साहेब यशवंतरावजी चव्हाण-१७

“शूं काम छे?”
“फक्त दोन मिनीटं बोलायंचंय सरदारांशी-“
“ठीक- ठीक छे-“ सरदार म्हणाले:
“अगर आ केण्डिडेट गिर जावे, तो जिम्मेवारी कोणी?”
(चटकन) “आम्ही-आम्ही कार्यकर्ते घेऊ ती जबाबदारी!”
कॉंग्रेस उमेदवारांची नाव जाहीर झाली,
त्यात आत्माराम पाटलांचा नाव होतं!
आम्ही सगळे तरूण कार्यकर्ते
उत्साहानं त्यांच्या प्रचाराला लागलो...
‘लाऊडस्पीकर’ प्रथम वापरण्यात आला,
तो या निवडणुकीत! पंडित नेहरूंची विराटसभा कराडमध्ये झाली.
आत्माराम पाटील, सर्वात जास्त मतं मिळवून निवडून आले.
त्यांच्या प्रचारासाठी आम्हाला खुद्द मानवेंद्रनाथ रॉय लाभले होते!

सत्तेपासून लांब रहावं, या मोहात गुंतू नये,
असं म्हणणा-या संन्याशांचा एक वर्ग त्यावेळी कॉंग्रेसमध्ये होता!
ह्या पोकळ सोवळेपणात काहीही अर्थ नाही,
आणि जनतेची शक्ती अधिक प्रमाणात संघटित करावी,
असंच मला नेहमी वाटत आलंय्.
एक दिवस माझा मित्र दयार्णव कोपर्डेकर
आपल्या नियोजित वधूला घेऊन आला...
साने गुरूजींचं ‘श्यामची आई’
हस्तलिखित त्यानं बरोबर आणलं होतं!
ते त्यानं प्रसिध्द करावं,
अशी गुरूजींची इच्छा होती...
‘श्यामची आई’ मी हस्तलिखित स्वरूपात वाचली,
हे माझं भाग्य! अनेकदा डोळे पाणावले- अनेकदा-
‘आई’ म्हटलं की, भावनेनं दुबळा होतो...
त्यात गुरूजींच प्रत्येक वाक्य भावनेनं ओथंबलेलं,
आईच्या प्रेमानं ओसंडून चाललेले!
वाचन संपंल्यावर मी दयार्णवला मिठीच मारली.
म्हणालो: “तुझं हे प्रकाशन खात्रीनं यशस्वी होईल!”

१९३८-३९ साली बी. ए. झाल्यावर
पुढं काय?- असा प्रश्न होता. संपादक की, शिक्षक?
वकील व्हायचा विचार त्यावेळी नव्हता!
पण शेवटी, ‘राजकरण आणि वकिली’
हातात हात घालून चालताहेत, हे पाहिलं- आणि
कायद्याचा अभ्यास करायचं ठरवलं... राजकरण करायचं,
पण राजकारणात कुणाबरोबर रहायचं?
कॉंग्रेसचं व्यासपीठ मी मूलभूत मानतो;
आणि त्याचबरोबर समाजवादही स्वीकारतो!
विचारात जे बदल व्हायचे,
ते शेवटी जन-आंदोलनाच्या अनुभवातूनच झाले पाहिजेत...
३४ साली नाशिक-जेलमध्ये स्थापन झालेल्या
‘कॉंग्रेस समाजवादी पक्षा’ पेक्षा,
मला रॉयवादी विचार अधिक पटत होता.
मनाची अवस्था एक प्रकारे व्दिधा झाली होता...
पण, अशी व्दिधा अवस्था झाल्याशिवाय,
विचारांचा विकास तरी होणार कसा?
That is the dynamics of development !
मात्र, एक गोष्ट मला खटकायची:
हे रॉयवादी, समाजवादी पंडित
लहान लहान प्रश्नांवर एवढे मतभेद माजनताहेत,
हे शेवटी कॉंग्रेसला कमजोर तर करणार नाहीत?
रॉयिस्ट, सोशालिस्ट, कम्युनिस्ट- त्यावेळी सगळे कॉंग्रेसमध्ये होते...
पुढं त्यांच्या वाटा वेगळया झाल्या!

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com