शब्दाचे सामर्थ्य १७५

भारताचा राष्ट्रवाद हा बळकट करावयाचा असेल, तर धर्मनिरपेक्ष विचारावरच तो उभा करावा लागेल. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद हा या देशातील राष्ट्रवादाचे तुकडे करणारा विचार ठरेल. राज्यसंस्थेने एका धर्माचा आश्रय करून येथे चालणार नाही. कित्येक कोटी लोक येथे इतर धर्मांचेही राहत आहेत. या अनेक धर्मांच्या, अनेक जातींच्या, अनेक वंशांच्या समाजांमध्ये सर्वांना एकत्र बांधणारी मोठी शक्ती म्हणून धर्मनिरपेक्ष राज्याच्या विचाराचाच स्वीकार अपरिहार्य ठरतो आणि तसा तो करावा लागेल. म्हणूनच मी असे म्हणेन, की ज्या दिवशी आमचा हा विचाराचा पाया भुसभुशीत होईल, त्या दिवशी आमचा राष्ट्रवाद व लोकशाही धोक्यात येईल.

भारतीय राष्ट्रवादाचे दुसरे वैशिष्ट्य असे, की तो आपल्या राष्ट्राचा विचार आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात करीत असतो. उलट, या देशातील जे कोणी आक्रमक कडवे राष्ट्रवादी आहेत, ते राष्ट्रवादाचा हा आंतरराष्ट्रीय संदर्भ लक्षात घ्यावयासच तयार नाहीत. भारतीय राष्ट्रवाद हा एका दृष्टीने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा मागोवा घेत-घेत प्रगती करणारा राष्ट्रवाद आहे. एका दृष्टीने हा फरक एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रवाद आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राष्ट्रवाद यांमधीलच आहे. राष्ट्रवादाचे हे स्वरूप पहिल्या महायुद्धानंतर बदलण्यास प्रारंभ झाला व दुस-या महायुद्धानंतर ते आणखीनच बदलले. अ‍ॅटम बाँब, हैड्रोजन बाँब यांच्या शोधामुळे तर राष्ट्रवादाचा विचार आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात करणे आवश्यक होऊन बसले आहे. या काळात जगाचा विचार न करता फक्त आपलाच विचार करणारा राष्ट्रवाद हा प्रसंगी आत्मघातकी ठरण्याचाही संभव अधिक आणि त्यामुळेच भारतीय राष्ट्रवाद हा आक्रमक कडव्या राष्ट्रवादापेक्षा वेगळा असण्याची गरज वाटते.

राष्ट्रवादाचा विचार करताना एक तात्त्विक विचारही आपण नजरेआड करून चालणार नाही. मानवजातीचा प्रवास हा प्राथमिक अवस्थेतील लहान-लहान रानटी टोळ्यांकडून तो जगाच्या विशाल कुटुंबाकडे चालला आहे. प्रत्येक वेळी वरवरच्या पातळीवर मानवजातीचे एकत्रीकरण झाले आहे. मानवजातीच्या या प्रदीर्घ प्रवासातील एक टप्पा म्हणून राष्ट्रवादाचा उल्लेख करता येईल. मात्र राष्ट्रवाद हे मानवजातीच्या मुक्कामाचे ठिकाण नव्हे. त्याच्या प्रवासातील तो एक मैलाचा दगड आहे. याचाही विवेक आम्हांला सतत ठेवला पाहिजे. राष्ट्रवादाचा हा व्यापक आशय आम्हांला न्या. रानडे, गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारसंपत्तीतून मिळाला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी तर शुद्ध मानवतावादी राष्ट्रवादाचाच पुरस्कार केलेला आढळतो.

तेव्हा भारतीय लोकशाही बलशाली करावयाची, तर तिच्या राष्ट्रवादाचा पाया जसा भक्कम केला पाहिजे, तसा राजकीय जीवनातील धर्मनिरपेक्षतेचा पायाही खंबीर केला पाहिजे. एका दृष्टीने आमची परंपरा ही धर्मनिरपेक्ष राज्याची परंपराच आहे. सम्राट अशोक, अकबर आणि छत्रपती शिवाजी हे आमच्या भारतीय परंपरेचे तीन उत्तम प्रतिनिधी मानले, तर त्यांनी त्यांच्या काळात राज्यसंस्था व धर्म यांची कधीही गल्लत होऊ दिलेली आढळत नाही. मात्र व्यक्तिगत जीवनात धर्मकारण आणि धर्मकल्पना यांना श्रेष्ठ स्थान देणारे असे हे तीन थोर पुरुष होऊन गेले. अगदी अलीकडच्या काळातही हीच परंपरा महात्मा गांधींनीही चालवली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com