शैलीकार यशवंतराव ४२

यशवंतरावांचे वैवाहिक जीवन हे असे होते.  या संदर्भात आठवण सांगताना एक लेखक म्हणतात, ''डॉ. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्‍नी सौ. वेणूताई ह्या घरी त्यांची खाण्यापिण्याची चांगली काळजी घेतात.  ही पतिपत्‍नी समाधानात असलेली दिसतात.  तथापि सौ. वेणूताई अधूनमधून आजारी पडतात.  त्यामुळे सार्‍या राज्याची चिंता वाहात चोहोकडे भटकणार्‍या यशवंतरावाचे चित्त घराकडे वेधणारा प्रेमरज्जू त्यांना परत ओढून आणीत असलेला दिसतो.  ह्या दांपत्याला आज मूलबाळ नाही, सौ. वेणूताईंना एक मुलगी झाली होती पण ती आज हयात नाही,  तथापि दोघांच्याही भावांची मुलेबाळे त्यांच्याकडे सतत असल्याने आणि नसती चिंता वाहाण्याचा वेडेपणा त्यांच्या ठायी नसल्याने ही दोघे तशी आनंदाने कालक्रमणा करीत आहेत.''  मूलबाळ नसले तरी आपला आनंद ते हरवत नसत.  ज्यावेळी या दांपत्यास कळले की आपल्याला आता अपत्यप्राप्‍ती होणार नाही तेव्हा त्यांना वाईट वाटले.  तथापि सौ. वेणूताईंनी यशवंतरावांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला.  मात्र यशवंतरावांनी त्यास नकार दिला.  या संदर्भात संभाजी थोरातांनी सांगितलेली आठवण पुढीलप्रमाणे आहे.  यशवंतराव आणि वेणूताई यांना जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की येथून पुढे सौ. वेणूताईंना अपत्यप्राप्‍ती झाल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे.  तेव्हा ते दोघेही अतिशय निराश झाले.  त्यानंतर थोड्यावेळाने वेणूताईच धक्क्यातून सावरल्या.  त्यावेळी त्यांचे यशवंतरावांशी झालेले संभाषण पुढीलप्रमाणे ओ.  वेणूताई यशवंतरावांना म्हणाल्या, ''झाले, आपल्या वैवाहिक जीवनाचा एक अंक संपला.  मला व तुम्हालाही मूल हवे होते.  पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता मूल होणे आपणाला परवडणार नाही.  तसे धाडस केले तर मूल लाभण्या ऐवजी मीच दगावणार.  मला मरणाची भीती वाटत नाही, पण तुमच्या दृष्टीने मी जिवंत असायला हवी व मलाही तुम्ही आणि तुमचा उत्कर्ष बघत दीर्घकाळ जगण्याची इच्छा आहे.  तुम्ही असे करा, आता झाले गेले विसरून एखादी अनुरूप मुलगी पाहून तिच्याशी लग्न करा.  माझ्या नशिबी मूल नाही त्याला इलाज नाही, पण तुम्ही त्या आनंदापासून वंचित राहू नका.''  यावर यशवंतरावांनी दिलेले उत्तर त्या दोघांचे एकमेकांवर असलेले अतूट प्रेम दर्शवते.  यशवंतराव म्हणाले, ''नाही, नाही.  वेणूताई, मी तुला अंतर देणार नाही.  कदापिही ते शक्य नाही.  माझ्या हृदयसिंहासनावर देवाब्राह्मणा-समक्ष तुझी सन्मानाने स्थापना केली आहे.  माझ्या अंतःकरणात फक्त तुझ्या एकटीसाठीच जागा आहे.  तुला बाजूला सारून अगर उचलून फेकून देऊन त्या जागी मी दुसरीला आणून बसवणार नाही.  कदापिही ते शक्य नाही.  अनेक लोक अपत्यहीन जीवन जगतात, अपत्यहीन अवस्थेत मरतात.  मला मूल झाले नाही म्हणून काय पृथ्वी दुभंगणार आहे की हिमालयाचा पहाड कोसळणार आहे ?  माझ्या पुत्रावाचून काय देशाचा, जगाचा गाडा अडून राहणार आहे.  नाही मी दुसरे लग्न मुळीच करणार नाही.  तुझ्याप्रमाणेच मीही आजन्म अपत्यहीन राहीन.  माझ्या पत्‍नीपदी फक्त वेणूताई हीच स्त्री अखेरपर्यंत राहील.''  यशवंतरावांचे हे उद्‍गार त्यांच्यातील माणुसकी दाखवतात.  त्यांच्यातील आदर्श पतीचे रूप दर्शवतात.  त्यांचे पत्‍नीवर असलेले उत्कट प्रेम यातून सूचित होते आणि दोघांनी एकमेकांसाठी केलेल्या त्यागाचीही कल्पना येते.  त्यानंतरही यशवंतरावांच्या मातोश्रीने विठाबाईंनी त्यांना अपत्यासाठी दुसर्‍या विवाहाचा सल्ला अप्रत्यक्षपणे दिला होता.  पण यशवंतरावांनी तो मानला नाही.  ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले तरीही या दांपत्याचे जीवन सुखी होते.  शेवटपर्यंत हसतमुखाने त्यांनी संसार केला, हसतमुखाने एकमेकांची मने सांभाळली व लोकांच्या समोरही तसेच आले.

देवांवर त्या दोघांचीही श्रद्धा होती.  फत्तेपूर सिक्री येथील सलीम चिस्तीच्या समाधीचे दर्शन तसेच देवघरातील साईबाबांच्या मूर्तीची पूजा केल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडत नसत.  

दोघे प्रवासात असताना मुक्कामाच्या आजूबाजूला प्रसिद्ध देवस्थान असेल तर तेथे गेल्याशिवाय रहात नसत.  महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांना ते वेणूताईंबरोबर अनेकदा गेले आहेत.  काशीचे विश्वनाथ, हरिद्वाराची 'हरी की पावडी', गंगोत्री येथे जाऊन केलेली शंकराची पूजा, अजमेर, निजामुद्दीन दर्ग्याचे दर्शन अशा अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.

यशवंतरावांनी पत्‍नीचा नेहमीच आदर केला.  चारचौघांसमोर कधी त्यांनी वेणूताईंबद्दल अपशब्दसुद्धा काढले नाहीत.  दोघांचे वागणे सामंजस्याचे होते.  आचरणाने व स्वभावाने एक होते.  एकमेकांपासून दोघांनी कधीच काही लपविले नाही.  त्यामुळे त्या दोघांचे कौटुंबिक जीवन अधूनमधून येणार्‍या वादळातही सुखाचे व समाधानाचे राहिले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com