मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १०५-१

काकासाहेबांची प्रथा त्यांनी उज्वलतेने पाळली व आता ती जबाबदारी मा.वसंतराव साठे व विठ्ठलराव गाडगीळ पाळीत आहेत. महाराष्ट्राच्या थोर संस्कृतीचे हे पाईक दिल्लीच्या वृत्तपत्रीय झगमगाटात अन्य प्रांतीयांच्या तुलनेने कमी पडत असले तरी कर्तृत्वाने नेहमीच अग्रेसर राहिले आहेत व सत्य, स्वाभिमान, देशभक्ती, निष्ठा इ.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची जोपासना व राजमान्यता त्यांनी टिकवली आहे. ही गोष्ट प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमानास्पद वाटावी अशीच आहे.

आजपर्यंत स्वातंत्र्योत्तर काळात ज्या महाराष्ट्रीय नेत्यांनी आपले प्रतिनिधीत्व व नेतृत्व केले त्या सर्वांत यशवंतरावांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांनी मिळवलेली पं. नेहरू व इंदिरा गांधी यांची प्रशस्ति व त्यांचे मनात निर्माण केलेली त्यांची प्रतिमा लक्षात घेऊन मी हे विधान करीत आहे. पंतप्रधान राजीव गांधी त्यांना किती मान देत याची मला जाणीव आहे; यशवंतराव विरोधात असतानाही त्यांना स्वत:कडे कसे आणता येईल ही विवंचना त्यांना असे. याला कारण यशवंतरावांचे नैतिक अधिष्ठान, शासन चातुर्य व समन्वयवादी मनोधारणा होते.

साहित्य, नाटक, नृत्य व अन्य काही क्षेत्रांची त्यांना आवड होती. पुस्तके वाचणे हा तर त्यांचा आवडता छंद होता. त्यावरील आपले अभिप्राय ते लेखकाला आवर्जून कळवीत. सामान्यांची पत्रे आली तरी त्याला स्वत:ची पोच देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विरोधकांमधील सद्गुणांची ते नेहमीच दखल घेत व आवर्जून उल्लेख करीत. आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून विरोधी नेत्यांनीही त्यांना ‘अजातशत्रू’ मानले होते.

यशवंतरावांनी पुढच्या पिढीसाठी फार मोठा वारसा ठेवला आहे. त्यांची स्मृती त्यांचे गुण आत्मसात केले तरच होणार आहे. प्रत्येकातील चांगले गुण जोखून त्याचा राष्ट्रकार्यासाठी उपयोग करून घेणे, मतभेद म्हणजे वैर नव्हे ही वृत्ती जोपासणे, व नैतिकतेवरील निष्ठा निग्रहीपणे व सातत्याने जागरूक ठेवणे एवढी शिकवण जरी आपण आत्मसात केली तरी यशवंतरावांच्या आत्म्याला निश्चित समाधान लाभेल.’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com