ऋणानुबंध (131)

भाषेच्या ह्या स्वरूपाचा प्रभाव मराठीच्या साहित्यावर पडणे स्वाभाविकच होते. गेल्या सात-आठशे वर्षांपासून, ज्या विचारमंथनातून मराठी साहित्याने मार्ग काढला आहे, त्याची पार्श्वभूमी मराठी भाषेच्या इतिहासात सापडते. एकीकडे ही मराठी भाषा साधुसंत आणि धर्मप्रचारकांच्या उपदेशाचे माध्यम बनली आहे; तर दुसरीकडे हीच भाषा युद्धक्षेत्रात, शत्रूला ललकारून रणभेदीचा निनाद करताना आढळते. कल्पनातीत कोमलता, त्याचप्रमाणे वज्राची कठोरता हे दोन्ही भाव मराठीत सहजपणे सापडतात. जसजसा मराठी साहित्याचा विकास होत गेला, ह्या साहित्यावर काळ, परिस्थिती आणि लोकजीवन ह्यांचा परिणाम होत गेला व त्यामुळेच, त्या त्या काळातील सर्वच विचारप्रवाह, आकांक्षा आणि सामान्य जनतेच्या आवश्यकतांचे प्रतिबिंब ह्या भाषेतील तत्कालीन साहित्यात आढळते. यादवकाळ आणि मराठा युग ह्या वेळी आमच्या कवितेने पोवाड्याचे रूप घेतले आणि वीररसप्रधान साहित्य निर्माण झाले, तर पेशवाईत आणि नंतरच्या काळात, लावणीने जन्म घेतला आणि मराठी कवितेत माधुर्याने प्रवेश केला. लावणीने मराठी भाषेला लावण्यमयी बनविले व ही लावणी स्वत: लावण्य शब्दाची प्रतीक बनली.

आधुनिक काळात, साहित्य हे मर्यादित स्वरूपात न राहता आता साहित्याने सारे लोकजीवन व्यापले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जसजसे फेरबदल झाले, त्या अनुरोधाने मराठी साहित्यातील विचारप्रवाह पण बदलत राहिले.
देश आणि समाजातील परिस्थितीचा साहित्यावर प्रभाव पडणे स्वाभाविकच असते. महाराष्ट्रातील संतांची वाणी आणि त्यांचे जीवन, तसेच शिवाजीच्या काळातील मराठा वीरांची देशभक्ती आणि शौर्याची कामे ह्यांचा तत्कालीन साहित्यावर काय परिणाम झाला, हे सर्वांना माहीतच आहे.

आता आमचा देश राजकीय बंधनातून मुक्त झाला असून, त्याने स्वतंत्र प्रजासत्ताकाचे रूप धारण केले आहे. राजकीय उन्नतीबरोबरच आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजना आमच्यासमोर आहेत. आता वैज्ञानिक, औद्योगिक आणि तांत्रिक विषयांवरील ग्रंथरचना यांना आमच्या शिक्षणात आणि साहित्यात एक उपयोगी अंग म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असे जरी असले, तरी ज्याला आम्ही अक्षर-वाङ्मय म्हणतो, त्याची प्रत, ह्या सर्वांपेक्षा भिन्न असते. असे साहित्य मानवाच्या मूलभूत सद्भावनांना आवाहन करते आणि मानवाला जीवनसंघर्षासाठी समर्थ बनविते. अशा साहित्यामुळे समाज नित्य प्रगतीला अभिमुख राहतो.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com