यशवंतराव चव्हाण (38)

पळसखेडच्या शेतक-यांसाठी लहानशी तरी सोय व्हावी म्हणून ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ सभागृहाला यशवंतरावांनी आर्थिक देणगी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक केंद्राच्या नावानं मित्रमंडळींकडून दिली. मला हे अपेक्षित नव्हतं.

दुस-या दिवशी यशवंतरावांकडे मी, माझी पत्नी, अशोक जैन व नरेश जेवायला होतो. जेवणाच्या टेबलावर बसलो. यशवंतराव मनमोकळं हसून म्हणाले, आज वेणूताईंनी पाहुणचार करताना व्हिजिटेरियन जेवणाची काळजी घेतलेली आहे.

मी क-हाडच्या ‘विरंगुळा’तल्या जेवणाची आठवण झाली. अचानक अपघातानं गेलेला त्यांचा आवडता डॉक्टर पुतण्या व सूनबाईंच्या आठवणीनं यशवंतराव व वेणूताई पुन्हा व्याकूळ झाले. दोन मिनिटं उगाच थोडी स्तब्धता आली. अशोक मधेच म्हणाला;
‘नवी बातमी माहीत आहे का ?’

‘कोणती?’ असं यशवंतरावांनी विचारलं.

‘कमलापती त्रिपाठी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.’

‘काँग्रेस आणखी म्हातारी झाली.’ एवढंच ते बोलले व हसले.

जेवण करताना व नंतर यशवंतरावांनी सतत मला कवितेत अडकवून टाकलं. काव्यवाचनातल्या सगळ्याच कवींच्या कविता त्यांना आवडलेल्या होत्या. मी खूप प्रभावीपणानं त्या वाचल्या म्हणून मनावर ठसल्या असं म्हणत होते. त्या कवींनासुद्धा त्यांच्या कविता इतक्या प्रभावीपणे मांडता येणार नाहीत असंही म्हणाले. भालचंद्र लोवलेकरांच्या चोरलकाठच्या ओळी पुन्हा सांगा असा आग्रह धरला.

‘चोरलकाठ
पाऊलवाट
हळूहळू जाईल शामाराणी
घाटावर आणाया पाणी…’

अशी ती कविता मी पुन्हा एकदा अख्खी म्हणून दाखवली. जेवणाच्या टेबलावर पुन्हा कविता नव्यानं सुरू झाल्या. ‘नाघंचं एकच पुस्तक माझ्याजवळ आहे. दुस-यातल्या तुम्ही वाचलेल्या कविता मला लिहून द्या’ म्हणून त्यांनी आग्रह धरला. माझ्याजवळचे काव्यसंग्रह व लिहिलेल्या कविता मी त्यांना देतो म्हणून सांगितलं. त्यांची पुस्तकंच नाहीत. इतके चांगले हे कवी आपल्याकडले प्रकाशक, साहित्य-संस्कृती मंडळ, मी व इतरांनी पुन्हा पुन्हा सांगूनही छापत नाहीत असं सांगितल्यावर त्यांना फार वाईट वाटलं. त्यानंतर कधीतरी कुमार गंधर्वांकडे देवासला यशवंतराव स्वत:च एकाएक जाऊन आले. भालचंद्र लोवलेकर कवीचं इंदोरमध्ये कोणी आहे का असं विचारलं. जे लोक समोर होते त्यांना चोरलकाठच्या पाच-दहा ओळी त्यांनी म्हणून दाखविल्या. तिथे जमलेल्या लोकांना लोवलेकर माहीतच नव्हते याचं विलक्षण दु:ख झाल्याचं त्यांनी नंतर मला सांगितलं.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com