यशवंतराव चव्हाण (21)

जास्तीत जास्त गावांत जाऊन, कार्यकर्त्यांना भेटून त्यांना कामाला लावण्याचे काम प्रथम करायचे असे यशवंतरावांनी सर्वांना सांगितले.  भूमिगत चळवळीतील भूमिका पार पाडण्याचे कामाला यशवंतरावांनी इंदोलीपासूनच सुरुवात केली.  आठ दिवसात त्यांनी कवठे, तांबवे, येळगांव आदि ठिकाणांना भेटी दिल्या.  कवठ्याला किसन वीर यांची भेट घेतली, त्यांचेशी चर्चा केली.  भूमिगत राहणे याचा अर्थ लपूनछपून जीवन कंठणे नव्हे तर मोकळेपणाने हिंडून प्रचार करणे अशी भूमिका यशवंतरावांनी घेतली होती.  कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हाती सांपडून तुरुंगात जाऊ नये हे प्रयत्‍न बरेच यशस्वी होऊन भूमिगतांचा एक मोठा संच तयार करण्यात चव्हाणांना यश मिळाले.  जनतेचा स्वयंस्फूर्त उघड उघड पाठिंबा दिसू लागताच सरकारची जी शक्ती केंद्रे होती त्यावर हल्ले करावयाचे, तिरंगी झेंडा लावून त्यांची तेथील सत्ता संपुष्टात आणावयाची, असे ठरविण्यात आले.  कराडच्या मामलेदार कचेरीवर २४ ऑगस्टला मोर्चा नेण्याचे ठरले.  यशवंतराव तांबव्याला गेले.  तेथे काशिनाथपंत देशमुख यांचेशी बोलून आले.  देशमुख हे लोकप्रिय काँग्रेस कार्यकर्ते होते, अहिंसात्मक पद्धतीचे आग्रही होते.  त्यांनी खेड्यातील लोकांना मिरवणुकीने कराडला आणण्याची व्यवस्था केली.  हजारो लोक मामलेदार कचेरीसमोर जमले.  निदर्शकांचे नेतृत्व बाळासाहेब पाटील उंडाळकर यांचेकडे देण्यात आले होते.  शांतारामबापू, कासेगावकर वैद्य, सदाशिव पेंढारकर, माधवराव जाधव आदि कार्यकर्ते तरुणांची - मुलांची सेना घेऊन सज्ज होतेच.  पोलिसांची कुमक आणण्यात आली, तथापि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.  मोर्चाचा पहिला प्रयत्‍न यशस्वी झाला.  

भूमिगत चळवळीचे नेतृत्व यशवंतरावांनी करावे, त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनी पावले टाकावीत असे ठरविण्यात आल्यावर तालुका-तालुक्यांत मित्रमंडळींच्याद्वारे, पत्राद्वारे यशवंतरावांनी जागोजागी सूचना पाठविल्या.  मोर्चानंतर दुसरे आणखी कांही कार्यक्रम हाती घ्यावे लागतील असेही या सूचनांत त्यांनी नमूद केलेले होते.  शेतकर्‍यांची एकजूट करून साराबंदीची चळवळ हाती घ्यावी असेही यशवंतरावांनी सूचित केले होते.  कराडनंतर पाटणला मोर्चाचा कार्यक्रम झाला.  त्यानंतर तासगांवला फार मोठा मोर्चा काढण्यात आला.  विठ्ठलराव पागे, कृष्णराव कुर्‍हाडे आदि कार्यकर्त्यांनी तो यशस्वी केला.  मामलेदार कचेरीवर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला.  मामलेदार निकम यांच्या डोक्यावर गांधी टोपी घालण्यात येऊन महात्मा गांधी यांच्या नांवाचा जयजयकार करण्यात आला.  तासगांव मोर्चाच्या यशामुळे ब्रिटिश सत्तेतील अधिकारी गडबडून गेले.  त्यांनी पोलिसांना आक्रमक बनण्याच्या सूचना दिल्या.  इस्लामपूर आणि वडूज या दोन ठिकाणच्या मोर्चाचे वेळी लाठीमार, गोळीबार करण्यात आला.  वडूजच्या मोर्चाचे नेतृत्व परशुराम घारगे या लोकप्रिय पुढार्‍याने केले.  मोर्चा शांततेने काढणार आहोत असा निरोप बंडोपंत लोमटे यांनी संबंधित सरकारी अधिकार्‍यांना पाठविला असतानाही मोर्चावर अमानुष गोळीबार करण्यात आला.  परशुराम घारगे आणि त्यांचे कांही साथीदार या गोळीबारात ठार झाले.  इस्लामपूरच्या मोर्चाची बांधणी पांडू मास्तरांनी केली होती.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com