मराठी मातीचे वैभव- २७

देशात जेव्हा गोहत्याप्रतिबंधक आंदोलन सुरू झाले, साधूंचे आंदोलन पेटले, गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भारत सरकार पेचात आले.  दिल्लीत स्फोटात परिस्थिती निर्माण झाली आणि यशवंतराव चव्हाणांनी आव्हान स्वीकारूनच गृहमंत्रिपदाची धुरा स्वीकारली.  देशाचे गृहमंत्रिपद त्यांनी अतिशय कौशल्याने सांभाळले आणि सगळी स्फोटक परिस्थिती अतिशय मजबूतदारपणे पण समंजस उदार मनस्कतेने हाताळली.  त्यामुळे एक कर्तबगार गृहमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा देशभर उमटली.  त्यांची अर्थमंत्रिपदाची आणि परराष्ट्रमंत्रिपदाची कारकीर्दही लक्षणीय ठरली.  राज्यात काय अगर देशात काय ज्या ज्या वेळी संकटसदृश परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी त्या संकटसदृश परिस्थितीचे काँग्रेसश्रेष्ठींजवळचे उत्तर यशवंतराव चव्हाण हेच राहिले.  ''देश चालविणारी, त्याला स्थैर्य मिळवून देणारी, त्याची प्रगती घडविणारी, संरक्षण करणारी, आणि देशाची प्रतिमा जगात उंच करणारी जी महत्त्वाची खाती केंद्र सरकारात असतात त्या सर्व खात्यांचा कारभार यशवंतरावांनी एकामागून एक सांभाळला'' आणि आपल्या प्रशासनकुशलतेची आणि निष्णात मुत्सद्दीपणाची प्रचिती घडविली.  असा महान कर्तृत्वाचा आणि प्रांजळ स्वभावाचा रसिला राजकारणी ही महाराष्ट्राने देशाला दिलेली अपूर्व देणगी आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाची बव्हंशी जडणघडण राजकारणाने केली हे तर खरेच, पण त्यांनी जे राजकारण केले ते सुसंस्कृत सत्तेचे राजकारण होते.  राजकारण म्हणजे जीवनसर्वस्व असे त्यांनी कधीच मानले नाही, आणि म्हणून या सुसंस्कृत नेत्याचे साहित्यकांशी, कलावंतांशी, संशोधकांशी, विरोधकांशी आणि वैचारिक प्रबोधन प्रवाहांशी, व चळवळीशी सतत निकटचे संबंध राहिले.  प्रबोधन चळवळीत तर ते जीवनाच्या प्रारंभापासून निगडित होते.  आणि अखेरपर्यंत त्यांनी हा प्रबोधन प्रवास चालूच ठेवला.  राजकारण तर त्यांनी आयुष्यभर केले.  पण राजकारणातील कोणताही गढूळपणा त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यावर जराही शिंतोडा उडवू शकला नाही.  यशवंतराव अंतःकरणाने चांगले होते म्हणूनच ते चांगले राजकारणी झाले.  चांगले वक्ते, रसिक आणि साहित्यिक झाले.  स्वभावाच्या चांगुलपणामुळेच त्यांचे सर्वांशी पटले आणि ते सर्वांचे मित्र झाले.  निरपेक्ष विचारांचा आणि समर्पणवृत्तीचा त्यांचा दृष्टिकोण अनेक बाबतीत अतिशय उपयोगी ठरत असे.  अनेकविध विषयांचा व्यासंग केल्याने, अनेक प्रकारचे अनुभव घेतल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने फुलून आलेले होते.  मर्मज्ञता आणि रसिकता यांचा अजोड मिलाफ त्यांच्या सहवासातील अनेकांना प्रत्ययास येत असे, आणि बहारदार वक्तृत्वाची निसर्गाने त्यांना बहाल केलेली देणगी आमजनतेशी संवाद प्रस्थापित करताना अतिशय परिणामकारक ठरे.  त्यांचे कोणत्याही विषयावरचे व्याख्यान विचाराने समृद्ध असे आणि त्यांच्या वक्तृत्वाला असलेला लालित्याचा लाघवीपणा श्रोत्यांची मने जिंकून घेण्यास उपयोगी पडत असे.  भाषाप्रभू असलेले व समृद्ध वैचारिक बैठक लाभलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय दुर्मिळ आणि कुणाशीच तुलना करता येण्यासारखी नाही आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे अतुलनीय नेते ठरले.  त्यांचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू आणि जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या महान नेत्यांनीसुद्धा अतिशय गौरवपूर्ण मानले.  यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने राज्याला निरपवाद नेतृत्व लाभले.  राज्याचे ते शिल्पकार ठरले.  भारताचे आदरणीय राजकारणी ठरले आणि महाराष्ट्राचे तर ते युगपुरुष ठरले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com