यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - ९०

समुचित संदर्भ

कधीकाळी वाचून मनात साठवून ठेवलेल्या वाङ्मयीन कलाकृतीचे समुचित संदर्भ वाचन-मनन-चिंतनाचा निदिध्यास जडलेल्या यशवंतरावांना प्रवासात अचूक आठवत असत.  ते सायप्रसला गेले असताना फामागुस्ता बंदराच्या तटबंदीवर त्यांना ऑथेल्लो टॉवर दाखवण्यात आला.  त्यांना झटकर शेक्स्पीयरचा नायक कृष्णवर्णी सरदार आठवला.  संशयोपोटी त्याने केलेला डेस्डिमोनाचा खून आठवला.  त्यानंतर तो टॉवर त्यांना प्रीती आणि असूया या मानवी चिरंतन भावनांचे प्रतीकच वाटला.  इकडे समुद्र आणि तिकडे हा टॉवर दोन्हीही धर्माच्या व प्रेमाच्या असूयेतून घडलेल्या शोकनाट्याचे साक्षीदार त्यांना वाटले.  ते म्हणतात,

''हा टॉवर आणि समोर खळाळणारा सागर यांच्याकडे आळीपाळीने पाहिले, तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहून असूयेने विकट हास्य करीत आहेत, असे मला भासले.'' (कित्ता, ११६).

यस्ना-पलाना येथील टॉलस्टॉय यांच्या निवासस्थानीही त्यांना टॉलस्टॉयच्या साहित्यातील स्मरणशलाकांनी असेच अस्वस्थ केले होते.  त्यांना तिथे अॅना कॅरेनिना दिसू लागली.  'रिसरेक्शन'मधील कटुशाला त्यांनी तिथे बघितले.  'मानवताप्रेमाने ओल्याचिंब झालेल्या लेखणीतून अंतःकरणातील शब्दांना सहानुभूतीचे रूप देऊन त्यांच्याद्वारे मानवतेला अमर संदेश' देणा-या या प्रतिभावंत साहित्यिकाच्या अनेक कलाकृतींचे त्यांना स्मरण झाले.  सोन्याच्या पिंपळाखाली ज्ञानदेवांनी ज्ञानसाधनेस बसावे, असेच हे ठिकाण असल्याचे त्यांना जाणवले.  घनगर्द वृक्षराजीने वेढलेल्या त्या 'उदात्त, पवित्र व ईश्वरीय' तपोवनाचे यथातथ्य चित्र यशवंतरावांनी शब्दबद्ध केले आहे (कित्ता १२८-९).


व्यक्तिचित्रे

या आगळ्यावेगळ्या प्रवासवर्णनाप्रमाणेच साहित्यिक यशवंतरावांच्या प्रतिभेचा मनोज्ञ आविष्कार त्यांनी रंगविलेल्या विविध व्यक्तिचित्रांमधून झालेला आढळतो.  कुलसुम दादी ही त्यांच्या स्मरणात रुतून बसलेली एक व्यक्तिरेखा.  त्यांच्या आजीच्या वयाची ही प्रेमळ मुसलमान स्त्री.  यशवंतरावांनी तिचे व्यक्तिचित्रण एका लेखातून केले आहे.  तिचा परिवार, तिची मराठी-उर्दू संमित्र भाषा, रोकठोकपणा, तिने बालवयात लावलेला लळा या सर्वांच्या वर्णनातून ती वाचकांसमोर मूर्तिमंत उभी राहते.  या व्यक्तिचित्रातून ५० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातल्या एका खेड्यात सामान्य जीवन जगणा-या माणसांच्या दैनंदिन जीवनात (जातिधर्म वगैरेंची) तटबंदी कुठेही दिसत नव्हती, भासत नव्हती.  माणुसकीची नाती रक्ताच्या नात्याइतकीच मजबूत आणि खरीखुरी जिवंत नाती होती, हा मी जगलेला अनुभव' आपल्याला सांगायचा होता, असे यशवंतरावांनी नमूद केले आहे. (कित्ता, ६).  

आयुष्यात अविस्मरणीय ठरलेल्या अशा अनेक व्यक्तींची स्मृतिचित्रे यशवंतरावांना रेखाटायची होती.  पण पुढे या ना त्या निमित्ताने काही मान्यवर व्यक्तींसंबंधी त्यांनी लिहिले असले, तरी जनसामान्यांमधल्या या असामान्य व्यक्तींविषयी लिहिण्याचा त्यांचा इरादा मात्र पूर्ण होऊ शकला नाही.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com