यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ८३

नाटकांचेही आकर्षण लहानपणापासून यशवंतरावांना असल्याचे दिसते.  कराडला नाटकांचे उत्साही वातावरण होते.  गणेशोत्सवातली पौराणिक-ऐतिहासिक नाटके सतत तीन-चार वर्षे पाहिल्यामुळे 'नाटकातले बरे-वाईट मला हळूहळू समजायला लागले', अशी नोंद यशवंतरावांनी केली आहे ('कृष्णाकाठ', ५३).  एखाद-दुस-या प्रयोगात त्यांनी चेह-याला रंग फासून कामही केले होते.  लांब-कोल्हापूरला जाऊन 'प्रेमसंन्यास' पाहण्याइतपत नाटकांची गोडी त्यांना बालपणीच लागली होती.  यामुळेच पुढे नाट्याचार्य खाडिलकरांच्या नाटकांच्या निमित्ताने लिहिताना त्यांच्या नाट्यकृतींचे मार्मिक रसग्रहण करून जुन्या व नव्या नाटकांतील तफावत ते अचूक दाखवू शकले.  खाडिलकरांनी 'स्वयंवर', 'भाऊबंदकी' किंवा 'सवाई माधावरावांचा मृत्यू' या नाटकांचे विषय निवडण्याची कारणमीमांसा यशवंतराव करतात.  त्यांच्या मते, महाभारताप्रमाणेच मराठ्यांच्या इतिहासातही सर्व व्यक्तिरेखांना युद्धाची पार्श्वभूमी आहे, त्यातील शृंगार हा वीरांचा शृंगार आहे, त्यातील कारुण्यही युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घटनांचे आहे.  युद्धामुळेच मानवी जीवनात निर्माण झालेल्या तणावांचे चित्रण करण्याचे युयुत्सु व प्रतिभाशाली नाटककाराला वाटलेले आकर्षणच अशा नाट्यविषयांची निवड करण्यामागे असू शकते, हे यशवंतरावांचे स्पष्टीकरण मर्मग्राही नाही, असे कोण म्हणेल ?  आनंदीबाई-रोघोबा, धैर्यधर-भामिनी, कृष्ण-रुक्मिणी यांच्यांतील शूरांचा शृंगार, कौटुंबिक जीवनातील नाट्य व खलपुरुषांशी संबंध आणि तज्ज्न्य तणाव, इत्यादींची सोदाहरण चर्चा यशवंतरावांनी केली आहे.

पूर्वीच्या नाटकांतील समाजजीवनाचे चित्रण अत्यंत स्थूल आणि दोनच गडद रंगांनी रंगवलेले असायचे, पण सामाजिक जीवनाच्या वाढत्या क्लिष्टतेबरोबरच नाट्यवस्तूंचीही गुंतागुंत वाढत जाऊन आजची नाटके समाज-वास्तवाचा सूक्ष्म वेध घेऊ पाहात आहेत, हे यशवंतरावांचे भाष्य आणि नाट्यगीतांची भावगीते होऊन त्यांतला 'गायनरस' नष्ट होऊ द्यायचा नसल्यास रंगभूमीच्या सूत्रधारांनी करावयाच्या तपश्चर्येचा त्यांनी दिलेला इशारा किंवा नटांना नाट्याचे यथार्थ आकलन होण्याच्या आणि नाटककारांना अधिक प्रभावी लेखन करता येण्याच्याही दृष्टीने नाटककार व नट यांच्यातील अकृत्रिम साहच-याच्या जुन्या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याची त्यांनी प्रतिपादिलेली निकड त्यांचा या क्षेत्रातील अधिकारच स्पष्ट करते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com