यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ६०

मुंबईतील भांडवलदारांच्या दडपणामुळे काँग्रेसश्रेष्ठी मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करू इच्छित नाहीत हा प्रचार केवळ विरोधी पक्षांनी चालवला होता असे नव्हे. अनेक काँग्रेस नेते असेच मानत व म्हणत होते. काँग्रेसश्रेष्ठी म्हणजे नेहरू, गोविंदवल्लभ पंत, आझाद, आणि काँग्रेसचे अध्यक्ष ढेबर. यांपैकी ढेबर हे गुजराती म्हणून त्यांचे हितसंबंध उघड होते. पण मुंबईचा महाराष्ट्रात समावेश करण्याची तयारी नाही म्हणून नेहरू, पंत व आझाद यांच्यावर भांडवलदारांचे दडपण होते असे मानायचे, तर महात्मा गांधींच्या बाबतीत काय म्हणायचे? माडखोलकरांनी शंकररावांना १९५६ मध्ये लिहिलेल्या पत्रात त्यांच्या महात्माजींशी ४२ सालच्या एप्रिल-मेमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती दिली होती. महाराष्ट्र राज्यात मुंबई समाविष्ट करण्याबाबत प्रश्न विचारला असता गांधीजींनी कळवले की, ‘१९२० साली काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेचा ठराव केला आणि उपसमितीने काँग्रेस संघटनेची भाषावार रचना करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे मुंबई राज्यात चार प्रदेश काँग्रेस समित्या स्थापन करण्यात आल्या. या उपसमितीचे अध्यक्ष होते तात्यासाहेब केळकर. महाराष्ट्राच्या नेत्यांशी चर्चा करूनच या प्रदेश समित्या नेमल्या गेल्या होत्या. तेव्हा यात काँग्रेसचा दोष नाही.’ नंतर गांधींचे निधन होण्यापूर्वी प्रेमा कंटक यांनी गांधींची भेट घेतली असता, महाराष्ट्रात मुंबई सामील करण्याबाबत बोलताना गांधींनी बरोबर याचीच पुनरावृत्ती केली. तेव्हा भांडवलदारांचे काँग्रेसश्रेष्ठींवर दडपण आल्याची टीका निदान काँग्रेसजनांनी करण्यात अर्थ नव्हता. समाजवादी, कम्युनिस्ट, शे. का. इत्यादी पक्षांनी तशी टीका केली तर ती समजण्यासारखी होती. आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की, काँग्रेसचे मुख्य पुढारी भांडवलदारांच्या दडपणाखाली आल्याचे मराठी काँग्रेसनेत्यांना केव्हा समजले? पूर्वीपासून समजले असेल तर ते अशा पक्षात राहिले कशासाठी? इतर पक्षांची दारे त्यांना बंद नव्हती.

मुंबई स्वतंत्र राज्य करण्याची योजना डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य होती. याची कारणे मात्र वेगळी होती. मुंबई गुजराती इत्यादींनी भांडवल गुंतवले म्हणून ती वेगळी करण्यासंबंधीचा युक्तिवाद बाबासाहेबांनी खोडून काढला. तसेच मुंबईत मराठी लोकांची पूर्ण बहुसंख्या नाही, या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. त्यांनी लिहिले की, मुंबईत मराठी लोकांची वस्ती पन्नास टक्क्यांहून कमी आहे पण भौगोलिकदृष्टंया ती महाराष्ट्राची आहे हे उघड असून, मोरारजींनीही ते मान्य केले होते. दुसरा प्रश्न भाडवल कोणी गुंतवले, हा ते मराठी लोकांनी गुंतवले नाही, हे खरे. पण कलकत्त्यात गुंतवलेले भांडवल बंगाल्यांचे नाही आणि मद्रासमध्ये ते तामिळी लोकांचे नाही. त्यामुळे मुंबईचा अपवाद करता येणार नाही. इतके सांगून बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतून गुजराती व इतर लोकांनी भांडवल काढून घेतले वा नंतर अधिक गुंतवले नाही, तर काय होईल, याचा विचार करण्याची सूचना केली आहे. ते म्हणतात की, मराठी लोक व्यापार-उद्योगात नाहीत. ते कारकुनीपेशाचे आहेत किंवा मजूर आहेत. उद्या मुंबईतील व्यापार-उद्योग कमी झाला तर आपली काय अवस्था होईल, याचा विचार मराठी लोकांनी केला पाहिजे. यानंतर बाबासाहेबांनी चार राज्यांची योजना मांडली. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व पूर्व महाराष्ट्र अशी चार राज्ये केल्यास बाबासाहेबांच्या मते दलित वर्गासच नव्हे तर ब्राह्मण, गुजराती व मारवाडी यांनाही संरक्षण मिळेल. गांधींच्या खुनानंतर या तीन जमातींचे अनेक लोक महाराष्ट्राचा ग्रामीण भाग सोडून शहरात आले याचा दाखला बाबासाहेबांनी दिला. त्यांना सर्व महाराष्ट्राचे एक राज्य करणे युक्त वाटत नव्हते. एवढे मोठे राज्य चालवणे कठीण जाईल असे त्यांचे म्हणणे. या अशा विभाजनामुळे मराठी भाषेवर अन्याय होईल असेही नाही. तीन राज्यांत मराठी भाषाच प्रमुख राहील. ज्यास आपण मध्य महाराष्ट्र(मराठवाडा) म्हणतो तो निजामाने दुर्लक्षित ठेवला. दुसरे दोन महाराष्ट्रीय विभाग त्याला न्याय देतील याची खात्री काय? असा बाबासाहेबांचा सवाल होता. मराठा समाजास राजकीय शिक्षणाची गरज असल्याचे मतही डाँ.आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

विदर्भाच्या नेत्यांनाही मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्याच्या मागणीची तितकी आच नव्हती. अशा रीतीने महाराष्ट्र राज्य ठीक, पण होत नसेल तर मूंबईसाठी अडून न बसता महाराष्ट्र राज्य स्थापन करीवे आणि हे पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना नको असेल तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य स्थापन करावे ही त्यांची भूमिका प्रथमपासून होती व तीतही बदल झाला नाही. अणे यांनी विदर्भ वगळून महाराष्ट्र व गुजरात यांचे द्वैभाषिक राज्य करावे अशी सूचना केली होती, तर गोपाळराव खेडकर यांनी मुंबई मिळत नसल्यास तिचा मोह सोडून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा असे मराठी भाषिक राज्य स्वीकारावे असे सुचवले होते. विदर्भासह महाराष्ट्र स्थापन करण्याचा सुयोग आला असता शंकरराव देव यांच्या आग्रही व अव्यवहार्य धोरणामुळे हा योग गमावला जाणार आणि विदर्भ महाराष्ट्रपासून कायमचा दुरावणार अशी विदर्भातल्या लोकांची भावना असल्याचे माडखोलकर यांनी देवांना कळवले होते; तर आणखी एका पत्रात मुंबईसह महाराष्ट्र होत नसेल तर मुंबईचा नाद आता सोडावा; नाही तर विदर्भ वेगळा होऊ द्यावा अशीही भावना नागपूर-विदर्भात असल्याची माहिती माडखोलकर यांनी दिली होती.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com