थोरले साहेब - १३५

वाईजवळ मात्र घोषणाचं युद्ध पाहून नेहरूजींनी साहेबांना विचारलं, ''हा एवढा मोठा एकत्र आलेला जनसमुदाय काय म्हणतोय ?''  

''लोक तुम्हाला दीर्घायुष्य चिंतित आहेत.  त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे अशा घोषणा देत आहेत.'' साहेब.

''ते घोषणा का देत आहेत ?  ते माझ्यावर नाराज आहेत काय ?'' नेहरूजी.

''नाही.  ते आपल्यावर नाराज नाहीत, ते द्वैभाषिक राज्यनिर्मितीवर नाराज आहेत.'' साहेब.  

''मग त्यांना द्वैभाषिक राज्य नको का ?'' नेहरूजी.

''त्यांना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हवाय.  तो तुम्ही त्यांना द्यावा म्हणून घोषणा देत आहेत ते.'' साहेब.

''त्यांच्यापासून मुंबई कोण हिरावून घेत आहे ?'' नेहरूजी.

या चर्चेच्या ओघात नेहरूजींची गाडी वाईच्या पुढे कुठलाही अनुचित प्रकार न घडता सुखरूप महाबळेश्वरमार्गे प्रतापगडाकडे निघाली.  समितीचा उद्देश सफल झाला होता.  साहेबांनी या घोषणांचा फायदा घेऊन जनतेची नाराजी नेहरूजींच्या कानावर घातली.  यानिमित्तानं साहेबांनाही आपलं मन नेहरूजींकडं मोकळं करता आलं.

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण नेहरूजींनी करताच लाखो शिवभक्त आणि मावळ्यांनी जल्लोष केला.  गगनभेदी तोफांचे कानठळ्या बसविणारे आवाज दणाणले.  डफ, तुतार्‍या, चौघड्यांच्या आवाजाने व 'हर हर महादेव' च्या ललकार्‍यांनी प्रतापगड शहारला.  प्रतापगडाला पूर्वेतिहास आठवला.  नेहरूजींनी महाराष्ट्रातील जनतेच्या शिवाजी महाराजांवरील प्रेमाची प्रचीची अनुभवली.  शिवरायांनी या पराक्रमी वीरांच्या जीवावर स्वराज्य स्थापन केलं.  या पराक्रमाची नोंद जगाने घेतली.  या महान युगपुरुषाच्या कार्याचा गौरव करण्याची संधी आपल्याला मिळाली याबद्दल स्वतः नेहरू धन्य झाले.  'महाराष्टाची जनता बहादूर व शूरवीर आहे' असे गौरवोद्‍गार त्यंनी काढले.  'न भूतो न भविष्यति' असा हा कार्यक्रम साहेबांनी यशस्वीपणे पार पाडला.  याचं समाधान साहेबांना लाभलं.  प्रतापगडावरून वाईमार्गे परत येत असताना पायी, सायकलवरून शिवप्रेमी व समितीचे कार्यकर्ते परतीच्या वाटेवर नेहरूजींचं स्वागत करत घोषणाही देत होते.  नेहरूजी उत्साही दिसत होते.  

ते साहेबांना म्हणाले, ''पंजाबी रागवतात लवकर आणि विसरतातही लवकर; परंतु तुम्ही मराठी लोक मोठे विलक्षण आहात.  तुम्हाला लवकर राग येत नाही व आल्यानंतर तुम्ही तो लवकर विसरत नाहीत.''

प्रतापगडावरील कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानले, धन्यवाद दिले.  सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची फलटण येथे एक बैठक घेण्यात आली.

त्या बैठकीत साहेब म्हणाले, ''शिवछत्रपतींनी राष्ट्राला इतिहास व नीतिमान संस्कृती दिली.  महाराजांच्या या पुण्याईला अव्हेरून पुढे जाण्याचा प्रयत्‍न समितीनं केला.  त्यांचा अहंकार हा कार्यक्रम पाहून आपोआप गळून पडला.  छत्रपती शेवटी जगात मान्यता पावलेले महान द्रष्टे पुरुष होते.  त्यांचं नाव, कार्य अजरामर आहे व ते अजरामर राहणार आहे.  या कार्यक्रमानं राष्ट्रनिष्ठाशी महाराष्ट्राच्या निष्ठा निगडित आहेत,  त्या वेगळ्या नाहीत हे सिद्ध केलं हे आपल्याला भूषणावह आहे.''  समितीनं सहकार्य केल्याबद्दल समितीलाही त्यांनी धन्यवाद दिले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com