यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ७२

४ यशवंतरावांचे समाजकारण

(१९ व्या शतकाचे भाष्यकार, थोर विचारवंत डॉ. रा. ना. चव्हाण (वाई) यांनी यशवंतरावाच्या ‘समाजकारणा’ चा वेध घेऊन, राजकारण आणि समाजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत हे दाखवून देण्याचा प्रयत्न येथे केला आहे.” संपादक)

यशवंतरावांनी त्यांच्यामागे व्यापक समाजकारणाचा महत्त्वाचा आदर्श ठेविला आहे, राजकारण म्हणजे निकोप समाजकारण, अशी एक आगळी वेगळी राजकारणाची मूलभूत व्याख्या कर्मवीर शिंद्यांच्या लेखनात सापडते. समाज निरोगी करणे, त्यामधील विकृत्या दूर करणे यामुळे समाज प्रगत होतो. उन्नत होतो. शिवाजीच्या वेळचा महाराष्ट्रीय समाज एकसंघ व एकजिवी झालेला आढळला, याचे कारण म्हणजे त्या काळात आगे मागे मराठी संतानी महाराष्ट्रीय समाजाची पारमार्थिक पायावर वाढविलेली उंची होय. हल्ली मात्र निकोप समाजकारण न झाल्यामुळे सामाजिक दुरावे व विकृत्या सर्वच भारतात वाढत आहेत. यामुळे राजकारण मार खात आहे. म्हणूनही हा विषय महत्त्वाचा आहे. राजकारणी म्हणून यशवंतराव प्रसिद्ध आहेत. पण त्यांच्या राजकारणाच्या मागे कोणते निकोप समाजकारण होते ते स्पष्ट करण्याचा येथे एक प्रयत्न केला आहे. त्यांचा आदर्श सर्व समाजापुढे ठेवायचा आहे. संपक्षणमंत्री म्हणुन केंद्रात गेल्यावर चव्हाण भारतीय व्यापक दृष्टीचे उत्तरोत्तर झाले.

यशवंतरावाचा जन्म १९१३ मधील होता. साधारणत: सातव्या आठव्या वर्षापासून सभोवतालची परिस्थिती मोठ्या होणा-या माणसाच्या मनावर परिणाम करीत जाते. १९२० साली लोकमान्य टिळक वारले. १९२२ साली कोल्हापूर राजर्षी शाहू निजामधामास गेले. महाराष्ट्रात जे आगेमागे सामाजिक विंतडवादाचे वातावरण होते, ते या दोन महाराष्ट्रीय पुढा-यांच्या अकाली मृत्यूमुळे पुष्कळसे शमण्यास साह्य झाले. ज्यांच्या दरम्यान हा शापभूत असलेला महाराष्ट्रीय सामाजिक वाद चालला होता व ज्या थोर नेत्यामधील हा वाद चालू होता. तेच पडद्याआड, त्यांच्या खुद्द मृत्युमुळे झाल्याने, या वादातील जो जोर होता, तो संपला व म. गांधी यांना सार्वजनिक कार्यात या दोन्ही पुढा-यांच्या अनुयायांना व चहात्यांना आपलेसे करण्याचा मार्ग मोकळा झाला.

यशवंतरावांची पूर्वायुष्यातील जी प्रथमची सोळा वर्षे होती, त्यावेळी वरील परिस्थिती सार्वजनिक क्षितिजावर स्वच्छपणे होती. यशवंतराव हे जन्मजातपणे चोखंदळ होते. त्यांनी त्यांच्यापुढे होत्या त्या सर्व वाटा चोखाळिल्या व स्वत:ची एक वाट सातारा जिल्ह्यात नंतर काढली. ‘कृष्णाकाठ’ खंड पहिला हा उपलब्ध आहे. म्हणून तो पुष्कळपणे या लेखातील विवेचनास साक्षी ठरतो. पाया ठरतो.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com