एके दिवशी मला यशवंतरावांनी त्यांच्या कार्यालयात बोलाविले आणि विचारले, की ‘‘अमुक पक्षाच्या अमुक कार्यकर्ताच्या हालचाली संशयास्पद वाटत आहेत. त्यांना जर शासनाने अटक करण्याचे ठरविले तर तुम्हाला त्यांना अटक करण्यास किती वेळ लागेल?’’ ‘‘साधारण चार ते पाच तास’’, ‘‘ठीक आहे. मी तुम्हाला योग्य वेळी सांगेन.’’ दोन दिवसांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास याबाबतीत कारवाई करण्याचा हुकूम शासनाकडून आला व आम्ही या सर्व मंडळींना पहाटे पाच वाजेपर्यंत अटक करू शकलो.
तसेच एकदा अमुक एका शहरात अमुक वेळी जातीय दंगा होण्याचा संभव आहे, असा अंदाज इतका बिनचूक बरोबर आला की माझ्याजवळ खात्रीलायक बातमीदार आहेत, अशीच सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांची व शासनाची समजूत झाली. वास्तविक ही सगळी किमया यशवंतरावांच्या मार्गदर्शनामुळे झाली होती.
१९६२ च्या युद्धाच्या वेळी यशवंतराव भारताचे संरक्षणमंत्री झाले व त्यांचा व माझा शासकीय संबंध सुटला. तरी पण आमचे वैयक्तिक संबंध तसेच कायम राहिले.
पुढे १९६४ मध्ये माझी दिल्लीत केन्द्रीय गुप्तचर विभागात नेमणूक झाली. त्या वेळी जुन्या संबंधामुळे त्यांच्या बंगल्यावर मला केव्हाही जाता येत असे.
यशवंतरावांमध्ये त्यांच्या मंत्रिपदाच्या मोठेपणाची भावना बिलकूल नव्हती. त्यांना शास्त्रीजींच्या बरोबर ताश्कंदला जावयाचे होते. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदेची तयारी करावयाची होती, तरी वेळात वेळ काढून यशवंतराव दिल्लीच्या महाराष्ट्र मंडळाच्या मेजवानीस हजर राहिले. इतकेच नव्हे तर जमलेल्या सर्व मंडळींना भेटले, सर्वांच्याबरोबर त्यांनी तास-दीड तास गप्पा मारल्या.
माझ्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण मी त्यांना दिल्यावर मुद्दाम दिल्लीहून येऊन यशवंतराव लग्नाच्या स्वागत-समारंभास हजर राहिले.
२६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी दूरदर्शनवरील कार्यक्रम बघताना यशवंतरावांच्या निधनाची बातमी मी ऐकली व गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या विविध आठवणींचा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोरून गेला.
वाईट इतकेच वाटत होते की, ह्या चतुरस्त्र बुद्धीच्या राज्यकार्य धुरंधर पुरुषाचा देशाला पाहिजे तेवढा फायदा करून घेता आला नाही.



















































































































