शब्दाचे सामर्थ्य १२६

१९८० च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीत ते संपूर्ण सहकारी चळवळीत गुंतले असताना त्यांना आजाराने गाठले. मृत्यूशी असा अचानक सामना करावा लागेल, याची त्यांनाही कल्पना नव्हती व मलाही नव्हती. निवडणुकीच्या तयारीसाठी मी एकदा साता-यास जाऊन आलो, तेव्हा आबांचा निर्धार व निष्ठा पाहून मी स्तिमित झालो. त्यानंतर मी परत दिल्लीस आलो आणि काही दिवसांनी परत निवडणुकीच्या तयारीसाठी साता-यास जाण्यासाठी मुंबईस पोहोचलो. तेव्हा तिथे समजले, की आबा अतिशय आजारी असून, हॉस्पिटलमध्ये आहेत. मी त्यांची चौकशी करण्याकरिता गेलो, तेव्हा आपल्या तब्येतीसंबंधी बोलण्याऐेवजी माझ्या निवडणुकीच्या तयारीसंबंधी ते बोलत राहिले. त्यांना भेटण्यास जाण्यापूर्वी डॉक्टरांशी माझे बोलणे न झाल्यामुळे त्यांच्या आजाराची मला कल्पना नव्हती. म्हणून मीही त्यांच्याशी बोलत राहिलो.

आबांची भेट घेऊन मी जेव्हा बाहेर आलो, तेव्हा डॉक्टरांना त्यांच्या तब्येतीबाबत विचारले, तेव्हा त्यांनी माझ्या कानात सांगितले,
'आजार कठीण आहे. कॅन्सर आहे.'

डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच मला जबरदस्त धक्का बसला. मला कळून चुकले, की हा आबांचा शेवटचा आजार आहे.

माझ्या निवडणुकीस एक आठवडा राहिला असताना ते आम्हांला सोडून गेले. कार्यकर्त्यांनी माझ्यावरील व आबांवरील निष्ठेने काम केले आणि आम्ही ती निवडणूक जिंकली. या निवडणुकीच्या यशाचे श्रेय मी आबांच्या स्मृतीस देतो.

सामान्य माणसाबद्दलची कणव, विधायक कार्याची आवड आणि गतिमानतेने नवीन कार्य करण्याची दृष्टी, असे आबांचे व्यक्तित्व होते. त्यासाठी ते कार्यकर्त्यांशी बोलत व वेळप्रसंगी रागावतही. लोकसंग्रह करण्याचा यातून त्यांना छंद निर्माण झाला. सातारा जिल्ह्यातील गावोगावच्या लोकांना ते व्यक्तिशः नावाने ओळखत व त्यांच्या स्वभावांची व मर्यादांची आबांना पूर्ण कल्पना असे. त्यामुळे कामाकरिता कोणती माणसे कुठे योजावी, याबाबत त्यांचा निर्णय कधी चुकत नसे.

आबांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यासंबंधी अनेक गोष्टी लिहिता येतील. परंतु छोटेखानी लेखात ते शक्य नाही. मी आज एवढेच म्हणेन, की कार्यकर्त्यांनी मला विचारले, की आदर्श कार्यकर्ता कोण, तर मी त्यांना निःसंकोचपणे सांगेन, की किसन वीर यांचा आदर्श त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवावा. ज्याने स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी काही मिळविले नाही; परंतु इतरांना मिळत राहावे, यासाठी प्रयत्‍न केले, कष्ट केले, अखेरपर्यंत ज्याने आपले राहण्याचे ठिकाण व घर सोडले नाही, असे कार्यकर्ते देशात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत. त्यांत आबांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. जन्मले खेड्यात, वाढले खेड्यात, संसार व जीवन घालविले खेड्यात-म्हणजे कवठ्यात. अशा एका थोर एका बंधुवत मित्राची आठवण करून, त्यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन करतो.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com