यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - २

अर्थात यातून यशवंतरावांची प्रतिमा डागाळण्याचा किंवा त्यांच्या कर्तबगारीचे अवमूल्यन करण्याचा मुळीच हेतू नाही.  लेखकाच्या मनात त्यांच्या महान व धोरणी नेतृत्वाबद्दल नितांत आदरच आहे.  यशवंतरावांइतका स्वच्छ चारित्र्याचा, निरपवाद धवल राजकीय कीर्तीचा आणि तळागाळातल्यांविषयी अखंड आत्मीयता बाळगणारा सज्जन पुढारी काँग्रेसच्या अलिकडच्या राजकारणात शोधून सापडणार नाही.  खंत एवढीच वाटते, की असा सर्वगुणसंपन्न जाणता नेता महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रासाठी अहर्निश इतका दीर्घकाळ झटत होता, यावर वर्तमान राजकारण पाहून कुणाचा विश्वास बसणार नाही !  हे असे का व्हावे, याचा शोध म्हणजे हे छोटेखानी पुस्तक आहे.  लेखक आपल्या प्रयत्नात कितपत यशस्वी झाला आहे, हे वाचकांनी ठरवायचे आहे.

वर ज्या सर्व नियतकालिकांचा पूर्वप्रसिद्धीच्या संदर्भात उल्लेख केला आहे, त्यांच्या संपादकांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे.  पुस्तकरूपाने हे लेख एवढ्या अल्पावधीत आमच्याकडून लिहवून घेण्याचे श्रेय आमचे दोस्त रा. ना. धों. महानोर, रा. चंद्रकान्त पाटील आणि प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारणारे रा. बाबा भांड यांचे आहे, याचीही कृतज्ञतापूर्वक नोंद केलीच पाहिजे.  त्यांनी तगादा लावला नसता, तर करायच्या म्हणून मनाशी योजलेल्या इतर अनेक कामांप्रमाणेच हेही कदाचित मागे राहून गेले असते.

भास्कर लक्ष्मण भोळे

नागपूर,
दि. १६ डिसेंबर १९८५

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com