विदेश दर्शन - १२१

६३ न्यूयॉर्क ते जिनेव्हा
६ सप्टेंबर, १९७५

मी आता संध्याकाळी ७ वाजता न्यूयॉर्क सोडून निघालो आहे. दिल्लीच्या वाटेवर जिनिव्हामध्ये थांबेन व ९ तारखेला दिल्लीस पोहोचेन. १६-१७ दिवस घराबाहेर आहे. घरची ओढ सारखी आहे.

गेला आठवडा न्यूयॉर्कमध्ये काढला. यापूर्वी मी अमेरिकेस अनेकवेळा आलो. परंतु काही तास किंवा एकवेळ एक रात्र एवढाच मुक्काम येथे यापूर्वी करता आला. पण संपूर्ण आठवडा सलगपणे या शहरात प्रथमच मिळाला.

यू. एन्. चा पहिला अनुभव. पण या एका आठवडयातील अनुभवाने मी यात बरेच दिवस रूळल्यासारखे आता वाटू लागले.

इथले वातावरण इतर आंतरराष्ट्रीय परिषदांपेक्षा वेगळे आहे. यू. एन्. मध्ये सगळे जग हजर असते.

मी जागतिक बँक व आय्. एम्. एफ्. बैठका आणि कमिटी मिटिंग्जना पाच वर्षांत अनेक वेळा आलो होतो. परंतु यात सगळे जग नव्हते. जागतिक बँक हे नाव खरे-परंतु सोशॅलिस्ट जग (चीनसह) त्यात समाविष्ट नाही. त्यामुळे ते अपुरे जग होते.

यू. एन्. बैठकात सर्व जगातील स्वतंत्र देशाचे १३८ सभासद आहेत. या वर्षी आणखीन चार-सहा तरी अधिक सामील होतील. येथील वातावरण वेगळे - धीमेपणाचे - समजून घेण्याचे दिसले.

मी गेल्या आठवडयात अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटलो. तपशीलवार चर्चा केल्या. काहींना जेवणा-खान्याच्या निमित्ताने भेटून ओळखीचा श्रीगणेशा केला.

तपशीलवार चर्चा मुख्यत: या स्पेशल सेशनचे अध्यक्ष श्री. बुरीप्लिका-विदेशमंत्रि अल्जेरिया-यांचेशी केली. हे एक तरूण, बुध्दिमान चलाख व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी नॉन-अलाइड व यू. एन्. या दोन्ही क्षेत्रांत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप टाकली आहे.

यांची माझी तशी भेट हॅवाना आणि लिमा येथे झाली होती. परंतु गोष्टी झाल्या नव्हत्या. लिमा येथे भेटून न्यूयॉर्कमध्ये निवांत भेटू असे ठरले होते. तसे येथे भेटलो.

५० मिनिटे चर्चा झाल्या. या स्पेशल सेशनबाबत ते आशावादी दिसले. गेल्या स्पेशल सेशन बोलावण्या पाठीमागेही त्यांच्या देशाचा प्रमुख हात होता. परंतु त्या वेळी मतभेद आणि विरोधी भावनांचे-संघर्षाचे वातावरण होते.

दरम्यानच्या काळात अनेक चर्चा -परिषदा होऊन एकमेकांना समजण्याचे वातावरण निर्माण झाल्याचा पुरावा या परिषदेत मिळाला. प्रगत व अप्रगत देश एकमेकांवर किती अवलंबून आहेत याची प्रचिती प्रगत देशांनाही आली आहे अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com