५८ फ्रँकफर्ट
२३ ऑगस्ट, १९७५
फ्रँकफर्टला ९-९॥ वाजता सकाळी पोहोचलो. वाटेत रोमला, त्या विमानात महाराष्ट्रातील ४० द्राक्षमळेकऱ्यांचा, युरोपच्या द्राक्षांच्या बागा पाहण्यासाठी आलेला एक जथा भेटला.
इचलकरंजी, सांगली, तासगाव, बारामती, पुणे, उरळीकांचन या सर्व भागातील नवे-जुने पण अनुभवी जाणते बागाईतदार होते. त्यात शेंबेकरांसारखे मोठे धनिक शेतकरी जसे होते तसेच चार-सहा एकरवाले लहानही होते. एम्. एस्सी. (अग्री.) होऊन परत स्वत:च्या शेतीवर गेलेला एक उमदा तरुणही भेटला.
मी विमानात आहे असे समजताच सर्वजण भेटून गेले. रोम ते फ्रँकफर्ट या प्रवासात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दौरा करीत असल्यासारखे वाटत होते. काही मंडळी सपत्निक आली होती. मला फार आनंद वाटला आणि अभिमानही.
बागायती शेतीमुळे जवळ आलेला पैसा असा-तसा खर्च करण्यापेक्षा इतर देशातील शेती पाहून आपल्या अनुभवांची क्षितिजे वाढविण्याची नवी दृष्टि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वाढते आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
फ्रँकफर्टच्या विमानतळावर या सर्व मराठी मंडळींबरोबर उतरलो. जर्मन सरकारचे प्रतिनिधी स्वागतासाठी आले होते. त्यांना आमचा हा सर्व जिव्हाळा व गोतावळा पाहून नवल वाटले.
सर्वांच्या बरोबर गटागटाने फोटो झाले आणि मग त्यांचा निरोप घेऊन आपले राजदूत श्री. रहिमान व जर्मन विदेश मंत्रालयाच्या प्रतिनिधींचे स्वाधीन झालो.
फ्रँकफर्ट विमानतळावर गेली ११ वर्षे अनेक वेळा येता-जाता थांबावे लागले होते. परंतु आज प्रथमच विमानतळाबाहेर शहरात प्रवेश केला. हे २० लाख वस्तीचे औद्योगिक व्यापारी केंद्र आहे. माईन नदीचे काठावर अनेक शतकांपूर्वीपासून हे शहर वसले आहे. त्याला जुना इतिहास आहे.
प्रसिध्द जर्मन कवी गटे याचा जन्म इथला. इथेच त्याचे शिक्षण झाले. तरुणपण गेले. एका धनिक घरात याचा जन्म झालेला. त्याचे ते तीन-चार मजली घर येथे आहे. ते पाहाण्यासाठी तास-दीड तास घालविला.
दुसऱ्या युध्दात हे शहर संपूर्ण उद्ध्वस्त झाले होते. सर्व शहर पुन्हा बांधले गेले आहे. या घराचीही तीच अवस्था झाली होती. पुन्हा काहीसे पहिल्यासारखे परत बांधले आहे. मात्र जुनी पुस्तके, फर्निचर, चित्रे सुरक्षित ठेवली गेली होती. त्यामुळे त्या घराच्या स्मारकाला काहीसा जिवंतपणा आल्यासारखे वाटते.
या शहराच्या आसपास सुरेख वनराजी आहे. उंच, हिरव्या पानांची फुललेली ही जंगले पाहिली म्हणजे काश्मीरमध्ये आल्यासारखे वाटते.



















































































































