विदेश दर्शन - १४५

आज संध्याकाळी पुन्हा आमच्या चर्चा झाल्या. अरब कंपाला येथील ठरावाच्या धर्तीवरच येथे ठराव करावा हे एकमताने मान्य केले. एका टोकाचे धोरण न करता आपसांत एकी ठेवण्याचा हा एकच मार्ग होता. अशा गुंतागुंतीच्या व स्फोटक विषयांचे बाबतीत, politics is an art of possible हे अगदी सार्थ आहे.

परिषदेच्या अध्यक्षांना काही काम होते म्हणून, व्हाइस प्रेसिडेंट म्हणून तासभर अध्यक्षीय खुर्चीवर बसून भाषणे ऐकत राहिलो. ७॥ वाजता बाहेर पडलो.

येथे भारत-पेरू सांस्कृतिक स्नेहमंडळ आहे. तिच्या अध्यक्षा मादाम फर्दांदिनी म्हणून ६०-६५ वर्षांची एक धनिक वृध्दा आहे. तिने आपल्या घरी आमच्यासाठी स्वागत-समारंभ ठेवला होता. तेथे गेलो. ही येथील प्रसिध्द स्त्री आहे. या शहराची मेयॉर होती. भारतावर अतोनात प्रेम-प्राचीन देश व संस्कृति यामुळे एक आकर्षण आहे.

हिच्या मालकीच्या सोन्याच्या खाणी होत्या. आजही ती लक्षाधीश आहे. प्रासादतुल्य घरात राहते. विधवा आहे. दोन लग्ने झाली होती. दोन्ही लग्नाची मुले आहेत. तिची मोठी मुलगी ३५-४० वर्षांची असावी. पेरूमधील निवडक भारतीय व पेरूबियन हजर होते. तासभर आनंदात गेला.

रात्री पेरूच्या विदेशमंत्र्यांचा खाना होता. १० वाजता सुरू झाला व १२॥ ला संपला. पेरूनिवासी Black चा सुंदर नृत्य-संगीताचा कार्यक्रम झाला. हॉटेलवर येऊन झोपी जाईपर्यंत १॥ वाजला होता.

उद्या सकाळी ७ वाजता पुढच्या कार्यक्रमासाठी तयार झाले पाहिजे. घरून निघून आठ दिवस झाले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com