शैलीकार यशवंतराव २३

आईचा प्रभाव

यशवंतरावांच्या जडणघडणीत त्यांच्या आई विठाबाई यांचा खूप मोठा वाटा आहे.  विठाबाईंच्या संस्कारामुळे बाल यशवंतरावांचे मन सुजाण, सुसंस्कारित झाले.  त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी वारंवार केला आहे.  गरीब कुटुंबातील ही माता मनाने, संस्काराने, स्वभावाने मात्र अतिशय श्रीमंत होती.  ही श्रीमंती आपल्या मुलावर बिंबवण्याचा तिचा नेहमी प्रयत्‍न असे.  यशवंतराव आत्मकथनपर एका लेखात म्हणतात.... 'फरक होता तो घरच्या संस्कारांचा ...!  संपत्तीने नसली तरी संस्काराने आई श्रीमंत होती आणि ती श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोहचविण्याचा तिचा सततच प्रयत्‍न होता.  'ईश्वर आपल्या पाठीशी आहे,' ही तिची निष्ठा होती आणि या निष्ठेनेच तिने जीवनभर संकटांशी सामना केला.  हिंमत सोडू नये असा उपदेश करताना ती म्हणत असे....

नका बाळांनो, डगमगू ।  चंद्र-सूर्यावरील जाई ढगू ॥

अशा प्रकारे यशवंतरावांना अनेक संकटांना तोंड देण्यास बालपणीच आईने शिकवले होते.  विठाबाई नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.  त्या जरी अशिक्षित असल्या तरी समज विद्वानांना लाजवील अशीच होती.  आपण अर्धपोटी राहावे, आल्या गेलेल्यांना पोटभर जेवण घालावे अशी त्यांची धारणा होती.  देवाधर्मावर त्यांची श्रद्धा होती.  शिक्षण ही शक्ती आहे.  ती मिळवलीच पाहिजे आणि मुलांचे शिक्षण पूर्ण केले पाहिजे असा विठाईचा शिक्षणविषयक दृष्टिकोन यशवंतरावांच्या जीवनास दिशा देण्यास कारणीभूत ठरला.  यशवंतराव त्यांच्या बालपणाची आठवण सांगताना म्हणतात - ''माझी आई ही आम्हा सर्वांची शक्ती होती.  आम्ही काय वाचतो आणि काय बोलतो हे ती ऐकत असे.  पण तिला त्यात भाग घेता येणे शक्य नसे-!''  यावरून त्यांच्या आईचे तिन्ही मुलांवर किती प्रेम होते हे दिसून येते.  तिने यशवंतरावांना कोणत्याही परिस्थितीत राहण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची शिकवण दिली.  प्रतिकूल परिस्थितीशी ज्या व्यक्तीला जुळवून घेता येते ती व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते.  यश-अपयश पचवण्याची ताकद त्या माणसात येते.  ही मोलाची शिकवण त्या माऊलीने त्यांना दिली.  त्याचा पुढे राजकारण व समाजकारणात त्यांना चांगला उपयोग झाला.  कौटुंबिक वातावरण बिघडू नये म्हणून यशवंतरावांना व कुटुंबातील अन्य व्यक्तींना तिने नेहमी मार्गदर्शन केले.  यशवंतरावांची आई त्यांच्या लहानपणी शिक्षणाबद्दल व वागणुकीबद्दल कोणता मौलिक संदेश देत होती, ते प्रत्यक्ष यशवंतरावांच्या शब्दांत, ''बाबा तू वाचतोस, हिंडतोस, फिरतोस हे सगळे चांगले आहे.  पण कुणा वाईटाच्या नादाला लागू नकोस.  आपण गरीब असलो तरी आपल्या घराची श्रीमंती आपल्या वागण्या बोलण्यात आहे, रीतीरीवाजात आहे.  ती कायम ठेव.  तुला कोणाची नोकरी चाकरी करायची नसली तरी माझी हरकत नाही.  मी कष्ट करून तुझे शिक्षण पूर्व करीन, पण तू शिक्षणामध्ये हयगय होईल असे काही करू नकोस.  तुम्ही शिकलात तर तुमचे दैव मोठे होईल.''

यशवंतरावांच्या आईने एक प्रकारे जीवनाचे तत्त्वज्ञानच सांगून टाकले आणि आपल्या जीवनाचे दर्शनही करून दिले.  प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिक कुचंबणेत आणि कौटुंबिक अडचणी असतानासुद्धा स्वाभिमानाचा संदेश दिला.  यशवंतरावांच्या आंतरीक व्यक्तिमत्त्वाच जडणघडणीत त्यांच्या आईच्या संदेशाचा मोठा वाटा आहे.  तसे ते जीवनानुभवच आहेत.  यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' मध्ये आईवरील अलोट प्रेमाचा वारंवार उल्लेख केला आहे.  विठाबाईंनी आपली मुले घडविली.  यशवंतराव तर पुढे सर्वांचे साहेब झाले.  महाराष्ट्राचा कोहिनूर झाले.  या कोहिनूर हिर्‍याच्या प्रत्येक पैलूला विठाईच्या विशाल हृदयाचा स्पर्श झालेला आहे.  यशवंतरावांनी पुढे त्यांच्या आईबद्दल ठिकठिकाणी गौरवोद्‍गार काढलेले आहेत.  ''तिच्या अंतःकरणाच्या अवकाशात मी स्थिरावतो, प्रशांत मनोभूमीवर पहुडतो, आत्मतेजाने तेजाळू लागतो, प्रेमामृताने ओलाचिंब होतो आणि श्वासात श्वास मिसळून जातो.''  अशा प्रकारे यशवंतरावांनी आईचे थोरपण रेखाटले आहे.  तशी यशवंतरावांची बुद्धी लहानपणापासूनच तल्लख होती, विस्तृत वाचन होते.  आईंनी लहानपणापासूनच त्यांच्याकडून भरपूर वाचन करून घेतल्याने व संस्कार केल्याने एक हुशार विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात.  विद्यार्थीदशेच्या या काळात यशवंतरावांनी भौतिक दारिद्र्याशी संघर्ष देतच बौद्धिक श्रीमंती वाढविण्याचा प्रयत्‍न केला.  त्यांनी मोठमोठ्या लेखकांचे, विचारवंतांचे लेखन वाचण्यास, भाषणे ऐकण्यास जाणीवपूर्वक सुरुवात केली.  निरनिराळ्या विषयांच्या वाचनाने त्यांचा वैचारिक पिंड तयार झाला.  वाचनाने मन प्रगल्भ होते, विचार करू लागते, याचा प्रत्यय त्यांना शालेय जीवनातच आला.  यावरून त्यांच्या बुद्धीची झेप आपल्या लक्षात येते.  वाचनाच्या वेडाने झपाटलेले त्यांचे मन जे हातात मिळेल ते वाचत गेले.  याचा परिणाम म्हणूनच ते पुढे मोठे साहित्यिक व राजकारणी झाले.  यशवंतराव पुढे जे एक लेखक, राजकारणी व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले त्याची बीजे त्यांच्या विद्यार्थी दशेतच पेरली गेली होती.  त्याला खतपाणी घालण्याचे काम पुस्तकांनी आणि त्यांच्या मातेनेही केले होते.  आणि ती रुजत आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी ती शिस्तशीरपणे वाढविली होती.  यशवंतरावांच्या अंगच्या जन्मजात प्रतिभेचा विकास आणि आविष्कार समजून घेताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांनी शिस्तीचा गुण कधी सोडला नाही. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com