थोरले साहेब - ९१

दोन्ही वर्गात सद्‍भावना निर्माण करण्याचं काम साहेबांनी केलं.  गहू, साखर रॉकेल, कापड यावरील नियंत्रण दूर केलं.  यामुळं सामान्य जनतेला परवडेल या भावात दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळू लागल्या.  व्यापारीही सहकार्य करू लागले.  साहेबांच्या या धोरणाची दखल केंद्राने घेतली.  अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लागला.  शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊन त्यांच्याकडून लेव्ही पद्धतीनं अन्नधान्य खरेदीची अंमलबजावणी सुरू केली.  पुरवठा खात्याबद्दल जनतेची जी नाराजी होती ती दूर झाली.  या यशस्वी कामामुळं मोरारजी देसाई साहेबांना जवळ करू लागले.  काम करून घेण्याच्या पद्धतीमध्ये कुठलाही आडमुठेपणा नाही.  सहकार्‍यासोबत काम करीत असता तुसडेपणाची वागणूक नाही.  प्रश्न समजून घेण्याची खुबी, चांगले काम करीत असलेल्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना शाबासकी देण्यात कद्रूपणा नाही.  काम करीत असताना अधिकार्‍याकडून चूक झाल्यास त्याला शिक्षा करण्याची घाई नाही.  त्याला संधी देऊन त्याच्याकडून ते काम व्यवस्थित करून घेण्याची हातोटी... या सर्व काम करण्याच्या पद्धतीनं साहेब अधिकारी व कर्मचार्‍यांत आत्मविश्वास निर्माण करू लागले.  साहेबांच्या या कार्यपद्धतीमुळं त्यांचा नावलौकिक वाढू लागला.

भाऊसाहेब हिरे आणि साहेब ग्रामीण भागाचे प्रतिनिधी तसेच पक्षाचे अध्यक्ष व सेक्रेटरी असल्यानं दोघांची तुलना होऊ लागली.  साहजिकच साहेबांचं पारडं भारी भरू लागलं.  भाऊसाहेब धडाडीचे नेते.  त्यांच्यातील नाही म्हटलं तरी सरंजामी वृत्तीचा अहंकार दैनंदिन कारभारात उफाळून यायचा.  या त्यांच्या वागणुकीनं कर्मचारी व कार्यकर्ते नाराज व्हायचे.  पुरवठा व महसूल ही दोन खाती शेतकर्‍यांच्या जीवनाशी संबंधित आहेत याची जाणीव या दोन्ही नेत्यांना होती.  साहेब आपल्या खात्याचे निर्णय जनसामान्याचे हित लक्षात घेऊन तत्काळ घ्यायचे.  हेच निर्णय भाऊसाहेब हिरे दिरंगाईनं घ्यायचे.  निर्णय घेण्यास उशीर करणे म्हणजे सामान्य जनतेच्या रोषास कारणीभूत होणे.  यामुळे भाऊसाहेब हिरेंच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल लोकांत नाराजी पसरायची.  मुख्यमंत्री म्हणून मोरारजी देसाई याची दखल घेत असत.  गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व मुंबईच्या एकोप्यानं मुंबई राज्याचा कारभार सुरळीत चालला होता.  विकासाच्या कामानं गती घेतली होती.  सामान्य जनता सरकारच्या कामावर खूश होती.  देशात भाषिक पुनर्रचनेचे वारे वाहू लागले.

वन आणि जंगल विकास खात्याच्या बाबतीत साहेबांनी सुसूत्रता आणली.  वन आणि पशूपक्ष्यांचं संरक्षण याकडे साहेबांनी लक्ष केंद्रित केलं.  वन आणि शेतीचा संबंध अनन्यसाधार आहे हे जनतेला पटवून दिलं.  वृक्षाची लागवड करून वनं वाढविली तर पाऊसपाणी चांगला होऊन उत्पन्नात वाढ होते.  अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण होण्यासाठी जंगल संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.  वनसंपत्तीचे जतन करीत असतानाच वन्य पशूपक्ष्यांचे जतन करणे तेवढेच निकडीचे आहे हे लक्षात घेऊन वन व पशूपक्ष्यांचे संरक्षण करणारा कायदा करणारे मुंबई राज्य हे देशात पहिले राज्य आहे.  शिकार्‍याजवळ शिकार करण्याचा परवाना असल्याशिवाय त्याला शिकार करता येणार नाही असा कायदा केला.  भूतलावर असलेले पशूपक्षी व शेती हे ऐकमेकांना पूरक आहेत.  या दोघांमध्ये निसर्गानंच समन्वय निर्माण केलेला आहे.  या सर्व प्राण्यांचे जनत करण्याची जाणीव जनतेत व शेतकरी वर्गात निर्माण केली.  या आणि अशा कार्यकर्तृत्वानं साहेबांचं नेतृत्व मुंबई राज्यात उठून दिसू लागलं.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com