मराठी मातीचे वैभव- १०

यतीनदासांच्या यतिव्रती निर्धारी उपोषणात मन, बुद्धी, आत्मा व जीवन अडकलेला कर्हाडमधील चव्हाणांचा शाळकरी यशवंता ठरावीक ठिकाणी शाळा सुटल्यावर जाऊन ती पत्रके हस्तगत करी.  गुपचूप ती वाचून काढी.  यतीनदासांच्या ढासळत्या प्रकृतीनं यशवंत अस्वस्थ, सैरभैर होई.  त्याला काही सुचत नसे.  

यतीनदासांचं हे उभा देश हेलावून टाकणारं उपोषण त्या वेळी सर्वांना पिळवटून काढून पुरे साठ दिवस चालले !  इकडे कर्हाडला यशवंताचा साठ दिवस कोवळा जीव टांगणीला पडला होता.  अडगर-किशोरमनाच्या यशवंतावर असह्य मानसिक तणाव आला होता.  त्याबद्दल त्याला कुणाला बोलताही येत नव्हतं.

या अत्यंत मूकनाट्याचा शेवटी शेवट झाला.  त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर यशवंतानं आपल्या लाडक्या क्रांतिकारकाच्या तब्येतीचा तपशील देणारं पत्रक धडधडत्या काळजानं घेतलं.  आज नेमका तो सुट्टीमुळं कर्हाडहून देवराष्ट्राला जाणार होता एकटाच.  कर्हाडबाहेरची निर्मनुष्य पायवाट सुरू झाली.  शाळकरी यशवंतानं धडधडत्या मनानं आपल्या बंगीतील ते पत्रक बाहेर काढलं.  चालता-चालता तो पत्रक वाचू लागला.  आज त्या गुप्त पत्रकानं आपल्या निर्धारी क्रांतिकारकाच्या दुःखद निधनाची अत्यंत कटू वार्ता तीव्र निषेधाच्या धारदार शब्दात छापली होती !  ती पिळवटणारी काळीजतोड होती.

पायातलं त्राणच गेल्यासारखा किशोरवयाचा यशवंता पत्रकातच आपला मुखडा झाकून घेऊन गपकन् त्या निर्मनुष्य पायवाटेवर खालीच बसला आणि आपल्या अडगर, निकोप काळजातले कढ असह्य व अनावर झाल्याने हमसून रडू लागला !  तिथं कोणीही नव्हतं.  यशवंता गदगदून, फुटफुटून रडत होता- सख्खा भाऊ अंतरल्यासारखा !

त्या दिवशी ती पायवाट चालताना, रडणार्या यशवंत चव्हाणाच्या डोळ्यांतून टपकलेला प्रत्येक अश्रू थेंब पुढच्या यशवंतरावांच्या जडण-घडणीला पायाभूत ठरला आहे, असं मला त्यांची ही घटना त्यांच्या तोंडून ऐकताना एक ललित लेखक म्हणून प्रकर्षानं जाणवून गेलं आहे.  

म. गांधींच्या १९४२ च्या 'चले जाव' या ऐतिहासिक व प्रेरक अशा घोषणेनं ब्रिटिशांविरुद्ध एक लोकयुद्धच पेटलं.  ४२ चा भारतीयांचा लढा अद्याप व्हावा तसा इतिहासबद्ध झालेला नाही.  या काळातील यशवंतरावांच्या कितीतरी आठवणी त्यांच्या एकूणच मनाच्या जडण-घडणीवर बोलका प्रकाश टाकणार्या आहेत.  या काळात ते कम्युनिझम, रॉयवाद, क्रां. नाना पाटलांचे प्रतिसरकारचे आंदोलन अशा विचारापासून गांधीजींच्या सनदशीर सत्याग्रहापर्यंतची वाटचाल असे दोलायमान झाले आहेत.  ते साहजिकही होते.  याच काळात कोल्हापूरचे एक तडफदार कार्यकर्ते श्री. बळवंतराव ऊर्फ वीर माने व यशवंतराव यांना काही दिवस एकाच बेडीत जोडकैदी म्हणून राहण्याचा प्रसंग आला.  तो काळच तसा होता.  ब्रिटिश सरकारच्या अपेक्षेचा भंग करीत बहुसंख्य तरुण स्वेच्छेने राजकीय मैदानात उतरले होते.  राजकैदी झाले होते.  यशवंत चव्हाण आणि बळवंत माने !  एकत्र जखडले गेले होते.

पुढे स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलीनीकरणाचे कार्य कोल्हापूर परिसरात वीर माने यांनी रत्नाप्पाण्णा कुंभार, भाई माधवराव बागल यांच्या सोबतीने ''प्रजा परिषदेच्या'' झेंड्याखाली जोमाने चालविले.  वीर माने हे त्या वेळी कोल्हापूरात शब्दशः ''टेरर'' होते.  छ. राजाराम महाराजांनी तर त्यांना नव्या राजवाड्यावर एकान्ती पाचारण करून ''तू टेंबलाईच्या टेकडीवरून नजर टाकशील तेवढी टप्पात येणारी सरकारी जमीन तुला देतो- पण हा प्रजा परिषदेचा भलता नाद सोड.'' असं प्रलोभनासह फोडण्यासाठी चाचपून पाहिलं होतं.  वीर माने कशालाच बधले-भुलले नाहीत.  जनतेनं त्यांना दिलेली ''वीर'' ही स्वयंस्फूर्त पदवी त्यांनी त्याच धडाडीनं व एकनिष्ठ प्रामाणिकपणे पाळून दाखविली.

स्वातंत्र्यानंतर अंगच्या मूलभूत कर्तबगारीमुळे, जनमेळामुळे यशवंतराव राजकीय क्षितिजावर सरसर एकएक टप्पा मागे टाकत चालले होते.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून पंतप्रधान पंडितजींनी यशवंतरावांना आत्मीय कौलाच्या विश्वासाने देशाचे संरक्षणमंत्री म्हणून मोठ्या गौरवाने पाचारण केले.  चीनशी ६२ साली झालेल्या युद्धात अनेक प्रकारच्या लष्करी हेळसांडीमुळं भारताची तेव्हा जगभर नामुष्की झाली होती.  देश कठीण वाटचालीत होता.  यशवंतरावांवर संरक्षणमंत्री म्हणून आव्हानात्मक अशी मोठीच जबाबदारी येऊन पडली होती.  दरम्यानच्या काळात वीर माने यांच्या आयुष्याचीही बरीच चक्रे फिरून गेली होती.  अत्यंत मानी व कमालीचा अबोल स्वभाव यामुळं त्यांनी कधीच आणि कुणाकडेही आपल्या स्वातंत्र्यप्रेमाच्या ''रिटर्नची'' कसलीही मागणी केली नव्हती.  शिक्षण बेताचे म्हणजे जेमतेम व्ह. फा. पर्यंतचे असल्याने त्या बळावर ते स्वतंत्र भारताच्या कोल्हापूर विभागातील पी.डब्ल्यू.डी. खात्यात ''चिकटले'' होते.  काय म्हणून तर मैल-कुलींच्यावर देखरेख करणारे ''मुकादम'' म्हणून.  हा आपलं निरवा-निरवीसाठी बोलायचं म्हणून ''दैवाचा अजब खेळ'' होता असं आत्ता म्हणायचं !  एकाच बेडीतील दोन जोड राजकैद्यांपैकी एक स्वतंत्र भारताचा संरक्षण-मंत्री होता- दुसरा पी.डब्ल्यू.डी. चा मुकादम होता !

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com