यशवंतराव चव्हाण (27)

स्थानबद्ध केलेले पुष्कळ बंदी १९४५ मध्ये सुटून बाहेर आले.  राजकारणात मोकळे वातावरण निर्माण झाले.  कराड शहरात 'शिवाजी एज्युकेशन सोसायटी' नांवाची शिक्षण संस्था स्थापन करण्यात यशवंतरावांचा हातभार लागला.  शंकरराव करंबेळकर यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना रामविलास लाहोटी, राजाराम पाटील, यशवंतराव पार्लेकर, गौरीहर सिंहासने आदींनी आपापल्या परीने मदत केली.  यशवंतरावांचा ट्रस्टी म्हणून समावेश करण्यात आला.  कराड सोडून जाताना एका शिक्षण संस्थेशी आपण संबंधित आहोत याची ठेवलेली जाणीव यशवंतरावांनी अखेरपर्यंत जपली.  करंबेळकर यांच्यानंतर पी. डी. पाटलांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.  १९४६ मध्ये निवडणुका जाहीर झाल्या.  उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली.  स्वामी रामानंद भारती यांच्या अध्यक्षतेखाली वाळवे तालुक्यात कार्यकर्त्यांची मिटिंग झाली.  या सभेत यशवंतराव चव्हाण यांच्या नांवाला स्थानिक लोकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळाला.  यशवंतराव त्यावेळी आपल्या बंधूंच्या आजारपणात मिरजेत त्यांची देखभाल करीत होते.  त्यांच्या स्नेह्यांनी मिरजेला जाऊन त्यांना उमेदवारीच्या तयारीला लागा असे सांगितले.  यशवंतरावांनी नकार दर्शविला.  आजारी बंधू गणपतराव यांनी मध्यस्थी केली आणि उमेदवारी स्वीकारण्याबाबत यशवंताला गळ घातली.  भावाला नकार देणे शक्य नव्हते.  यशवंतरावांच्या बरोबर के. डी. पाटील, व्यंकटराव पवार, बाबूराव गोखले यांचीही उमेदवार म्हणून निवड झाली.  चारही उमेदवारांनी एकत्र प्रचार केला.  लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.  काँग्रेसलाच पाठिंबा द्यायचा असे लोक बोलून दाखवीत होते.  मतदान झाले आणि काँग्रेसचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले.  मार्च महिन्याच्या ३० तारखेला पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मुक्रर करण्यात आली.  भाऊसाहेब सोमण यांच्यासह चारही विजयी उमेदवार मोटारने मुंबईला गेले.  मिटिंगला सरदार वल्लभभाई पटेल हजर होते.  श्री. बाळासाहेब खेर यांची पक्षनेते म्हणून निवड झाली.  मंत्रिमंडळाबाबत चर्चा सुरू झाल्यावर खेरांकडे वर्दळ सुरू झाली.  भाऊसाहेब सोमण यांनी गणपतराव तपासे यांचेसाठी शब्द टाकला.  यशवंतरावांसाठी शब्द टाकण्यास सातारचे कोणी नव्हते.  यशवंतराव हे खेरांना जाऊन भेटण्यास, आपल्या स्वतःसाठी प्रयत्‍न करण्यास नाखूष होते.  के. डी. पाटलांना खूप वाटायचे की यशवंतरावांनी खेरांना भेटावे, पण यशवंतराव नकार द्यायचे.  शेवटी आमदार बाबासाहेब शिंदे यांनी निरोप आणला की खेरांनी भेटायला बोलाविले आहे.  माधवराव देशपांडे यशवंतरावांना आपल्या गाडीतून घेऊन खेरांचे बंगल्यावर भेटावयास गेले.  खेर यांनी यशवंतरावांचे स्वागत करून म्हटले, ''चव्हाण, मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही, पण पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून तुमची निवड केलेली आहे.''  यशवंतरावांनी त्वरित होकार दर्शविला नाही.  'नंतर सांगतो' एवढेच म्हणून ते बाहेर पडले.  बाबासाहेब शिंदे यांनी सल्ला दिला की पार्लमेंटरी सेक्रेटरीपदाला होकार दर्शवा.  के. डी. पाटलांचेही तेच म्हणणे पडले.  तथापि यशवंतराव कांही राजी होईनात.  बाळासाहेब खेरांनी आपले मंत्रिमंडळ जाहीर केले.  त्या पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून यशवंतरावांचे नांव होते.  यशवंतराव कराडला जाऊन परत मुंबईला आले.  तो दिवस १४ एप्रिल होता.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com