त्या पत्रात इंदिराजी म्हणतात,
''प्रिय सौ. चव्हाण,
आपल्यातील जुन्या परंपरेनुसार पतीचा वाढदिवस पत्नी साजरा करीत असते म्हणून मी माझ्या शुभेच्छा तुम्हा उभयतांना पाठवीत आहे. आपणास दीर्घ आयुष्य व समृद्धी लाभो. मी पाठवीत असलेले पेढे आपल्या या प्रसंगाची गोडी वाढवतील.'' - इंदिरा गांधी.
१९६६ चा शेवटचा महिना डिसेंबर हा राजकीय ज्वालामुखीचा ठरला. देशाच्या राष्ट्रीय संघभावनेला तडा जातो की काय अशी चिंता राजकीय वर्तुळात वर्तविली जाऊ लागली. विद्यार्थ्यांचा दिल्लीतील मोर्चा, शंकराचार्यांचं उपोषण, संत फत्तेसिंग यांची आत्मदहनाची धमकी या सर्व संकटांवर मात करताना साहेबांनी आपली बुद्धी पणास लावली. राजकीय मुत्सद्देगिरीचा कळस गाठला. लोकसभेत आणि राज्यसभेत तर्कसंगतीचा वापर करून दोन्ही सभागृहांना जिंकलं. पक्ष आणि सरकारमध्ये संघर्षकालीन धुरंधर नेता म्हणून साहेबांची गणना होऊ लागली. देशातील जबाबदार वर्तमानपत्रांनी दखल घेऊन 'देश साहेबांकडून भविष्यकाळात मोठ्या अपेक्षा बाळगून आहे' अशा भावना व्यक्त केल्या.
फेब्रुवारी १९६७ ची भारताची चौथी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडली. साहेबांनी गृहखात्यामार्फत देशभर चोख बंदोबस्त ठेवला. मतदान यशस्वीरीत्या करून घेण्यात आलं. १९६७ च्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल राजकीय वर्तुळाला धक्का देणारे लागले. काँग्रेस अध्यक्ष के. कामराज पराभूत झाले. काँग्रेसनं ७ राज्यांत आपलं स्थान टिकविलं. ९ राज्यांत विरोधी पक्ष विजयी झाले. हिंदुत्वानं डोकं वर काढलं. स्वतंत्र पक्ष, अकाली दल, द्रविड मुन्नेत्र कळघम यांनी प्रादेशिक पक्ष म्हणून आपली पकड घट्ट केली. डाव्या पक्षांनी पं. बंगाल, केरळमध्ये विरोधकांनी बोलणी करून सत्तास्थापनेचा दावा केला. विधानसभेत झालेली काँग्रेसची पीछेहाट पाहता लोकसभेत मात्र काँग्रेसनं ५२१ पैकी २७३ जागा जिंकून १३ जागांच्या फरकानं बहुमत मिळवलं. आंध्र प्रदेश, म्हैसूर व महाराष्ट्रानं काँग्रेसची बूज राखली. साहेब दक्षिण सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले. दिल्लीत दाखल झाले.
विविध विचारांच्या पक्षांची मोट बांधून विरोधी पक्षांनी ९ राज्यांत सत्ता काबीज केली. ही अभद्र युती होती. यातून सत्तेच्या सिंहासनावर पोहोचण्याकरिता आमदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली. राज्या-राज्यांत अस्थिरता निर्माण झाली. एकामागून एक राज्य सरकारे कोसळू लागली. या संपूर्ण घडामोडीत ५०० आमदारांनी पक्षांतर केलं. विरोधी पक्षासोबत काँग्रेस पक्षातील आमदारही सत्तेसाठी घरोबा करू लागले. या अस्थिरतेमुळं हिंदी भाषिक राज्यांत व पं. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट सुरू करावी लागली. संपूर्ण उत्तर भारतात गृहमंत्री या नात्यानं साहेबांची राजवट सुरू झाली. सर्व प्रांतांना स्थिर सरकार मिळालं पाहिजे या विचारानं साहेबांना घेरलं. पक्षांतराचा कायदा करण्यासंबंधी विचार सुरू झाला. पक्षांतरावर बंदी घालणारा कायदा लोकसभेत मांडत असताना साहेबांनी पक्षांतर करणार्या आमदारांना 'आयाराम-गयाराम' म्हणून संबोधलं. लोकसभेत साहेबांच्या या शब्दाला उचलचून धरलं.



















































































































