विदेश दर्शन - १८०

दुपारचे जेवण नासा केंद्रात केले. अर्धा तास विश्रांति घेऊन येथील युनिव्हर्सिटी कँपस् मध्ये गेलो. तेथे हिंदी समाजाची सभा होती.

सभेत मी २०-२५ मिनिटे बोललो. एक तासभर तेथे हिंदुस्थानच्या आजच्या परिस्थितीबाबत माझी उलट तपासणी, प्रश्नोत्तरांच्या रूपाने झाली. पाच चार चळवळे त्यात होते. हातवारे, आरडाओरडा करण्याचा त्यांचा स्वभाव दिसला. काही चमत्कारिक प्रश्नही त्यांनी विचारले.

मी शांतपणे उत्तरे देत होतो. वर उल्लेखिलेल्या लोकांखेरीज ५००-६०० लोक उत्तम सहकार्य देत होते. माझ्या उत्तरांना टाळया वाजवून संमति व समाधान व्यक्त करीत होते. रात्री फॉरिन अफेअर्स इन्स्टिटयूशनपुढे बोललो. फक्त निवडक अमेरिकन्स होते. सर्व तऱ्हेचे वेचक प्रश्न विचारले. यशस्वी बैठक.

हूस्टन शहर व आसमंतात तीन हजारांवर भारतीय कुटुंबे आहेत. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्रोफेसर्स याशिवाय स्वत:चे उद्योगधंदे करणारेही बरेच आहेत. त्यांत महाराष्ट्रीय कुटुंबेही आहेत. बरेचजण सभेच्या ठिकाणी आग्रहाने भेटले.

सकाळी हूस्टन सोडून निघालो. वाटेत येथील भारतीयांनी येथे एक मंदिर म्हणून बांधलेली जागा घेतली आहे. तेथे अर्धा तास काढला. इतक्या दूर अंतरावर आपल्या चालीरीति व संस्कार यांची किती ओढ असते त्याची कल्पना आली.

अजून खरे मंदिर व्हावयाचे आहे. पण एका हॉलमध्ये धार्मिक तसबिरी -प्रमुख ठिकाणी राम-सीता, ॐ , गणेश या होत्या. आदबीने पूजास्थानी मांडल्या होत्या. आरती झाली. 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही गणेशाची आरतीही झाली व 'घालीन लोटांगण वंदीन चरण' हेही झाले. सर्वांमध्ये घरगुती जिव्हाळा होता.

पूजा-आरती सर्व झाले नि मी सर्वांचा निरोप घेण्यासाठी गेलो. सर्वांनी एकच प्रश्न केला, ''वेणुताई कशा आहेत? त्यांना बरोबर का आणले नाहीत?''

इतक्या दूर राहणारी माणसेही तुझी इतक्या आपुलकीने चौकशी करतात या विचारानेच मी तृप्त झालो. त्यांचे मनापासून आभार मानून निरोप घेतला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com