शब्दाचे सामर्थ्य २२८

गेल्या वीस वर्षांत भारतात झालेल्या स्थित्यंतराचा आपण जर विचार केला, तर एक गोष्ट ठळकपणे डोळ्यांत भरते. ती म्हणजे आर्थिक विकास व औद्योगिकीकरणासाठी आम्ही सुरू केलेली प्रचंड मोहीम. ख-या अर्थाने विज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच होऊ लागला आहे. असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पुष्कळ प्रमाणात आपण संशोधनात्मक कार्याबद्दल पाश्चात्य प्रगतिशील राष्ट्रांवरच अवलंबून राहिलो आहोत. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे ठीक आहे. पण आता औद्योगिकीकरणाची सुरुवात झाल्यावर आपल्याला या क्षेत्रातसुद्धा आत्मनिर्भर कसे होता येईल, याचा विचार केला पाहिजे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. जनमत निर्माण करून व संशोधन-कार्याचे महत्त्व देशातील उद्योगपतींना पटवून देण्याचे कार्य मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थांनी हाती घेतले पाहिजे.

विज्ञान संशोधनाच्या दोन शाखा आहेत. एक मुलभूत संशोधनाची, तर दुसरी उपयोजित (अप्लाइड) संशोधनाची. देशाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या संशोधनाची नितांत गरज आहे, याचा सांगोपांग विचार वैज्ञानिकांनी व अर्थशास्त्रज्ञांनी केला पाहिजे. ब-याच लोकांच्या तोंडून भारतातील मूलभूत विज्ञान - संशोधनाचा दर्जा व त्याचा जागतिक दर्जा यांतील तफावत पाहून नैराश्याचे उद्‍गार ऐकू येतात. मला ही भाषा पटत नाही. या क्षेत्रात आपणांस फार मोठी मजल गाठावयाची आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण ही तुलनाच मुळी युक्तिसंगत नाही. कारण आर्थिक प्रगतीच्या बाबतीत सुद्धा पाश्चात्य देशांपेक्षा आपण फार मागे आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे, मूलभूत संशोधनासाठी विपुल साहाय्य लागते. ते देणे आजच्या परिस्थितीत आपणांस कितपत शक्य आहे, याचाही नीट विचार केला गेला पाहिजे. शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती ही, की आपल्या देशातील मूठभर तंत्रज्ञांचा देशाला जास्तीत जास्त लाभ करून देण्याच्या दृष्टीने कसा उपयोग करून घेता येईल. हे तंत्रज्ञ जर आपण मूलभूत संशोधनात गुंतवून ठेवले, तर त्यांच्या कार्याचा देशाच्या औद्योगिकीकरणाला जलद गती देण्यासाठी उपयोग होण्यास फार विलंब लागेल. पण हे तंत्रज्ञ जर मूलभूत संशोधनात गुंतवून ठेवले, तर त्यांच्या कार्याचा देशाच्या औद्योगिकीकरणाला जलद गती देण्यासाठी उपयोग होण्यास फार विलंब लागेल. पण हे तंत्रज्ञ जर मूलभूत विज्ञानाची जी प्रगती प्रगत देशांमध्ये झाली आहे, त्याचा उपयोग करून उपयोजित (अप्लाइड) संशोधन करू लागले, तर देशाच्या औद्योगिकीकरणाला व विकासाला लवकर फायदा मिळू शकेल. आज वस्तुस्थिती अशी आहे, की मूलभूत वैज्ञानिक संशोधन राष्ट्रांच्या भौगोलिक कक्षा ओलांडून पलीकडे गेले आहे.

विज्ञानाचे हे आंतरराष्ट्रीय स्वरूप गेल्या वीस वर्षांत अधिक स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारताला अशा वैज्ञानिक संशोधनाचे फायदे मिळत राहतीलच. आता शेकडो विद्यार्थी परदेशांत जाऊन शिक्षण घेत आहेत. तेथे संशोधन करीत आहेत. त्यांच्यामार्फत ही शास्त्रविषयक ज्ञानाची देवाण-घेवाण होत आहे. त्याचा फायदा आपल्याला नेहमीच मिळेल. पण आज खरी गरज आहे, ती उपयोजित संशोधन (अप्लाइड रिसर्च) वाढविण्याची. आपण या देशाचे जीवनमान वाढविण्याचा अत्यंत निकराने प्रयत्‍न करीत आहोत. पण या देशाचे प्रश्नच एवढे गुंतागुंतीचे व प्रचंड आहेत, की तेथे आपल्याला अत्यंत आधुनिक विज्ञानाचे साहाय्य घेतल्याखेरीज पुढे जाता येणार नाही. शिवाय हा विकास जलद रीतीने आपणांस घडवून आणावयाचा आहे. म्हणून आज गरज आहे, ती जगात विज्ञानाची जी बाजारपेठ आहे, तेथे जाऊन आपल्याला उपयुक्त असे विज्ञान मिळविण्याची व त्याचा आपल्या देशाच्या विकासास कसा उपयोग होईल, याचा अभ्यास करण्याची. एके काळी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजी विद्येला वाघिणीचे दूध म्हटले. आता फार मोठ्या प्रमाणावर अशाच विज्ञानविद्येच्या दुधाची या देशाला फार गरज आहे.

मी असे म्हणत नाही, की मूलभूत समस्यांवर संशोधन भारतीयांनी करूच नये. जरूर करावे. पण देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता व औद्योगिकीकरणाची आजची गरज पाहता मला असे वाटते, देशाची आजची निकड उपयोजित संशोधनाची आहे. आज जी औद्योगिक क्रांतीची लाट भारतात आली आहे, तिच्यात जोम निर्माण करण्याकरिता व तिला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रतिलिपीपासून सुरुवात करून, पाश्चात्य देशांतील शोध अनुकूल, योग्य करून शेवटी नवशोधापर्यंत मजल गाठावयाची खटपट भारतीयांनी केली पाहिजे. आज कितीतरी विज्ञान स्नातक दरवर्षी आमच्या विश्वविद्यालयांतून पदव्या घेऊन बाहेर पडत आहेत. बहुतेक हे तरुण नोक-यांच्या मागे लागतात. ही जी पांढरपेशेपणाची वृत्ती आहे, त्या वृत्तीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. त्यांच्यांतील जे हुशार विद्यार्थी असतील, त्यांना उत्तेजन देऊन त्यांच्या विशिष्ट क्षेत्रामधील औद्योगिक समस्या त्यांच्या नजरेस आणून दिल्या पाहिजेत. त्यांवर संशोधन करण्यास त्यांना उद्युक्त केले पाहिजे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com