विदेश दर्शन - १४७

या खेपेला आमच्या डेलिगेशनमध्ये प्रो. पी. एन्. धर होते. एकत्र काम करण्याची आमची पहिलीच वेळ होती. छान मनुष्य वाटला. मला वाटते, माझे कोणाशीही कामाच्या बाबतीत जमून जाते.

पॅरिसला खूप थंडी होती. पण थंडी भासते बाहेर - रस्त्यावर - बाकी सर्वत्र सेंट्रल हीटिंग.

श्री. उदय अभ्यंकर - हा तरुण अधिकारी माझ्या साथीला होता. मी या मुलाला लहानपणापासून ओळखतो. त्याचे वडील मुंबईला कमिशनर होते. बुध्दिमान आहे. घरगुति जिव्हाळयाने वागला. त्याची पत्नी म्हणजे श्री. केवलसिंग यांची कन्या. एका रात्री त्यांचेकडे जेवलो. पंजाबी व मराठी जेवणाचे पदार्थ करून पोटभर जेवू घातले.

श्री. विमल सन्याल हे उत्तम अधिकारी. आनंदी. कष्ट करण्याची तयारी. सर्वांशी चांगले संबंध. परिषदेच्या कामाचा सर्व बोजा त्यांनी सांभाळला. त्यांची मला अतिशय मदत झाली.

डेलिगेशन अकारण मोठे झाले होते. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर हे स्पष्ट झाले. प्रत्येक मिनिस्ट्रीला आपला प्रतिनिधी असावा असे वाटते. त्या मानाने त्यांना काम कमी असते. अकारण खर्च. पुढे काळजी घेतली पाहिजे.

कुठे बाजार-दुकान (पुस्तकाचेही), नाटक, नृत्य वगैरे काही काही करता आले नाही. हॉटेल ते कॉन्फरन्स-हॉल असा प्रवास नित्य चालू होता. पॅरिसमध्ये कामात दिवस आणि वेळ कसा गेला समजलेही नाही.
आता येथे (रोममध्ये) वेळ जाता जात नाही. मुंबईला किती तास उशीरा पोहोचणार व केव्हा पोहोचणार हेच माहिती नाही. तेथील कार्यक्रमांची सर्वच गडबड होणार असे दिसते. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. पण माझा काही इलाज नाही.

या खेपेला पॅरिसमध्ये मी जास्तीत जास्त दिवस राहिलो. पण विशेष काही पाहू शकलो नाही. पोहोचलो त्या संध्याकाळी अर्धा तास उदय अभ्यंकरबरोबर बाहेर मोटारीतून चक्कर टाकली. Nolvi Dam कॅथिड्रलजवळ खाली उतरून थोडा चाललो. चिक्कार थंडी होती. नाक-कान गारठून गेले.

रविवार होता. रात्रीचे ८ वाजले होते. तरी तरुण स्त्री-पुरुष कॅथिड्रलमध्ये जाताना दिसले म्हणून आम्हीही आत गेलो. ख्रिसमस आठवडयावर आला आहे. कॅथिड्रल, तरुण व मध्यम वयाच्या स्त्री-पुरुषांनी भरून गेले होते. गंभीर आवाजात धर्मगुरु प्रार्थना वाचीत होते वातावरण शांत व गंभीर होते.

इकडे धर्माबाबत उदासीनता असते - विशेषत: पॅरिसमध्ये - ते खरे नाही असे दृश्य पाहून वाटले. ख्रिसमसच्या खरेदीसाठी मात्र कोठे दुकानांतून गर्दी दिसली नाही. काही दुकानांत आरास वगैरे दिसली. पण गिऱ्हाइकांची गर्दी कोठेच आढळली नाही.

पॅरिसचे एक नवे आकर्षण या वेळी लक्षात आले. (खरे म्हणजे जुनेच. मी प्रथम पाहिले म्हणून नवे.) दुपारच्या प्रवासात शहराच्या ऐन मध्यभागी एक दोन मैल लांब-रुंद असे विस्तीर्ण फॉरेस्ट पाहिले. हिवाळयामुळे झाडे निष्पर्ण होती. पण उंच झाडांचे हे वन पाहून मन हरखून गेले. गाडीतून उतरून चालण्याचा मोह झाला. पण थंडीमुळे तो मोह आवरावा लागला.

आता रात्रीचे १२। झालेत. अजूनही आमचे विमान लंडनहून निघालेले नाही.

Wait and watch-as we always do!

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com