यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ५

नेतृत्वाचा धारेपालट

यशवंतरावांची पिढी राजकारणात अग्रेसर होईपर्यंतच्या काळात आपल्या देशात उच्चभू्र, शहरी मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय नेतृत्वाची सनातन परंपरा टिकून होती.  या नेतृत्वाची बैठक जन्मनिष्ठ श्रेष्ठत्वावर आधारित किंवा त्या श्रेष्ठत्वापोटी मिळालेल्या शिक्षण-नोक-या वगैरे संधींमधूनच उपलब्ध झालेली होती.  स्वाभाविकच त्या नेतृत्वाचे चिंतनविश्व मर्यादित होते आणि दृष्टीची कक्षा आपल्या सीमित वर्तुळाबाहेर जाणारी नव्हती.  एकंदरीत त्यांचा दृष्टिकोन 'जैसे थे' - वादी होता.  महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर ती परंपरा तोडणा-या पहिल्या पिढीचे पुढारीपण इतक्या इतिहासाने यशवंतरावांना बहाल केले होते.  एका परीने लोकशाही तत्त्वाच्या अवलंबामुळे मूठभरांच्या हातून बहुजन-समाजाकडे नेतृत्वाचा धारेपालट होणे अपरिहार्य झाले होते, असे आपणांस म्हणता येईल.  पण तेवढे सांगून आपल्याला यशवंतरावांच्या पुढारीपणाचे रहस्य उलगडणार नाही.  अनुकूल ऐतिहासिक शक्तिप्रवाहांची जोड मिळाल्यामुळे यशवंतरावांच्या नेतृत्वाचा विकास भरधाव होताना दिसला असला, तरी त्यामागे लहानपणापासून त्यांनी केलेल्या तपश्चर्येचे सामर्थ्य होते.  विटेवर वीट ठेवून त्यांनी आपल्या पुढारीपणाची जी पायाभरणी केली होती, तिच्याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही.  तत्कालिक लाभहानीला सर्वस्व समजून आणि व्यक्तिगत हेवेदावे वा जातीय वैमनस्य म्हणजेच राजकारण, असे समजून काँग्रेसमध्ये शिरलेले बहुजन-समाजाचे नेते या संक्रमणकाळात काही कमी नव्हते.  ब्राह्मणविरोधाचे राजकारण करून फक्त स्वतःला समाजात व राजकारणात ब्राह्मणांच्या बरोबरीने प्रतिष्ठित करवून घेणे हेच त्यांच्या खटपटीचे साध्य होते.  त्यांना लोकप्रियतेच्या या ना त्या लाटेवर स्वार होऊन नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची संधीही काही काळ लाभत होती.  यशवंतराव त्या सर्वांपेक्षा निराळे होते आणि त्यामुळेच ते अन्य समकालीन बहुजन-समाजातील नेत्यांपेक्षा अधिक व्यापक अर्थाने व अधिक दीर्घकाळ नेतृत्व गाजवू शकले होते.  सवंग लोकप्रियतेचा हव्यास किंवा नेतृत्वाचे लघुरस्ते शोधण्याचा आटापिटा चव्हाणांनी कधीच केला नाही.  त्यापेक्षा दरवेळी परिस्थिती नीट पारखून आणि परिस्थितीशी कधी जुळते घेऊन, तर कधी माफक संघर्ष करून, नेतृत्वाची एकेक पायरी चढण्याचे तंत्र त्यांनी अवगत करून घेतले होते.  

सत्तेची सूत्रे इतिहासक्रमाने बहुजन-समाजाच्या हाती येणे अटळ आहे.  लोकशाहीत कोणी अडवायची म्हटली, तरी ही प्रक्रिया अडवता येणार नाही; पण यशवंतरावांना महत्त्वाचा वाटत होता तो प्रश्न असा, की हे आव्हान पेलण्यासाठी लागणारी क्षमता बहुजन-समाजाच्या नेतृत्वापाशी आहे काय ?  आणि जर ती नसेल, तर त्यांच्या मते प्रामाणिकपणे ते मनाशी मान्य करून ती मिळवण्याच्या खटपटीस बहुजन-नेत्यांनी लागायला पाहिजे.  कुणी जर या समाजाला हजारो वर्षे वेठीस धरले असेल; तर बहुसंख्य असलेल्यांनी कठोर आत्मपरीक्षण करून आपले दोष आणि आपल्यावर वर्चस्व गाजवणा-यांचे गुण समजावून घेतले पाहिजेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com