लोकनेते यशवंतराव चव्हाण - २०

दिल्लीकरांनी यशवंतरावांच्या क्षमतेचा वापर आपल्या राजकारणासाठी करून घेतला आणि यशवंतरावांनीही त्यांना तो करु दिला. यशवंतरावांच्या अनुयायांनीही स्वत:च्या वाढासाठी त्यांचे मोठेपण जेवढे वापरता येईल तेवढे वापरले आणि यशवंतरावांनीही त्यांना ते वापरु दिले. यशवंतरावांनी कोणाला नकार दिला नाही व थांबा म्हणूनही सांगितले नाही यश जितक्या शांतपणे पचविले तितकेच अपयशही त्यांनी सहजतेने पचविले. तत्त्वनिष्ठा व पक्षनिष्ठा त्यांनी अखेपर्यंत सांभाळली. १९८० मध्ये रेड्डी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस अशा दोन गटात झालेली काँग्रेसची विभागणी म्हणजे यशवंतरावांच्या जीवनातील कसोटीचा काळ होता. दोन्ही गट मूळचे काँग्रेसचेच असल्याने यशवंतरावांनी रेड्डी काँग्रेसला साथ दिली. त्यांच्या या निर्णयाला पक्षविरोधी कृती म्हणता येणार नाही. राजकारणात अतिरिक्त विश्वास हा अपराध ठरू शकतो.  राजकीय तत्त्ववेत्ते व राजकीय नेते यामध्ये फरक आहे. एखाद्या नेत्याच्या निर्णयावरुन राजकीय टिकाटिप्पणी करण हे राजकीय विश्लेषकाचे काम असते. प्रत्यक्षात निर्णय घेताना काय बिकट अवस्था असते हे त्या नेत्यालाच माहित. संघर्षमय लढ्यातील नेतृत्त्व हे त्यागावर अवलंबून असते तर राजकारणातील शांततेचा काळ भोगावर अवलंबून असतो. या काळातील भूमिकेबाबत सर्वस्वी त्या राजकीय नेत्याला जबाबदार धरता येत नाही. संत, समाजसुधारकांचे ज्याप्रमाणे मूल्यमापन केले जाते त्याप्रमाणे राजकीय माणसे मोजून चालत नाहीत. ज्याला स्पर्धक नाही आणि ज्याच्याशी कोणाला स्पर्धा करता येणार नाही अशी उंची मोजण्याचे क्षेत्र राजकारण नव्हे. यशवंतरावांच्या राजकीय निर्णयावरुन त्यांच्या यशापयशाचे मूल्यमापन करणेही चुकीचे ठरेल.

एक माणूस नेता म्हणून यशवंतरावांकडे पहावे लागेल. काँग्रेसमधील समाजवादी विचारांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा उच्च स्तरावरील होती. घार आकाशात कितीही वर गेली तरी तिचे लक्ष पिलाकडे असते, त्याप्रमाणेच यशवंतरावांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम होते. महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणारा व आपल्या असामान्य बुध्दीकर्तृत्त्वाने महाराष्ट्राला देशात एका नंबरवर नेण्यात यशवंतरावांचे योगदान खूपच मोठे आहे. जोपर्यंत नेता उपयुक्त ठरतो तोपर्यंत अनुयायी नेत्याची पालखी खांद्यावर घेऊन मिरवतात.

जेव्हा नेता निरुपयोगी ठरतो, त्यावेळी अनुयायाला नेत्याची पालखी जड वाटू लागते. यशवंतरावांच्या अखेरच्या काळात दिल्लीच्या राजकारणात एकाकी पडल्यावर त्यांच्याच पाठिंब्यावर मोठ्या झालेल्या अनुयायांना यशवंतराव निरुपयोगी वाटू लागले. राजकारणातील तो अलिखित नियमच असल्याने यशवंतरावांनीही तो मोठ्या मनाने स्विकारला.

तत्त्वनिष्ठेने राजकारण केलेल्या या लोकनेत्याने कधी सत्तेचा रुबाब व संपत्तीचा लोभ धरला नाही. देशाच्या उपपंतप्रधान पदावर पोहचलेल्या या नेत्याने कधी दिल्लीत स्वत:चे घर बांधले नाही की मुंबईत स्वत:साठी फ्लॅट घेतला नाही. महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने उभारण्यात योगदान देणा-या या नेत्याने स्वत:च्या नावाने अगर स्वत:च्या मालकीचा एकही साखर कारखाना सुरु केला नाही. महाराष्ट्रात एक एकरही जमीन त्यांनी राजकीय लाभापोटी मिळविली नाही. आयुष्याच्या अखेरीस त्यांच्या खात्यावर स्टेट बॅंकेत केवळ ३६ हजार रुपयांची शिल्लक होती. राजकारणात राहून इतकी पारदर्शकता व कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारापासून अलिप्त असणारे निष्कलंक व्यक्तिमत्त्व अशा शब्दातच यशवंतराव चव्हाणांची राजकीय उंची मोजावी लागेल. त्यांचे हे त्यागमय संघर्षमय जीवन महाराष्ट्रातील तमाम राजकीय नेत्यांना आजपर्यंत प्रेरणादायी ठरत आले आहे. म्हणूनच त्यांचे राजकीय स्थान अबाधित राहिले गेले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com