोळ्यापुढे होते. हा आनंद पुन्हा मिळवतो म्हटले तरी पुन्हा मिळेलच असे सांगता येणार नाही. आमचे विमान चालले होते तेथून सुमारे १००-१२५ मैलावर ही सर्व शिखरांची रांग होती. पण दहा-वीस मैलावर असावी इतकी ती जवळ वाटत होती. दुरून रम्य दिसणारे हे दृश्य जवळ गेल्यानंतर किती कठोर होते याचा अनुभव तेथे प्रत्यक्ष गेलेल्यांनी जाहीर केलेलेच आहेत. ही गोष्टही मनात आल्यावाचून राहिली नाही. या गावात सूर्य ४॥ वाजताच मावळतो. थंडी बेताचीच वाटली. Good Night
-यशवंतराव

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com