भूमिका-१ (121)

२२. परराष्ट्रिय धोरणाची मार्गदर्शक मूलतत्त्वे

१९७६ साली लोकसभेत वादविवादाला
दिलेल्या उत्तराचे भाषण.

आपल्या देशाच्या परराष्ट्रिय धोरणाचा विचार करताना आपण या प्रश्नाकडे संकुचित पक्षीय दृष्टिकोणातून पाहत नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. तसे पाहिले, तर आपल्या स्वातंत्र्य-आंदोलनातच आपल्या देशाच्या परराष्ट्रिय धोरणाचे काही विशेष निश्चित केले गेले होते. अर्थातच जसजशी आंतरराष्ट्रिय परिस्थिती बदलत गेली, तसतशी या विशेषांमध्ये आणखी काही विशेषांची भर पडली. कधी कधी मांडणी करताना थोडेफार फेरफारही करावे लागले. हे असे कालोचित बदल वगळता परराष्ट्रिय धोरणाची मूळ बैठक नेहमीच कायम राहिलेली आहे. आणि मला वाटते, याचमुळे परराष्ट्रनीतीच्या क्षेत्रात आपल्या देशाचे महत्त्वाचे निर्णय व परिस्थितीचे मूल्यमापन बिनचूक ठरत आले आहे.

जागतिक शांततेच्या प्रस्थापनेसाठी क्रियाशील राहणे, सर्व देशांशी सहजीवनाच्या आणि सहकार्याच्या भूमिकेवरून संबंध प्रस्थापित करणे, समान आणि न्याय्य अर्थव्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्नशील असणे आणि जगात जेथे कोठे स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा संघर्ष चालू असेल, त्याला मन:पूर्वक पाठिंबा देणे, ही आपल्या परराष्ट्रिय धोरणाची मार्गदर्शक मूलतत्त्वे आहेत. आपल्या सांस्कृतिक परंपरेचा आणि स्वातंत्र्यसंग्रामाचा तोच वारसा आहे.

मार्टिन ल्यूथर किंग (ज्यूनियर) यांनी १९६५ मध्ये पं. नेहरूंसंबंधी काय म्हटले होते, ते नुकतेच माझ्या वाचनात आले. मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर) हे केवळ कृष्णवर्णीयांचेच नव्हे, तर सा-या मानवजातीचे महान नेते होते. त्यांनी नेहरूंच्या जीवनाचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता, हे पाहून मी थक्क झालो. मार्टिन ल्यूथर किंग (ज्यूनियर) यांचे ते उद्गार केवळ नेहरूंसंबंधी नसून आपल्या परराष्ट्रिय धोरणासंबंधीही असल्यामुळे मी येथे उद्धृत करतो. ते म्हणाले होते: 'जवाहरलाल नेहरू हे तीन अनन्यसाधारण युगांचे जनक होते. आपली मातृभूमी वसाहतवादाच्या पाशातून मुक्त व्हावी, यासाठी झालेल्या प्रदीर्घ संघर्षाचे त्यांनी नेतृत्व केले. त्याचप्रमाणे इतर परतंत्र देशांतील जनतेलाही त्यांनी स्वातंत्र्य-प्राप्तीसाठी प्रेरणा दिली.'

हे नेहरूंचे पहिले युग होते.

नंतर त्यांचे दुसरे युग सुरू झाले. 'आपला देश स्वतंत्र करण्यात नेहरू यशस्वी झाल्यानंतर त्यांना एका ऐतिहासिक संघर्षाला तोंड द्यावे लागले. दुस-या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी त्यांना झटावे लागले. या महान संघर्षामध्ये त्यांना महात्मा गांधींची प्रत्यक्ष साथ शक्य नव्हती. पण सर्व भारतीय जनता त्यांच्या पाठीशी उभी होती. कारण आता ती स्वतंत्र झालेली होती आणि भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आलेले होते. तो काळ लक्षात घेतला, म्हणजे जागतिक शांततेसाठी नेहरूंनी आणि भारताने केवढी अवघड कामगिरी बजावली, याची कल्पना येऊ शकते. सारी मानवजात नष्ट होऊन जाते, की काय, अशी शक्यता वाटावी, एवढी भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. कोणत्याही क्षणास अणुयुद्ध भडकण्याचा संभव दृष्टिआड करता येत नव्हता. या अशा स्फोटक काळामध्ये पौर्वात्य आणि पाश्चिमात्य महासत्तांमधील वाढते वैमनस्य कमी होऊन त्यांच्याकडून जागतिक शांततेचा भंग होणार नाही, ही भारतीय जनतेची इच्छा त्यांच्या गळी उतरविण्याची अत्यंत नाजूक कामगिरी नेहरूंनी जागतिक मुत्सद्द्याच्या कौशल्याने पार पाडली.'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com