शब्दाचे सामर्थ्य २०३

६६

सामाजिक जबाबदारी

चाळिशी म्हणजे जीवनाची माध्यान्ह. बालपण केव्हाच संपलेलं असतं. तारुण्य संपत आलेलं असतं. एकीकडे म्हातारपणाची चाहूल लागत असते, तर दुसरीकडे तारुण्यातील गोड, आनंदी, जिद्दीची, उमेदीची वर्षे अजूनही सकाळीच खुडलेल्या फुलांसारखी ताजी असतात. त्याचबरोबर आता सुकून जाण्याची वेळ आली आहे, ही खंतही मनात जन्म घेत असतेच. एकीकडे जीवनाबद्दल प्रचंड अभिलाषा, तर एकीकडे संपत चाललेल्या प्रवासाचं टोक नजरेसमोर येऊ लागलेलं !

अशा वयात केलेल्या गोष्टींचा हिशेब होतो. जे भोगलं, जे उपभोगलं, त्याच्या अनुभवाबरोबरच, पुढच्या प्रवासाची थकवा आणणारी वाट पायांखाली असते. केलेल्या चुका, चुकलेले आडाखे, दाखविलेले स्वार्थ यांतून केलेली आयुष्याची वाटचाल आठवत राहते. तर आलेले कडवट अनुभव गाठीशी बांधून 'जग गेलं खड्ड्यात' असं म्हणून पुढचा प्रवास सुरू होतो. त्यातून आणखीनच कडवटपणा वाढत जातो.

आयुष्याची संध्याकाळ सुखासमाधानानं, ख-या अर्थानं निवांतपणात, निरोगी मनानं घालवायची असेल, तर त्याची तयारी चाळिशीतच करायला हवी. कडवट आठवणी, कटू अनुभव, दुःखद प्रसंग - सगळं बाजूला ठेवून, नव्या उमेदीनं पुढच्या प्रवासाची तयारी करायला हवी.

माणूस चाळिशीत यायला लागला, की तो काहीसा स्वस्थ होतो. त्याला आयुष्यात स्वास्थ्य लाभतं. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचा हाच खरा काळ असतो. ज्या माणसांना काहीतरी करावंसं वाटतं, ते करतात. पण ज्यांना मिळालेल्या स्वास्थ्यातच आनंद वाटतो, ते काहीही करीत नाहीत. फक्त स्वतःबद्दल विचार करीत राहतात. नव्या पिढीबद्दल आकस आणि जुन्या वृद्ध माणसांबद्दल त्यांना तुच्छता वाटत राहते. मग बेकार तरुणांचे प्रश्न असोत किंवा वृद्धांच्या समस्या असोत, त्यांबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. हे लोक आपल्या सुखदुःखांत मश्गुल असतात. आपल्या कुटुंबाचीच फक्त त्यांना काळजी वाटत असते. आपला बँक-बॅलन्स कसा वाढेल, याबद्दल रात्रंदिवस ते विचार करीत राहतात. यामध्ये ते आयुष्याची फार महत्त्वाची वर्षे वाया घालवीत असतात. समाजाला त्यांचा काय उपयोग होतो? काहीच नाही. ज्या समाजात, ज्या देशात आपण जन्मलो, त्या देशाला, समाजाला आपला काहीतरी उपयोग व्हायला नको का? माणूस हा 'सामाजिक प्राणी' असं म्हणतात. तेव्हा त्याचं सामाजिकत्व हे त्याच्या सामाजिक बांधिलकीवरच अवलंबून असतं.

आतापर्यंत आयुष्यात केलेल्या धडपडीचं थोडं फार फळ माणसाला या वयापर्यंत मिळालेलं असतं. त्याच्या मुलाबाळांची शिक्षणं होत असतात. त्यानं थोडी-फार बचतही केलेली असते. नोकरीतून निवृत्त झाल्यावर काय करायचं, याचा विचार त्यानं आत्तापर्यंत केलेला असतो. घर सुरळीत चालत असतं, बायको, मुलं आणि तो. त्याचं घर आणि तो.

नेमक्या या स्वास्थ्यातून कळत-नकळत त्याच्या जीवनात एक प्रकारचा रूक्षपणा येत असतो. आजूबाजूच्या वातावरणाशी तो एकरूप होऊ शकत नाही. त्याचं लक्ष घरातच राहतं. मग बाहेरच्या, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायची सवय लागते आणि त्यांच्याकडे दुर्लक्षही होत जातं.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com