शैलीकार यशवंतराव १०२

रघुअण्णांच्या सहकार्याने यशवंतरावांची आणि वि.दा.सावरकरांची भेट झाली.  या लोकोत्तर महापुरुषाचे दर्शन घडले यासारखे भाग्यच नाही.  याचा आनंद व्यक्त करताना त्यांचे वर्णन करतात, ''मध्यम उंचीचे काहीसे किरकोळ बांध्याचे, डोळ्यांवर चष्मा आणि त्या पलीकडून पाहणारी त्यांची भेदक नजर अशी ती मूर्ती समोर आली.  अंगात स्वच्छ पांढरा सदरा आणि तितकेच स्वच्छ पांढरे सैलसे धोतर. पायात साध्या वहाणा अशा या घरगुती वेषात होते.... आणि सागर आणि सावरकर हे रत्‍नागिरीत एकाच वेळी पाहण्याचे भाग्य लाभले.  अशा भारतीय क्रांतिकारक कुलपुरुषांबद्दलचा आदर आणि जिव्हाळा येथे साक्षात चित्रित करतात.  

स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव हे महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांत अग्रगण्य मानले जावे या तोलाचे कार्यकर्ते.  ''..... पराभव हा शब्द त्यांना माहीत नव्हता.  पराभवाने ते कधी थकणार नाहीत.  विचार मांडण्याचा कधी कंटाळा आला नाही.  सर्वांना भेटून आपले विचार सांगण्याची टाळाटाळ नाही.  त्यांच्या स्वभावातील हे महत्त्वाचे गुण आहेत.''  असे यशवंतराव सांगतात.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांच्या एकसष्टीनिमित्त लिहिलेल्या अभीष्टचिंतनपर लेखात लिहितात, ''एक यशस्वी शासनकर्ता या नात्याने आवश्यक असलेले गुण तर त्यांच्या अंगी आहेतच.  पण शिवाय एक माणूस म्हणूनही त्यांच्या अंगी जी मनाची ॠजुता, सहृदयता, उमदेपणा, शौर्य, चिकाटी, जिद्द, व्यवहारी दृष्टी आणि कष्ट उपसण्याची तयारी आहे.... श्री. वसंतरावजींचा पिंड शेतकर्‍याचा आहे.  मातीचा सुगंध किंवा पिकांचा बहर त्यांना सर्वात अधिक सुखद वाटते.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुज्ञता व समयज्ञता आहे.... उत्तम गृहस्थ व शहाणा शासक या शब्दांनी मी त्यांचे व्यक्तिमत्त्व रेखाटेन.''

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त स्मरणिकेसाठी लिहिलेल्या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असा प्रकाश टाकतात... १९४२ चा लढा म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान !  नानांनी हा लढा गाजवून सोडला.  चव्वेचाळीस महिने त्यांनी भूमिगत राहून ब्रिटिश सरकारला नामोहरम केले व भूमिगत चळवळ प्रभावीपणे चालवली... पुढे त्यांच्या वक्तृत्वशैलीबद्दल सांगतात, ''ही शैली ग्रामीण जीवनातील जिव्हाळ्याच्या अनुभवांनी घडलेली आहे.  जिव्हाळा, तळमळ, निर्भयता, स्पष्टवत्तेफ्पणा, कुणाला न झोंबणारा पण विषय स्पष्ट करणारा विनोद हे त्यांच्या वक्तृत्वाचे गुणविशेष !  कोणतीही सभा ते सहजासहजी जिंकतात.''  यशवंतराव चव्हाण आवडलेल्या माणसांच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाचे जे चित्र रेखाटतात तेही मोजक्या शब्दात.  त्यामुळे नाना पाटीलसारखी व्यक्ती तिच्या वैशिष्ट्यांसह वाचकांसमोर उभी राहते.  अर्थात देहयष्टीसोबतच त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीही यशवंतराव सहजपणे प्रकट करून जातात.

एस. एम. जोशी हे एक स्फटिकासारखे स्वच्छ व्यक्तिमत्त्व आहे असा मोजक्या शब्दांत त्यांचा उल्लेख यशवंतराव करतात.  राघुअण्णा यांच्यासंबंधी लिहितात, ''इतका मनमोकळा, प्रेमळ, ग्रामीण जनतेशी शंभर टक्के एकरूप झालेला असा कार्यकर्ता मी कधीच पाहिला नाही.''  यशवंतराव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने फार प्रभावित झाले.  स्वतः जाऊन त्यांनी त्यांची ओळख करून घेतली आणि नंतर मसूरचे रहिवासी असलेले हे रघुअण्णा यशवंतरावांचे जवळचे मित्र बनले.  

कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक रत्‍नाप्पा कुंभार यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहितात, ''संपूर्ण जीवन त्यागाने व काही निश्चित कामासाठी वाहून घेणार्‍या महाराष्ट्राती कार्यकर्त्यांत रत्‍नाप्पा हे महत्त्वाचे गृहस्थ आहेत.''

भाऊसाहेब वर्तक यांच्या षष्ट्यब्दीपूर्तिच्या निमित्ताने 'जीवनधार' या गौरवग्रंथात लिहिलेल्या लेखात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा असा उल्लेख करतात.  ''कर्तृत्व हे माणसाला चिकटवता येत नाही.  चिकटवलेले कर्तृत्व फार वेळ टिकत नाही.  कर्तृत्व हे कार्यातूनच फुलावे लागते.  ते तसे फुलत असल्याचा प्रत्यय यावा लागतो.  भाऊसाहेबांच्या बाबतीत मला हा प्रत्यय प्रकर्षाने आला आणि महाराष्ट्रात एक जिद्दीचा प्रखर कार्यनिष्ठा असलेला कार्यकर्ता उदयास येत आहे अशी भाऊसाहेबांचे त्यावेळचे कार्य पाहून माझी खात्री झाली.''

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com