विदेश दर्शन - १५

तेजूच्या वाटेवर नवीन होणारा विमानतळ आहे. त्याची जागा आणि सुरू असलेली प्रगती पाहून आम्ही पोलिटिकल ऑफिसरच्या घरी चहासाठी पोहोचलो. चहा घेऊन जाहीर सभेच्या ठिकाणी आलो.

स्थानिक वन्य जातीचे लोक, व्यापारासाठी आलेले आसामी व इतर लोक, सरकारी नोकर वगैरे मंडळी 'प्रेक्षकां' मध्ये होती. स्थानिक जमातींतील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा एक गटही तेथे मी पाहिला.

या श्रोतृवर्गाला मी 'प्रेक्षक' हेतुपुरस्सर म्हटले आहे. ते सर्वजण पाहण्यासाठी आले होते. त्यांची भाषा मला समजत नव्हती व माझी त्यांना कळत नव्हती. त्यांच्यापैकी हिंदी समजणाऱ्या एका माणसाला मी जवळजवळ वेठीला धरून माझ्या भाषणाच्या वाक्यावाक्याचे त्यांना भाषांतर करून सांगावयास लावले. मी थोडाच वेळ बोललो पण माझे म्हणणे त्यांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचे मला समाधान झाले.

या सभेनंतर निर्वासित तिबेटी लोकांचे वसलेले एक गाव जवळच आहे, त्या गावी आम्ही गेलो. हे एक छोटेखानी गाव. पुरूष, स्त्रीया व मुले सर्वजणच रस्त्यावर उभे होते. अतिथीच्या सत्कारातील या लोकांची भाविकता पाहिली म्हणजे त्यांच्या आणि आपल्या परंपरा एकच आहेत असा प्रत्यय येतो.

प्रथमत: त्यांची जी गुंफा - म्हणजे बुध्दधर्मीयांचे प्रार्थनामंदिर असते ते सर्व गुंफानिवासी पाहुण्यांना घेऊन जातात. आशीर्वाद देतात व मग बाकीचे कार्यक्रम!

मुला-मुलींचे तिबेटी नाच, गाणी ऐकून तिबेटी लोकजीवनाची एक छटा समजली. हे लोक दलाई लामा यांच्याबरोबर अनंत अडचणी सोसून हिंदुस्थानात आले आहेत.

बर्फाच्या प्रदेशातून प्रवास करीत असताना त्यांच्यापैकी शेकडो लोक थंडी, वारा, भूक व आजार यांना बळी पडले. परंतु त्यांची श्रध्दा अपार आहे.

या देशात आले आहेत खरे, परंतु आपला दलाई लामा परत तिबेटमध्ये जाणार आणि मग त्याच्या बरोबर आपणही जाणार अशी निष्ठा ते मनात बाळगून आहेत. तो दिवस लवकरच म्हणजे दोन वर्षांतच उगवणार आहे असेही ते मानतात म्हणे!

श्रध्दा ठीक आहे. पण हे घडणार कसे ? चीनमधील कम्युनिस्ट राजवटीची उलथापालथ केल्याशिवाय हे कसे शक्य आहे ? हा राजकीय प्रश्न आहे व त्याचे उत्तरही राजकीय असले पाहिजे हा तर्कवाद मी त्यांच्याशी घातला नाही. श्रध्दा म्हणजे श्रध्दा ! तर्काची खटखट त्या क्षेत्रात कशाला?

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com