शब्दाचे सामर्थ्य १२९

दादांचा स्वभाव विधायक असल्यामुळे ते राजकारणातही नित्य विधायक वृत्तीनेच काम करीत असतात. स्वभावाचे निर्धारी, पण योग्य तडजोडीचे वावडे नाही, असा त्यांच्या राजकारणातील वागण्याचा स्वभाव मी पाहिला आहे. मतभेद असले, तरी कर्त्या माणसाच्या आड येऊ नये, म्हणून अनेक वेळा ते बाजूला होण्याचा प्रयत्‍न करतात. ते करण्यापाठीमागे त्रागा नसतो. कामाच्या आड न येण्याची वृत्ती असते. परंतु ते काम अडणार आहे, असे पाहिले, की ते तितक्याच निर्धाराने त्या कामाची तड लावण्यासाठी परत येतात.

सत्तेसाठी त्यांनी मुद्दाम कधी प्रयत्‍न केला नाही. सत्तेत असणा-या आपल्या पक्षाला शक्ती व सहकार देण्याचा त्यांनी सतत प्रयत्‍न केला. १९७२ साली अनपेक्षितपणे सत्ता हाती आली, तेव्हा ती अतिशय कर्तबगारीने सांभाळली. तितक्याच अनपेक्षितपणे त्यातून १९७६ साली त्यांना जावे लागले, तेव्हा त्यांनी मनाचा तोल जाऊ दिला नाही. नंतरचे सर्व व्यावहारिक सोपस्कार अलिप्तपणाने व शांतपणाने पार पाडले. ज्या मंत्रिमंडळातून आपल्याला गाळले होते, त्या  मंत्रिमंडळाच्या शपथविधीला हजर राहून सार्वजनिक जीवनाची प्रतिष्ठा कशी राखावी, त्याचे उदाहरण त्यांनी घालून दिले होते. दादांचे हे सर्व वर्तन पाहिले, म्हणजे त्याचा सार्थ अभिमान वाटावयास लागतो.

आपले आसू कुणाला सांगू नयेत; पण आज ते शक्य नाही. दादा ७६ साली मंत्रिमंडळातून काढले गेले, त्यानंतर प्रथम दिल्लीला आले. जेव्हा त्यांची -माझी भेट झाली, तेव्हा का, कोण जाणे, माझे डोळे भरून आले आणि पुष्कळ प्रयत्‍न करूनही मला ते आवरता आले नाहीत. १९६५ साली आई गेली, तेव्हाही असेच आवरणे अवघड झाले होते. पण तरीही मी ते सावरले होते. पण आज असे का होत आहे, हे माझे मला सांगणे शक्य होईना. मी माझ्या मनाशी विचारले, की हे असे का घडते? त्यामध्ये माझ्या मनाला एकच खंत होती. दादा तर सर्व काही शांत मनाने घेत होते. ते दुःखी-कष्टी नव्हते. परंतु माझ्या मनाला यातना होत्या, की महाराष्ट्रातील सोन्यासारख्या या माणसाचा असा अवमान का झाला व कशासाठी? आणि मी हे थांबवू शकलो नाही, यात आमच्या सर्वांच्या कामाचा पराभव आहे, अशी एक प्रकारची असहायतेची भावना मनात तयार झाली होती.पक्षनिष्ठेच्या श्रद्धेमुळे पक्षावर रुसता येत नव्हते. घडलेल्या गोष्टींचा खुलासा माझा मलाच करता येत नव्हता आणि या असहायतेच्या पोटी हे सर्व होत होते. दादांपासून हे आसू लपवू शकलो नाही, याची नंतर मला एकसारखी खंत वाटत राहिली.

ही अगदी निव्वळ खासगी गोष्ट प्रगट करण्याच्या पाठीमागचे कारण एवढेच, की मला वाटत असलेला हा अन्याय जसा माझ्यासारख्या त्यांच्या असंख्य मित्रांना अमान्य होता, तसा नियतीलाही अमान्य होता. मुख्यमंत्रिपदाची नवी जोखीम त्यांनी घ्यावी, अशी त्यांच्या मित्रांनी इच्छा दाखविताच आणि प्राणापेक्षा ज्याच्यावर जास्त प्रेम केले, तो पक्ष संकटात आहे, हे चित्र पाहताच त्यांनी आपला निर्णय बदलला आणि राजकारणाच्या आवाहनचा स्वीकार केला. तो वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी नाही, तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात आलेल्या एका महत्त्वाच्या कठीण प्रसंगी आपले निर्धारी नेतृत्व देऊन, तो प्रसंग निभावून न्यावा, यासाठी त्यांनी तो स्वीकार केला आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com