अभिनंदन ग्रंथ - यशवंतरावांचें वर्धिष्णु व्यक्तिमत्त्व -1

रा. पु. कमिशनच्या अहवालांत मुंबई भाषिकांचे राज्य नाकारण्यांत येतांच महाराष्ट्रांत उत्स्फूर्त चळवळीचा आगडोंब उसळला आणि त्यांत नेतृत्वाची प्रस्थापित मिरासदारी जळून खाक झाली. या चळवळीनेंच समितीचें नवें नेतृत्व उदयास आणलें. लोकांची चळवळ, तळमळ, त्याग, हौतात्म्य यांनी समिती स्थापित होण्यापूर्वीच कळस गांठला होता. त्या सर्वांचा वारसा, तेज , प्रतिष्ठा, दबदबा व दरारा समितीकडे चालत जाऊन संक्रमण काळांतील महाराष्ट्रीय जीवनांत समिती सर्वश्रेष्ठ सर्वबलिष्ठ व कर्तुमकर्तुम् ठरली. सार्वत्रिक निवडणुकी समितीने जिंकल्या आणि विदर्भाने काँग्रेसची पाठराखण न करितां समितीला थोडीफार साथ दिली असती तर मराठी भाषिक राज्यांत राजदंडाचा अधिकार समितीच्या मुठींत गेला असता. समिती महाराष्ट्री चळवळ यशस्वी करणार अशी  निष्ठा तर लोकांत होतीच, आणि त्याचबरोबर समितीबद्दल अनेक अपेक्षा लोकांच्या होत्या. समिती निष्ठेच्या महापुरांत महाराष्ट्रांतील पक्षीयतेचे व जातीयतेचे ताबूत थंडे झाले, आणि चळवळीची व विधायक कर्तृत्वाची शीग गाठली जाऊन महाराष्ट्रांत पक्षातील लोकशाहीचा नवा मनु प्रस्थापित होणार, अशा प्रकारचें महाकाव्य समितीचे महर्षि श्री. एस्. एम्. जोशी यांना सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्फुरलें होतें. पण महापूर कायमचा टिकत नाही व तो ओसरतांच चिखल व त्यांत नाचणारे बेडूक तेवढे शिल्लक राहतात. समितीच्या बाबतींत असाच अनुभव हळू हळू येत चालला. पक्षीयता व जातीयता यांचे बांध विरघळून न जातां वज्रलेप झाले आहेत. आणि समितीमध्ये पक्षीयतेचा कहर झाल्याने या यादवींत विधायक कर्तृत्व अशक्य बनलें आहे, धाकदपटशाचें भस्मासुरी राजकारण हेंच समितीचें भांडवल होऊ पहात आहे, असें तीनचार वर्षांतच दिसून येऊन श्री. एस्. एम्. जोशी यांना कपाळावर हात मारून घ्यावा लागला. जनतेची पतितपावन शिवशक्ति समितीमध्ये समाविष्ट झाली, पण पक्षीयतेचीं चिरगुटें व खरकटीं उपसण्याच्या कामी तिचा कट्टा मोकळा होऊ लागला. समितींतील फाटाफूट विकोपाला पोहोंचली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या कर्तबगारीऐवजी आपापसांत एकमेकांना खच्ची करणारा करंटेपणा समितीमध्ये इतका बोकाळला की अखेर समिती दुभंगली. दिल्लीला हेलपाटे घालणारें महाराष्ट्राचें जुने नेतृत्व, त्याचप्रमाणे होरपळून काढून कार्यभाग साधूं इच्छिणारें समितीचे नेतृत्व महाराष्ट्राच्या प्रतिष्ठापनेच्या बाबतींत अशा रीतीने कालपुरुषाच्या कसोटीला उतरलें नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रतिष्ठपनेच्या बाबतींत लोकशक्तीचा प्रभाव दाखविण्याची समितीची कामगिरी महाराष्ट्राच्या अलिकडच्या इतिहासांत अभूतपूर्व आहे, आणि नवी चळवळ सुरु करण्याचा समितीचा निर्धार संयुक्त महाराष्ट्र आणण्याच्या कामीं शंभऱावा हुकुमी खडा ठरला यांत वाद नाही.' ना. चव्हाण हे प्रांजलपणानें हें ऋण अगत्यपूर्वक उल्लेखीत असतात. पण त्याचबरोबर हें नेतृत्व महाराष्ट्रयुगाच्या धारणा-पोषणाच्या कामीं थिटें पडलें. १९५६ सालीं महाराष्ट्र झाला असता तर त्याची समिती-कांडांत काय वाट लागली असती कोण जाणे !

महाराष्ट्राचें प्रतिष्ठापित मिरासदार नेतृत्व विलयास जात असतांना आणि समितीचें नवें नेतृत्व लंगडूं लागलेले दिसत असतांनाच नवें कसदार नेतृत्व उदयाचलावर येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत चाललें होते. 'शेतक-याचा पोर' द्विभाषिकाचा मुख्य मंत्री होण्यापूर्वीच पुरवठा मंत्री या नात्याने त्याने आपली रग व चाणाक्षपणा लोकांच्या नजरेस आणून अन्नधान्याच्या त्या वेळच्या आणीबाणीच्या परिस्थितींत पुरवठा खात्याची जडजोखीम शहाजोगपणाने संभाळली होती. त्याकाळी आरे दूधवाड्याच्या म्हशी व रेडेहि त्यांच्याकडे विश्वासपूर्वक सोपविण्यांत आले नव्हते. याच ना चव्हाणांना द्विभाषिकाचा राजदंड सूपूर्त करण्यांत आला. द्विभाषिकाच्या मुख्यमंत्रिपदावर ना. यशवंतराव चव्हाण योगायोगानेच लेटले हें खरें आहे. श्री. भाऊसाहेब हिरे हे श्री. मुरारजींना आडवे गेले नसते तर श्री. मुरारजीभाई बाजूला झाले नसते व ना. चव्हाण द्विभाषिकाचे पहिले मुख्यमंत्री झालेहि नसते. आणि महाराष्ट्रांत नंतर काय घडलें असतें  व नसतें कोणास ठाऊक? ना. चव्हाण लहान ठरतील आणि कोयनाकाठचा चुव्वा चिमट्यांत धरून फेकून देतां येईल अशी आशा द्विभाषिकाच्या गुर्जरभक्तांना तेव्हा वाटत होती. पण बघता बघतां लहान चव्हाण इतके महान् ठरले की त्यांना उपटून काढतांना द्विभाषिकहि मुळासह उपटलें जाईल असा अनुभव द्विभाषिकाच्या गुर्जर-भक्तांना आला. ना. चव्हाणांचा 'लोहपुरुष' त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पत्करला होता आणि त्याचा रागरंग व ढंग अनोखा असल्याचें कळून येण्यास वेळ लागला नाही. मुत्सद्यांनीहि तोडांत बोटें घालावीत अशी राजनीति त्यांनी अंगिकारिली. अंगावर कोसळून पडत असलेला 'प्रतापगड' त्यांनी सावरला, आणि त्यांत कोणी जाया जखमीहि झाले नाहीत. अंगावर आलेले मोर्चे त्यांनी पेलले व हसतमुखाने परतवले. समितीच्या बैठकीला स्वत: हजर राहून आपलें म्हणणें सांगण्याचा जगावेगळा पायंडा त्यांनीच पाडला व त्यांना म्हणूनच तो तोलता आला. त्यांच्या राजनीतीने दिल्ली तर दिपलीच; पण कॉ. डांगेहि आपसात बोलतांना त्यांच्या कर्तबगारीची मुत्सद्देगिरीची, सचोटीची. धडाडीही व संस्कारी राजकारणाची प्रशंसा करूं लागले. लोकांची माडी सांपडेलेली नाही, एवढाच ना. चव्हाणांचा एक दोष कॉ. डांगे यांना दिसत होता.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com