आमचे मुख्यमंत्री -३०

१९३८ साली त्यांची नागपूर प्रदेशीय कॉंग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली. त्यांनी १९४० चा वैयक्तिक सत्याग्रह व १९४२ च्या चले जाव चळवळीत भाग घेतला होता व त्याकरता त्यांना कारावास भोगावा लागला. १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते प्रांताध्यक्ष झाले. त्यावेळी ते राज्यसभेवर निवडून आले. ते घटना समितीचेही सदस्य होते.

ह्याच काळात त्यांनी अनेक प्रकारचे सार्वजनिक कार्य केले. १९३५ साली शिक्षण प्रसाराकरता लोकसेवक मासिक काळ काही काळ चालविले.

विधिमंडळात प्रवेश

त्यांचा विधिमंडळात प्रवेश जुन्या मध्यप्रदेशात झाला. ते १९५२ साली मूल सावली निर्वाचन क्षेत्रातून विधिमंडळात निवडून आले व मध्यप्रदेशात श्री. रवीशंकर शुक्लांच्या मंत्रिमंडळात स्वास्थ्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली (१९५२-५७). १९५६ साली कर्नाटक महाराष्ट्रापासून अलग झाला व विदर्भातील मराठी भाषिक प्रदेश द्विभाषिक महाराष्ट्रात सामील करण्यात आला. १९५७ साली निवडणुका झाल्या. द्विभाषिक राज्याचे यशवंतराव मुख्यमंत्री झाले. त्या मंत्रिमंडळात त्यांना सार्वजनिक खाते देण्यात आले. साहजिकच मध्यप्रदेशातील मंत्रिमंडळ बरखास्त झाले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. त्यावेळी यशवंतराव मुख्यमंत्री झाले व दादासाहेब उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी दादासाहेबांकडे दळणवळण खाते होते.

दादासाहेब मुख्यमंत्री

यशवंतराव दिल्लीस संरक्षणमंत्री म्हणून गेले आणि दादासाहेबांचा २० नोव्हेंबर १९६२ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. लोकमान्यांच्या भाषेत एका अर्थाने ते तेल्यातांबोळ्याचे मुख्यमंत्री होते. दादासाहेबांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द जरी अल्पकाळ होती, तरी त्यांना जेवढे करता येण्याजोगे होते तेवढे त्यांनी केले. सहकार हा दादासाहेबांचा आवडता विषय. म्हणून त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्यात शेतक-यांच्या मालकीची सहकारी सूत गिरणी झाली. त्यांनी दुष्काळी नगर जिल्ह्यात साखर कारखाने काढण्यास उत्तेजन दिले. शेतक-यांना कापसाचे योग्य भाव मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. भूमिहिनांना जमिनी देण्याचे धोरण आखले. झोपडपट्ट्यांचे प्रश्न सोडविण्यात खूप रस घेतला. जंगल संपत्तीच्या विकासाला गती दिली. फौजी जवानांचे विस्थापन (displacement), सुवर्णनियंत्रणामुळे सोनारांची झालेली बेकारी, धरणग्रस्तांचे विस्थापन ह्यांमुळे बेकारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याचे धोरण दादासाहेबांनी आखले. वाशीच्या खाडीपुलाचे जनकत्व दादासाहेबांकडेच जाते. त्यांनी महाराष्ट्रात अनेक संरक्षण प्रकल्प स्थापन होण्यास उत्तेजन दिले. उदाहरणार्थ, ओझरचा मिग कारखाना व वरणगाव भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादन करणारे कारखाने.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com