विदेश दर्शन - ८७

४५ न्यूयॉर्क
६ ऑक्टोबर, १९७४

काल संध्याकाळी चार वाजता येथे आलो. भारत-सरकारच्या नव्या काटकसरीच्या धोरणाप्रमाणे या नव्या हॉटेलमध्ये (The Alrae) उतरलो आहे.

बोस्टनमध्ये कालची सकाळ अतिशय आनंदात गेली. चार्ल्स नदी ओलांडून पलीकडे असलेल्या जगप्रसिध्द विद्यानगरात (केंब्रिज) येथे एम्. आय. टी. (मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी) आज जवळजवळ शंभर वर्षे शिक्षण व संशोधन करणारे खाजगी विद्यापीठ आहे.

अलीकडे २५ वर्षांत सरकारी संशोधनाचे प्रकल्प घेतात म्हणून काही ग्रँट्स् घेत आहेत. अमेरिकेतील प्रसिध्द नोबेल प्राइझ विनर्स या संस्थेमध्ये व हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहेत म्हटले तरी चालेल. प्रसिध्द भारतीय संशोधक श्री. खुराना एम्. आय. टी. मध्ये आहेत.

एम्. आय. टी. च्या आसमंतात थोडा वेळ घालविला आणि नंतर हॉर्वर्ड-आवारात गेलो. हॉर्वर्डच्या कँप्स्मध्ये मात्र पायी भटकलो. प्रसिध्द हॉर्वर्ड-यार्डमध्ये जुन्या इमारतींच्या शांत वातारणात भटकताना १९३० साली शाळेत असताना, पुणे पहायला गेलो तेव्हा फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणात भटकताना जसे वाटले तशी नेमकी भावना व प्रसन्नता होती.

नेमकी या युनिव्हर्सिटीच्या समोर, नदीपलीकडे, बोस्टन युनिव्हर्सिटी आहे. एक सुरेख शहर आहे. शहराचे काही विभाग जुनेपणा टाकून नवे बनत आहेत. 'नवे शिक्षित लोक नोकरीसाठी व राहण्यासाठी हे शहर अधिक पसंत करतात,' (न्यूयॉर्कच्या तुलनेने) असे श्री. क्रॅफ्ट्स् म्हणत होते.

नंतर २०-२२ मैल प्रवास करून जेथे स्वातंत्र्ययुध्दाची पहिली लढाई झाली त्या भागात गेलो. पहिली गोळी कुठे उडाली ते स्थळही त्यांनी स्मारक म्हणून ठेवले आहे. एका रेस्टॉराँमध्ये जेवण करून विमानतळ गाठला.

येथे आलो. जवळपासची एक दोन बुक-शॉप्स् पाहिली. संध्याकाळी ब्रॉडवेवर अॅम्बॅसडर थिएटरमध्ये Capino हे विनोदी नाटक पाहिले. नाटक हलके-फुलके होते पण छान रंगले. आपल्या नाटकांपेक्षा वेगळे तंत्र वापरतात. प्रेक्षक व नटसंच एक असल्यासारखे वातावरण होते. दोन अडीच तास कसे गेले ते समजले नाही.

एका रेस्टॉराँमध्ये जेवलो. डोळयांवर चिक्कार झोप होती. येऊन झोपलो तो सकाळी ८ वाजता उठलो.

आज दुपारी श्री. आय्. जी. पटेल आणि श्री. जगन्नाथन्, मनमोहन या मंडळींशी 'फ्लोटिंग ऑफ एक्चेंज रेट' वर चर्चा आहे. नंतर श्री. आय्. जी. पटेल यांच्या घरी जेवण आहे. (येथून त्यांचे घर बरेच लांब आहे म्हणतात.) ३॥-४ पर्यंत तेथून परत येऊन ६॥ पर्यंत मॉडर्न आर्टस् म्युझियम पाहून सरळ आठ वाजता विमान गाठण्यासाठी निघावयाचे आहे.

उद्या सकाळी लंडन व तेथे न थांबता एअर-इंडियाचे जे पहिले विमान मिळेल त्याने दिल्ली. पंधरा-सोळा दिवस झाले. आता अगदी कंटाळा आला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com