शब्दाचे सामर्थ्य २४९

प्रादेशिक राजकारणाचेही तसेच आहे. प्रादेशिक राजकारण अधिक लोकाभिमुख करावे लागेल. तेथे तपशिलाच्या अनेक प्रश्नांवर लोकमत प्रभावी करून सामाजिक, आर्थिक प्रश्न राज्य-पातळीवर सोडवावे लागतील. राष्ट्रीय उद्दिष्टांची समानता मान्य करूनही, शेवटी सत्तेचा पाया हा प्रादेशिक राजकारणात राहणार, हे उघड आहे. म्हणून तेथे पुरोगामी शक्ती व नेतृत्व संघटित केली पाहिजेत. राष्ट्रीय उद्दिष्टांवर एकमत असणारे राजकीय नेतृत्व (Politics of consensus) प्रादेशिक पातळीवर यशस्वी होईलच, असे नाही.

आपले राज्य हे ख-या अर्थाने संघराज्य होणार, हे स्पष्ट आहे. तसे होत गेले, तर आर्थिक, सामाजिक परिवर्तनाची क्रियात्मक पातळी (Operative level) ही राज्यातच राहील. अर्थात फुटीर प्रवृत्ती माजू नयेत, म्हणून काही संहिता ठरवावी लागेल. पण तसेच घडणे कठीण नाही. अगदी अलीकडची दोन उदाहरणे घेऊ, राष्ट्रीय एकात्मता परिषदेत जेव्हा राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा झाली, तेव्हा अनेक प्रश्नांवर विविध पक्षांचे एकमत झाले. दुसरे उदाहरण राष्ट्रीय विकास मंडळाच्या सभासदांत नियोजनातील विकास-खर्चावर झालेल्या चर्चेचे देता येईल. प्रत्येक प्रदेशालाच अधिक पैसा हवा आहे. प्रत्येकाला विकासाची ओढ आहे. पण राष्ट्रीय संकल्प आणि राष्ट्रीय तत्त्वे ही विचारात घेतली पाहिजेत, त्यासाठी काही तत्त्वसूची तयार केली पाहिजे, हेही सर्व राज्यांना-काँग्रेसेतर सरकारांनाही - पटले आहे. त्याचाच प्रत्यय राष्ट्रीय विकास मंडळात आला.

सारांश, अविवेकी, आत्मकेंद्रित प्रदेशनिष्ठा कोणत्याही प्रदेशाने जोपासली, तर तो प्रदेश एकाकी पडेल, हे आता अगदी उग्र प्रादेशिक निष्ठा असणार्‍यांनाही कळून चुकले आहे. प्रादेशिकता व एकराष्ट्रीयत्व यांच्यांतील तोल सांभाळणे ही व्यवहार्य राष्ट्रीयता आहे. ही सगळी परिस्थिती समजावून घेऊन आपली धोरणे आखली पाहिजेत. त्यासाठी आपली विचारांची जुनी पठडी बदलली पाहिजे. विविध प्रश्नांतून उत्पन्न होणा-या परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे.

मला वाटते, आपण समस्यांनी उत्तेजित (Excite) व उद्विग्न होतो. पण मनुष्य जोपर्यंत सुधारणेसाठी झगडतो आहे तोपर्यंत प्रश्न हे राहणारच. ते सोडविण्यासाठी प्रयत्‍न करणे हे राज्यकर्त्यांचे काम आहे. जगातील कोणत्याही प्रगत वा अप्रगत देशापुढे आज समस्या नाहीत, असे झालेले नाही. भारत तर एका अभूतपूर्व प्रयोगात गुंतला आहे. अनेक संकटे कोसळत आहेत. नवीन समस्या पुढे येत आहेत. पण वांछित नियतीसाठी झुंज देण्यातच खरा पुरुषार्थ आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com