१२३

पॅरिस हे मूलत: विद्येचे केंद्र म्हणून वसले आणि तसेच ते वाढता वाढता वाढले. मग त्यात राज्यक्रांत्या, साहित्य, कलाविकास यांच्या सोपस्कारांनी या शहराचे व्यक्तिमत्व अनेक शतकांनी घडविले आहे. पॅरिसची जनता हे वैशिष्टयपूर्ण व्यक्तिमत्त्व मोठया जागरूकतेने राखीत असते असे वाटते.

नवे वाढते पॅरिस- जे मी विमानतळाच्या आसपास पाहिले ते - आधुनिक अमेरिकन संपन्नतेची कृत्रिम नक्कल करीत आहे यात शंका नाही. पण पॅरिसचे मुख्य केंद्र म्हणजे शतकानुशतकाच्या जुन्या इमारती, जुने चौक, जुने शिल्पकाम, इतिहासाची साक्ष देत, फ्रान्सचे वैशिष्टय ठेवून जसेच्या तसे आहे.

आज व्हर्सिलचा राजवाडा व आसमंत पाहिले. १४ व्या लुईच्या वेळी हा राजवाडा बांधला गेला. एका अर्थाने राज्यकर्त्या वर्गाची म्हणजे अमीर उमरावांची ती एक वेगळीच वसाहत झाली. त्या राजवाडयाचे वैभव डोळे दिपण्यासारखे आहे. तेथील मौल्यवान ऐतिहासिक फर्निचर, चित्रकलेचा व वैभवविलासाचा कळस येथे पहावयास मिळतो.

१४ व्या लुईच्या पराक्रमामुळे ते वाढले व शोभलेसुध्दा. परंतु पुढे राज्यकर्ते जनतेपासून दूर राहिले आणि या राजवाडयाच्या आसमंतात विलासात रममाण झाले तसे; फ्रान्समध्ये राज्यक्रांतीची बीजे पेरली गेली. १६व्या लुईच्या वेळी क्रांतीच्या ज्वाळा या राजवाडयाच्या रोखाने आल्या. जनतेच्या रोषाचे ते लक्ष्य झाले होते.

काळ बदलला आहे. फ्रान्स बदलला आहे. आज जवळ जवळ तीनशे वर्षांनी हा राजवाडा लोकांच्या उत्सुकतेचे एक आकर्षण आहे.

आज रविवार म्हणून मी दुपारी तीन वाजता तेथे गेलो. अक्षरश: हजारो माणसे रीघ करून तेथे होती. परदेशांतून आलेली तर होतीच, शिवाय पॅरिसच्या बाहेरून, फ्रान्समधून आलेल्या लोकांचीही संख्या फार होती. तरुण स्त्री-पुरुष, वृध्द, मुले जुन्या फ्रान्सचे हे वैभव विस्फारित नेत्रांनी पहात होते.

 राजवाडयाच्या अवतीभवती विस्तीर्ण उद्याने आहेत. आपली दिल्लीची राष्ट्रपतिभवनमधील मोगल गार्डन याच्या तुलनेत केवळ केविलवाणी वाटते.

हॅसिलमध्ये जवळजवळ दोन अडीच तास काढले. तेथून येथील कलाकारांचे केंद्र पाहण्यासाठी गेलो. शहराच्या मध्यभागी उंचवटयावर एक प्रसिध्द चर्च आहे. तेथून पॅरिसचा निदान अर्धाअधिक भाग दिसतो. याच चर्चचे शेजारी कलाकारांचे वैशिष्टयपूर्ण केंद्र आहे. बाजारच आहे म्हणाना! एका लहान चौकात चित्रकार आपली चित्रे काढीत उभे असतात. असंख्य स्त्री-पुरुष ती पाहण्यासाठी भोवताली हिंडत असतात. काहींची विक्रीही तेथे होते. जगातील अनेक चित्रकार मान्यता मिळावी म्हणून या बाजारात येऊन जातातच म्हणे! मी तासभर या बाजारात भटकत होतो. अगदी मनमोकळे. अशा अनौपचारिक आयुष्याचा आनंद आगळाच आहे, असा अनुभव आला. आता बहामातून लिहीन.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com