६४. स्मरणपत्र – डॉ. सविता जाजोदिया
ना.यशवंतरावजी चव्हाणांकडे पहिल्यांदा मी गेले ती आक्का (डॉ. सरोजिनी बाबर) राज्यसभेच्या सदस्या म्हणून दिल्लीत असताना. थोडा वेळ झालेली ती आपुलकीची मुलाखत. पण त्यानंतर दिल्लीतील कुठल्याही कार्यक्रमात यशवंतरावजी भेटले की आदरपूर्वक मी केलेल्या नमस्काराला प्रसन्न हास्याने प्रत्युत्तर देऊन ओळख दर्शवीत असत. वास्तविक असंख्य लोकांशी त्यांचा सतत संपर्क. कुणाकुणाला कसे लक्षात ठेवायचे ? पण प्रत्येक व्यक्ती त्यांच्या अचूक लक्षात राहात असे.
त्यानंतर आमच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या राष्ट्रीय चरित्रमालेसाठी आम्ही त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक संक्षिप्त चरित्र लिहून द्यावयाची विनंती केली. त्यांनी ती आनंदाने मान्यही केली. त्या संदर्भात मी व आमचे एक सहकारी डॉ. सैय्यद असद अली त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. भेटीची वेळ सकाळी साडे दहाची ठरली होती आणि ठीक साडे दहाच्या ठोक्याला यशवंतरावजी भेटावयाच्या खोलीत बाहेर आले. आपल्या नेहमीच्या प्रसन्न मुद्रेने त्यांनी आमचे स्वागत केले, आणि आपल्या जबाबदारीच्या राजकीय व्यापातून वेळ काढून पुस्तकाविषयी आमच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली. वरकरणी ते हसतमुख दिसत होते, पण त्या हास्याआड वेणूताई गेल्याचे दु:ख लपलेले जाणवत होते. आतून मोडल्यासारखे ते वाटत होते. त्यांच्या जीवनाचा गाभाच जणू हरवला होता. त्यांनी फायनान्स कमिशनच्या कामातून मुक्त झाल्यावर पुस्तक लिहून द्यावयाचे कबूल केले.
चार महिन्यांनंतर, आता त्यांना लेखनासाठी सवड झाली असेल या कल्पनेने २३ नोव्हेंबरला मी त्यांना एक स्मरणपत्र पाठवले. त्यावेळी हे पत्र त्यांना कधीच पोचणार नाही अशी पुसटशी आशंकाही मनात आली नव्हती. २५ नोव्हेंबरला त्यांच्या निधनाची दु:खद वार्ता समजली तेव्हा मन विषण्ण होऊन गेले. त्यांच्या मृत्यूनंतर ते स्मरणपत्र त्यांच्या घरी पोचावं हा केवढा दैवदुर्विलास!



















































































































