विदेश दर्शन - १७५

८९ न्यूयॉर्क
२८ सप्टेंबर, १९७६

सतत २४ तास प्रवास करून येथे ता. २६ ला तिसऱ्या प्रहरी पोहोचलो. असा प्रवास पुन्हा करणार नाही असे स्वत:सच बजावले. विमानाच्या प्रवासाची थकावट म्हणजे काय असते, हे परवा मंगोलियाच्या व आता या थेट न्यूयॉर्कच्या प्रवासाने चांगलेच अनुभविले. दोन दिवस नियमित झोप मिळाल्यावर आता पुष्कळच उत्साह आहे.

निघताना मन कष्टी होते. प्रवास सुरू होण्यापूर्वीचे मुंबईतले चार-सहा तास काही सुचतच नव्हते. या खेपेला तू फारच मनाला लावून घेतले होतेस. पण हे माझे म्हणणेही बरोबर नाही. मी तुझ्या मन:स्थितीत जाऊन विचार करीत नाही. माझे लागोपाठ लांबचे प्रवास, त्यामुळे एकाकी जीवन काढण्याचे प्रसंग आल्याशिवाय इतरांना आणि मला तुझी भावना समजणार नाही हे खरे. तू म्हणालीस की, 'तुम्ही म्हणाल फारच दुबळी झाली आहेस.' ते वाक्य मी विसरू शकत नाही.

मी तुला दुबळी कसा म्हणेन! वर्षानुवर्ष तू जे सहन केले आहेस आणि तरीही हसतमुखाने व दर्जेदार खानदानी वागणुकीने, ते मी कसा विसरेन. असहाय्यताही सहन करण्याची मर्यादा आहेच की. तेव्हा मनाला आवरणे अशक्य होते. तसे झाले त्या दिवशी.

तुझे अश्रू पाहिले आणि माझे मी लपविले. खरं सांगू, अगदी ओक्साबोक्शी रडून घ्यावं असे वाटत होते आणि ते घडत नव्हते. त्यामुळे त्या मनावरच्या ओझ्यानेच हा सर्व लांबलचक प्रवास केला. तुझ्याशी टेलिफोनवर बोललो आणि मन हलकं झालं. या खोलीत एकटाच पुष्कळ वेळ बसून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तू कशी दुबळी? खरं म्हणजे मीच फार दुबळा आहे. इतरांना दिसत नाही. दाखवायचं नसतं. मोठेपण - वडीलधारेपण हे सर्व काही आहे ना ? त्याच्यासाठी समर्थपणाचे मुखवटे चढवायचे आणि वागायचे. या दुबळेपणाची जाण मनाला शक्ती देते. कुणासाठी तरी दुबळेपण यावे अशी जवळची माणसे आयुष्यात असणं हेच जीवनातलं सर्वस्व आहे. पुन्हा एकदा तूच ते सर्वस्व आहेस या अनुभूतीतून गेलो - आणि नंतर मनाला ताकद आली.

तू म्हणशील की हे सर्व का लिहिता आहात? गरज आहे का याची? कोण जाणे? पण हे सर्व लिहिल्यामुळे माझे मन पुष्कळच मोकळे झाले. तुला हे सर्व सांगितले यातही आनंद आहे.

माझे काम नेहमीप्रमाणे उत्तम चालले आहे. पण त्या बाबतीत स्वतंत्र लिहीन. इथे त्याची गर्दी नको.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com