यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - १९

नेतृत्व-बांधणीतील कच्चे दुवे
 
उपर्युक्त गुणांच्या बळावर यशवंतरावांच्या नेतृत्वाचा आलेख झपाट्याने उंचावत गेला, हे खरे असले, तरी त्यांच्या राजकीय जीवनाच्या अंतिम पर्वात त्यांची ऊर्ध्वगामी दिशा बदलून ती अधोगामी झाली होती, हे तटस्थ अभ्यासकाला नाकारता येणार नाही.  आणि या दिशांतरांचे रहस्य त्यांच्या नेतृत्वबांधणीतील काही त्रुटींमध्ये शोधणे त्याला क्रमप्राप्त ठरते.  नेहरू-शास्त्रींच्या काळापर्यंत भारतीय राजकारणात सद्गुणांची कदर होत असे, पण श्रीमती गांधींच्या राजकारण-शैलीत सदाचरणी व सत्प्रवृत्त नेतृत्वगुणांना मुळी स्थानच नसल्यामुळे चव्हाणांच्या नेतृत्वाला ग्रहण लागले, असे एक ठोक स्पष्टीकरण दिले जाऊ शकते.  ते खोटे नसले, तरी अपूर्ण खचितच आहे.  चव्हाणांच्या नेतृत्वाच्या उभारणी-क्रमात राहून गेलेले कच्चे दुवे त्यांच्या राजकीय विजनवासाची अधिक समर्पक उकल घडवू शकतात.  

यशवंतरावांच्या नेतृत्व-बांधीतील पहिले वैगुण्य असे दिसते, ते असे, की त्यांनी केलेले सर्व प्रयत्न व्यक्तिगत पातळीवरचेच होते, सामुदायिक पातळीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते.  त्यांनीच केलेल्या नेतृत्वाच्या व्याख्येत ज्या सामुदायिक परिणामक्षमता नेतृत्व-बांधणीद्वारे चव्हाणांना साध्य होऊ शकली नाही.  असाधारण व्यक्तिगत गुण, अतुलनीय बौद्धिक पूर्वतयारी, अथवा व्यक्तिगत परिश्रम, निष्ठा व सचोटी यांच्या बळावर व्यक्तित्वप्रधान नेतृत्व प्रभावशाली अवश्य ठरत असते, पण त्याला सामूहिक पुरुषार्थाचा आयाम कधीच येऊ शकत नाही.  आपल्या भोवतालच्यांना आपल्या पातळीपर्यंत उंचावणे अशा नेतृत्वाला कधीच शक्य होत नाही.  यशवंतरावांचे हेच झालेले आढळते.  त्यांना व्यक्तिगत लोकप्रियतेच्या आधारे निवडणुका जिंकता आल्या, तरी तत्त्वनिष्ठ पक्षसंघटना उभारण्यात यश मिळू शकले नाही.  त्यांनी माणसे जोडली, मैत्री जोपासली; पण संघटना बांधली नाही.  विषण्ण स्वरात ते सांगतात,

''राजकारणामध्ये यशस्वी होणे हे एक कष्टसाध्य काम आहे.  संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचे जाळे विणावे लागते, माणसे सांभाळावी, वाढवावी लागतात व त्यासाठी असंख्यांच्या मनांची जपणूक वर्षानुवर्ष करावी लागते.  पण त्यांतले काही थोडे पण मोठे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेला किंचितसा ओरखडा जाताच वैरभावाची फणा उभारतात.  अशा स्वभावाचे काही नमुने पाहिल्यानंतर मी निराश होतो...''   ('ॠणानुबंध' : ३१).  सामाजिक-आर्थिक विषमतेबद्दल तिडीक निर्माण करणारी कार्यकर्त्यांची फळी आपण आजवर उभी करू शकलो नाही, याची खंत १९७८ साली लिहिताना त्यांना अशी व्यक्त करावी लागली होती. (कित्ता, ६१)

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com