अभिनंदन ग्रंथ - जनमनाचे तरंग - 3

"मराठा राज्य की मराठी राज्य' हा विषयहि गेल्या वर्षापासून नेहमी निरनिराळ्या थरांवर आवेशाने चर्चिला जाणारा विषय होऊन बसला आहे. श्री. यशवंतराव चव्हाण यांनी या विषयाचा उल्लेख जाहीर रीतीने प्रथम सांगली येथील भाषणांत आणि नंतर वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून पुण्यांत केलेला आहे. 'महाराष्ट्राचे राज्य हें कोणाहि एका जातीचें राज्य नाही' असे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलें आणि 'माझ्या  या भाषणाच्या निकषावर आमचा व्यवहार घासून पाहावा' अशी अपेक्षाहि नंतर व्यक्त केली. सर्वसामान्य माणसापासून असामान्य विचारवंतापर्यंत अनेक जण सांगलीचे भाषण आणि राज्य कारभारांतील नित्य येणारा अनुभव यांचा मेळ कोठे बसतो का, याची शाहनिशा अलीकडे करूं लागले आहेत. कांही लोक म्हणतात, "असा मेल अद्याप तरी कोठे दिसत नाही;" तर कांही लोक म्हणतात, "यशवंतरावांच्या भोवतालची सर्वच माणसें यशवंतरावांइतकीं जातिनिरपेक्ष वृत्तीचीं आहेत, असें नाही. त्यामुळे तुमचा गैरसमज होण्यासारखी स्थिती आहे. इतकेंच." संपूर्ण देशाच्या समाजजीवनाचा विचार करणारे सांगतात, "यशवंतरावांचे नेतृत्व किती जातिनिरपेक्ष आहे, हें मद्रास प्रांतांतील घडामोडींकडे पाहिलें म्हणजे अधिक चांगलें कळतें. आपण छोट्या छोट्या घटनांवरून सामाजिक शक्तींचा प्रवाह मोजावयाचा प्रयत्न करीत असतों. जवळून पाहात असल्यामुळे त्या छोटया गोष्टीच मोठ्या वाटतात. पण अधिक खोल विचार केला तर जातिनिष्ठ वातावरण महाराष्ट्रांत प्रभावी नाही, असेंच दिसेल." याहिपेक्षा अधिक उदारमतवादी दृष्टिकोनांतून या संपूर्ण प्रश्नाकडे बघणारेहि पुष्कळ आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या मर्जीत न बसलेला एक काँग्रेसकार्यकर्ता एकदा खाजगी बैठकींत म्हणाला, "महाराष्ट्रांत जातिनिष्ठ वातावरणाला अडविण्याचें सामर्थ्य यशवंतरावांपाशी आहे. आपल्या जातीमध्ये अभिमानाची आणि सत्तापिपासेची लाट उसळली म्हणून त्या लाटेवर स्वार होण्याचे यशवंतरावांना कारण नाही आणि अशी लाट एखाद्या जातींत उसळली म्हणून इतरांनी बिचकण्याचें कारण नाही. मराठा जातीचें राजकीय वर्चस्व कांही काळ नांदणें ही एक ऐतिहासिक गरजहि आहे. पण यापुढे यशवंतरावांनी आपल्या जातीला आपल्या उच्च आदर्शांकडे खेचून नेलें पाहिजे. जातीचें पाठबळ आणि आदर्शांकडे धाव या दोन्ही गोष्टी यशवंतरावांना जमतील असें वाटतें. माझा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे."

'गेटवे ऑफ इंडिया' समोर छत्रपति शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यांत आला, याविषयी अनेकजण श्री. यशवंतराव चव्हाण यांना धन्यवाद देत आहेत. २६ जानेवारी १९६१ रोजी अपोलो बंदरावर लोटलेला प्रचंड जनसमुदाय पाहून मुंबई शहरांतील एक राजकीय कार्यकर्ता म्हणाला, "मराठी लोकांच्या मनांत आता यशवंतरावांनी कायमचें समाधान निर्माण करून ठेवलें आहे. मुंबईंत मराठीला मान नाही, असें आता कोणी म्हणूं शकणार नाही." मात्र गेल्या वर्षभरांत शिवाजी महाराजांच्या उत्सवांना जें स्वरुप प्राप्त झालें आहे तें पाहून मुंबईतील एक प्राध्यापक म्हणाले, "महाराष्ट्रांत गेल्या चारपांच वर्षांपासून शिवाजीमहाराजांच्या नांवावरच राजकीय संघटनांची कामें करण्याचा प्रघात पडला हे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींत आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यनंतरहि शिवाजीमहाराजांचेंच नांव घेऊन कार्य होतें आहे. शिवाजीमहाराज मोठे खरे; पण त्यांचा काळ आणि आजचा काळ यांत फरक आहे. अशा स्थितींत महाराष्ट्रांत गांधीचें नांव मागे पडून शिवाजी महाराजांचे नांव पुढे यावें, हें कितपत इष्ट होय, असा प्रश्न मनांत आल्यावाचून राहत नाही."

पण श्री. यशवंतराव चव्हाण यांचा विषय सर्वसामान्य दैनंदिन जीवनांत किती सहज रीतीने चर्चिला जातो याची कल्पना सुमारे आठ महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग सांगितल्याशिवाय येणार नाही. एके दिवशीं बोरीबंदरजवळ मी एक टॅक्सी ड्रायव्हरला खूण केली; व आंत बसतांच "फाऊंटन" म्हणून सांगितलें. टॅक्सी ड्रायव्हरांनी आदल्या दिवशी दरवाढीसाठी केलेल्या संपामुळे माझेही हाल झालेले होते व त्यामुळे सर्वच टॅक्सीवाल्यांवर मी रुष्ट होतो.

टॅक्सी सुरु होतांच मी टॅक्सी ड्रायव्हरला विचारलें, "क्यों सरदारजी, आप लोगोंके कलके स्टाईलका क्या हुवा  ?"

मागाहून अधिक वेगाने जाणा-या गाडीला वाट देत तो म्हणाला, "साहब, कुछ न पुछिये, चव्हाणसाब बडा अच्छा और अकलमंद शक्स है ।"

"मतलब ?" मी म्हणालो,

"मतलब यह है कि उन्होनें टॅक्सी ड्रायव्हरोंकी जो आठ आना माइल की मांग थी वह पहिले माईल के लिये मंजूर की लेकिन आगे समझोतेके तरीके ऐसा टेबल बनवाया की उसमें टॅक्सी वालोंको आठ आना माईल मिलता ही नही ! लेकिन यह सब बात उसने ऐसे अकलमंदीसे हम लोगोंके सामने रखी कि हम लोक उसको नामंजूर नहीं कर सके !"

"तो आपका यह स्ट्राईक चव्हाणसाहब के वजह से टॉय टॉय फिस हो गया-"

"साहब, हमारी क्या बात आप कहते हो ! उन्होने तो उनको दिन दुगना और रात चौगुना गाली देनेवाले बडेबडे लीडरोंके टायरकी हवा निकाल ली है । उन लीडरों के सामने हम किस पेडकी पत्ती ! हम तो आखिर ठहरे टॅक्सी ड्राइवर !"

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com